Thursday, July 18, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिकतुम्ही बातमी छापा, आम्ही व्यवस्था बदलणार नाही!

तुम्ही बातमी छापा, आम्ही व्यवस्था बदलणार नाही!

वाचा आणि थंड बसा!!

  • मायकल खरात

नाशिक : काही वर्षांपूर्वी व्यवस्थेच्या बेबंदशाहीला वेसण घालण्यासाठी तसेच मराठी माणसांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी मार्मिकच्या माध्यमातून “वाचा आणि थंड बसा” अशा व यासारख्या विविध मथळ्याखाली व्यवस्था बदलण्यासाठी सर्वसामान्यांचा आवाज व माध्यम म्हणून शासनाविरोधात लेख मालिका सुरू केली, ज्याची सरकारमार्फत दखलही घेण्यात आली. कदाचित तत्कालीन व्यवस्थेत किमान थोडीशी नैतिकता व इच्छाशक्ती शिल्लक असावी, म्हणूनच लोकहित व लोककल्याणासाठी नागरिकांचा आवाज बनून मार्मिकमधून छापून आलेल्या बातमीची दखल घेण्यात येत असावी, जुन्या बातम्यांचा दाखला या मजकुरातून देण्याचे कारण म्हणजे नाशिक शहराची व शहरवासीयांची एकंदरीत अवस्था बघितली, तर गुन्हेगार आणि गुन्हेगारी ही खूप मोठ्या प्रमाणात फोफावल्याचे दिसून येत आहे. घरांवर, आस्थापनांवर बेकायदेशीरपणे दंडेलशाही करून कब्जा घेण्यात येतो किंवा प्रयत्न केला जातो, शहर आयुक्तालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकही अवैध धंदा सुरू राहता कामा नये, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, असा सज्जड इशारा दिल्यानंतरदेखील शहरातील अवैध धंदे छुप्या पद्धतीने का होईना सुरूच आहेत. गस्त घालणारे गुन्हे शोधपथक तसेच बीट मार्शल सी आर मोबाईल, पीटर मोबाईलवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना हे अवैध धंदे हद्दीत गस्त घालत असताना दिसत नाहीत का? की जाणूनबुजून त्याकडे कानाडोळा केला जातो, या सर्व प्रकाराला नेमका पोलीस आयुक्तांचा छुपा पाठिंबा आहे की काय,असा प्रश्न सर्वसामान्यांमधून उपस्थित केला जात आहे. पूर्वी नाशिक हे थंड हवेचे ठिकाण तसेच द्राक्षांसाठी प्रसिद्ध होते. मात्र आता शहरातील रस्त्यांवर खुलेआम होणारा कत्ले-ऐ-आम व कोयता ही आता नाशिकची नवीन ओळख झाली आहे. शहरात व शहरालगत कदाचित शोध घ्यावा लागणार की कुठे, कोयत्याची शेती तर होत नाही ना? इतक्या मोठ्या प्रमाणात शहरात कोयते घेऊन दहशत माजवणारे टवाळखोर सध्या शहरवासीयांना वेठीस धरताना दिसून येत आहेत.

काही दिवसांपूर्वी मार्केट यार्डजवळ एकाची निर्घृण हत्या करण्यात आली. हे प्रकरण कुठे शांत होत नाही, तेच फुलेनगर भागात एका महिलेवर गोळी झाडण्यात आली. काही आरोपी पकडण्यात आले. काही अद्यापही फरार आहेत. ही घटना ताजी असतानाच सातपूर परिसरातील कार्बन नाका येथे चित्रपटातील दृश्यांनादेखील लाजवेल, असा सिनेस्टाईल हल्ला करण्यात आला. या ठिकाणीदेखील बंदुकीचा तसेच कोयत्याचा सर्रास वापर करण्यात आला. यातील आरोपी अद्यापही फरारच आहेत. छोट्या-मोठ्या घटना त्यानंतर व त्याआधी वारंवार सुरूच आहेत. कालदेखील इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कंपनीत काम करणाऱ्या एका मॅनेजरवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यातील हल्लेखोर कोण याचा तपास नेहमीप्रमाणे पोलीस घेतच आहेत. अंबड हद्दीचं तर विचारूच नका. अंबड हद्द म्हणजे अवैध धंद्यांना पोषक वातावरण, अशीच काहीशी परिस्थिती याठिकाणची झाली आहे. पोलीस येथील अवैध धंदे पूर्णपणे बंद करण्यास असफल ठरले आहेत, याचा नेमका “अर्थ” काय? गल्लोगल्ली दिवसा रात्री हातात कोयते तलवारी बंदुकी घेऊन दहशत माजवणारे गुंड राजरोसपणे इथल्या नागरिकांना वेठीस धरतात, त्याचा कुठल्याही प्रकारे पुरेपूर बंदोबस्त होताना दिसून येत नाही.

