चिपळूण : सावंतवाडी-दिवा पॅसेंजर रेल्वेने प्रवास करणाऱ्या तनुजा तुकाराम साळुंखे (३५) या महिलेला रेल्वेमध्येच रत्नागिरी स्टेशनच्या पुढे हृदयविकाराचा झटका आल्याने चिपळूण रेल्वे स्थानकावर गाडी आली असता त्यांना खाली उतरवले. मात्र यावेळी चिपळूण रेल्वे हॉस्पिटलचे डॉ. शिरीष मदार त्या ठिकाणी उपस्थित नव्हते. त्यांना दूरध्वनी करूनही ते सुमारे अर्धा तासाने घटनास्थळी आले. मात्र, त्यावेळी तनुजा साळुंखे या मृत झाल्या होत्या. डॉ. मदार यांच्या वेळकाढू वृत्ती आणि निष्काळजीपणामुळे महिलेला वेळेत उपचार मिळू शकले नाहीत. डॉ. मदार उशीरा आल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त करीत त्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, रेल्वे पोलिसांनी प्रवाशांना शांत केले.
लांजा तालुक्यातील कोर्ले गावातील योगिता चंद्रकांत जाधव व तिची मुलगी तनुजा तुकाराम साळुंखे या दोघीजणी वेरवली या स्टेशनवरती दि. २३ मार्च रोजी दुपारी सावंतवाडी-दिवा पॅसेंजरमध्ये चढल्या. त्यानंतर रत्नागिरी स्टेशन दरम्यान या दोघींनी जेवण केले. मात्र, रत्नागिरीच्या पुढचा प्रवास करीत असताना तनुजा साळुंखे या अचानक सीटवर बसलेल्या असताना खाली पडल्या. अचानक झालेल्या प्रकारामुळे तिची आई योगिता चंद्रकांत जाधव घाबरल्या. अशाच अवस्थेत त्यांना चिपळूण स्टेशनपर्यंत आणण्यात आले. चिपळूण रेल्वे स्थानकात वर्दी दिल्यानंतर सावंतवाडी दिवा पॅसेंजर ही गाडी १२ वाजून ५८ मिनिटांनी चिपळूण स्थानकात दाखल झाली. त्यावेळी तनुजा साळुंखे हिला खाली उतरण्यात आले. पंख्याखाली ठेवण्यात आले. यावेळी तात्काळ चिपळूण रेल्वेच्या कर्मचारी यांनी डॉ. शिरीष मदार जे चिपळूण रेल्वे दवाखान्यात काम करतात त्यांना दूरध्वनीवरून संपर्क करत सदर घटनेची माहिती दिली. डॉ. मदार यांनी तात्काळ येतो असे सांगितले. मात्र, हे डॉक्टर महाशय तब्बल अर्धा तासाने घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत चिपळूण स्टेशन मास्तर यांनी ध्वनीक्षेपकावरून घोषणा करत रेल्वे फलाटावर कोणी डॉक्टर उपलब्ध असल्यास येण्याची विनंती केली. त्यानुसार डॉ. जोशी हे लगेच त्याठिकाणी आले. त्यांनी तपासणी केली असता सदर महिलेच्या पल्स बंद असल्याचे जाणवले. पण ते अधिकृतपणे सांगू शकत नव्हते. कारण अधिकृत डॉ. मदार जेवायला गेले होते. यातच त्या महिलेची परिस्थिती हाताबाहेर गेली. त्यानंतर मदार आले, तोपर्यंत प्रवासी खवळले होते.
डॉ. शिरीष मदार येताच त्यांना घेराव घालण्याचा प्रवाशांनी प्रयत्न केला. पण रेल्वे पोलिसांनी वातावरण शांत केले. या घटनेची खबर मयत महिलेची आई योगिता चंद्रकांत जाधव हिने चिपळूण पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जावून पंचनामा केला. नंतर तनुजा हिचा मृतदेह कामथे येथे शवविच्छेदन करण्यासाठी पाठविले. शवविच्छेदनात रक्तदाब अचानक वाढल्याने हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव होऊन त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती कामथे येथील डॉ. आशिष नरवाडे यांनी सांगितली.
याबाबत चिपळूण रेल्वे स्थानकात जावून दुसऱ्या दिवशी माहिती घेतली असता डॉ. मदार रजेवर गेल्याचे सांगण्यात आले. स्टेशन मास्तर गमरे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, आमच्याकडुन जे करण्यासारखे होते ते केले, पण डॉ. मदार घटनास्थळी उपस्थित होते का? याबाबत कोणीच बोलायला तयार नव्हते. रेल्वेमध्ये डॉक्टर का उपलब्ध झाले नाहीत. त्या महिलेला आरवली किंवा सावर्डे स्थानकात उतरून डेरवण रुग्णालयात नेले असते तर कदाचित त्या महिलेवर वेळीच उपचार करता आले असते. यावरून चिपळूण रेल्वे स्थानकातील डॉक्टरांना घटनेचे गांभीर्य नसल्याचे दिसून आले. दूरध्वनी करूनही ते उशीरा आले. या घटनेमुळे रेल्वे कारभारातील अनेक त्रुटी समोर येत आहेत. रेल्वेतून प्रवास करताना प्रवाशांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष तर होत नाही ना? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.