एकंदरीत असं म्हणावं लागेल की, शहरात पोलीस शिल्लक उरलाय की नाही. पोलीस शिल्लक असता, तर शहराच्या नगरांचा गल्लीबोळांच्या रस्त्यांचा ताबा गुन्हेगारांनी घेण्याची हिंमत केली नसती. “सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या आर्थिक व्यवहारांमुळे” पोलीस निरीक्षक महिंद्रकुमार चव्हाण व सतीश घोटेकर यांची पोलीस आयुक्तांनी उचलबांगडी केली होती. मात्र सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळीबार तसेच व त्यांचा वापर करीत हल्ला करण्यात आल्याची घटना घडल्यानंतर या गुन्ह्याचा तपास शहरात गुन्हे शाखेचे किंवा इतरही चांगले अधिकारी असताना महेंद्रकुमार चव्हाण यांनाच तपासी अंमलदार म्हणून का बरं नेमण्यात आले असावे? हा मोठा चर्चेचा विषय ठरत असल्याचे नमूद करण्यात आले होते. आयुक्तालयात कार्यक्षम निरीक्षकांचा तुटवडा असे वृत्तही हाच संदर्भ देऊन एका वृत्तपत्राने प्रसिद्ध केले होते.

अनेक कार्यक्षम पोलीस अधिकाऱ्यांची कार्यक्षमता नियंत्रण कक्षात वेठीस धरून ज्यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका आहे, अशा प्रभारींच्या खांद्यावर कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी देण्याच्या मानसिकतेवर ते वृत्त प्रहार करणारे आहे. अर्थात कुणाला काय जबाबदारी द्यावी व कोणाची जबाबदारी काढून घ्यावी, हा सर्वस्वी अधिकार आयुक्तांचाच आहे, यात शंका नाही. मात्र आपण शहराचा पदभार घेऊन इतके दिवस झाले असतानादेखील काही गोष्टी आजही आपल्या नजरेस पडू नये, ही शहरवासीयांसाठी खूप आश्चर्याची तसेच शोकांतिकेची बाब आहे. काही दिवसांपूर्वी शहरातील पोलिसांच्या ज्यामध्ये काही तथाकथित कलेक्टर यांचादेखील सहभाग होता. नवीन ठिकाणी बदली झालेली असताना देखील जुन्या नेमणुकीच्याच ठिकाणी वरिष्ठांना हाताशी धरून तळ ठोकून बसणाऱ्यांची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर आयुक्तांनी तात्काळ चॅनलवर येत अशा सर्व शेंडीबाज कलेक्टरांना आत्ताच्या आत्ता बदली झालेल्या ठिकाणी रवाना करावे, असा आदेश आयुक्तालयातील पोलीस ठाण्याच्या प्रभारींना देण्यात आला, परंतु या नंतरदेखील बदली झालेल्या पोलीस ठाण्यात नावापुरते हजर झाले व हवे त्या ठिकाणीच आपल्या मर्जीप्रमाणे रुजू झाले, हे सगळं का आणि कशासाठी याचा सर्वसामान्यांना तसेच माध्यमांना चांगलाच अर्थ समजतो. या सर्व बाबी आयुक्तांनी तपासल्या, तर गुन्हे घडण्याचं मूळ कारण नक्कीच लक्षात येईल.

शहरात राबवा “नवा गडी नवा राज”

बहुतेक पोलीस ठाण्यांच्या हद्दीत प्रभारींचा कार्यकाळ जवळपास पूर्णच झालेला आहे, एव्हाना त्यांची आयुक्तालयांतर्गत खांदेपालट होणे अपेक्षित होते. कुठल्या मुहूर्ताची आयुक्तांनी वाट न बघता पोलीस ठाण्याच्या प्रभारींची खांदेपालट करायला हवी, म्हणजे ‘नवा गडी नवा राज’ यामुळे अधिकाऱ्याशी येथील अवैध धंदेचालक तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची सलगी झाली असेल तर त्यावर नियंत्रण येईल आणि नवी सलगी प्रस्थापित होईपर्यंत तरी बेकायदेशीर प्रवृत्ती भूमिगत राहिल्याने शहर शांत राहील. अशा प्रकारांकडे सर्रास दुर्लक्ष केले जात असल्याची पोलिसांवर उठणारी ही संशयाची तसेच टिकेची झोड नवीन नियुक्त करण्यात आलेल्या प्रभारींमुळे खोडता येऊ शकते. कारण येथील शहरवासीयांच्या मते पोलीस आयुक्त म्हणजे आमची आईच आणि आई नक्कीच आपल्या लेकरांची काळजी घेते. परंतु गुन्हेगाराला आमचा बाप होऊ देऊ नका, एवढीच मागणी.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -