- गोलमाल: महेश पांचाळ
‘तो मी नव्हेच’ या नाटकामधील लखोबा लोखंडेची भूमिका आजही मराठी रसिकांच्या मनात ताजी आहे. ‘वन टू का फोर’ करत अनेक फसवाफसवीची प्रकरणे करूनसुद्धा नामानिराळे तो कसे राहतो हे लखोबाच्या भूमिकेने दाखवून दिले आहे. लखोबाने लोकांना फसवले होते; परंतु मुंबईत एका आरोपीने न्यायालयाला गुंगारा देण्यासाठी स्वत:चे नाव बदलले. राहण्याची ठिकाणे बदलली; परंतु तरी तो पोलिसांना सापडला. त्यासाठी २८ वर्षांचा मोठा काळ गेला. त्याला अटक करण्यासाठी पोलिसांना मोठ्या चतुराईने शक्कल लढवावी लागली होती. तसे हे एक ताजे प्रकरण समोर आले आहे.
सन १९९५ साली गिरगाव परिसरात राहणाऱ्या राजीव खंडेलवाल (वय ६७ वर्षे) या व्यापाऱ्याने २० लाख रुपयांचे शेअर खरेदी केले होते; परंतु ते शेअर बोगस असल्याची माहिती त्यांना समजल्यानंतर त्यांनी डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. शेअर दलाल विरेंद्र संघवी याच्याविरोधात याप्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. शेअर्स खरेदी न करता विविध कंपनीचे २० लाख रुपयांचे बोगस शेअर्स देऊन खंडेलवाल यांची विरेंद्रने फसवणूक केली होती. या गुन्ह्यात संघवीला पोलिसांनी तत्काळ अटक केली होती. गुन्ह्याचा तपास करून आरोपीविरोधात पुरावा गोळा करून त्याच्याविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्रही सादर करण्यात आले होते. प्रकरणाचा खटला न्यायालयात प्रलंबित होता. आरोपपत्र दाखल करण्यात आल्याच्या कारणास्तव आरोपी संघवीला न्यायालयाने जामीन मंजूर झाला. मात्र त्याला त्यावेळी पुढील खटल्याच्या सुनावणीस हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. १९९६ पासून सुरू असलेल्या या खटल्याच्या सुनावणीदरम्यान संघवी हा कधीही हजर राहिला नव्हता. त्यामुळे गिरगाव न्यायालयाने त्यच्याविरोधात समन्स जारी केले; परंतु कोणत्याही समन्सला उत्तर न आल्याने त्यास फरार घोषित करण्यात आले होते. त्यामुळे संघवीला पुन्हा शोधण्याचे काम पोलिसांना करावे लागले. अटक करतेवेळी त्याने दिलेल्या पत्ता रूम नंबर ०४, २२८, पारेख बिल्डिंग, सायन, पूर्व मुंबई-२२ हा होता. या ठिकाणी वारंवार पोलीस साध्या वेशात जाऊनसुद्धा तो कधीही सापडत नव्हता. सध्या तो काय करतो? याची माहिती मिळत नव्हती. त्यामुळे त्याचा ठावठिकाण कुठे आहे? याची योग्य माहिती पोलिसांना मिळत नव्हती. त्यामुळे न्यायालयात या खटल्याची तारीख पडायची, तेव्हा फक्त आरोपीचा शोध सुरू आहे, असे उत्तर पोलीस देत होते. दुसरीकडे पोलिसांनी संघवीचा शोध सुरू ठेवला होता.
फरार संघवीचा शोध घेण्याच्या दृष्टिकोनातून विविध तांत्रिकदृष्ट्याही तपास केला गेला. तसेच तो राहत असलेल्या परिसरातील ४० ते ५० लोकांकडे चौकशी केली गेली. या चौकशीतून तीन ते चार विविध पत्ते पोलिसांच्या हाती सापडले. त्या पत्यांवर पोलिसांनी शोध घेतला; परंतु तो सापडला नाही. दोन महिन्यांपूर्वी डी. बी. मार्ग पोलिसांनी माहिती मिळाली की, संघवीच्या मालकीचे दाणाबंदर परिसरात घर आहे. पोलिसांनी त्याचा संपूर्ण पत्ता मिळवला. माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलीस ‘ली अॅण्ड मोरहेड, नंदलाल जानी मार्ग, दाणाबंदर, मुंबई’ या ठिकाणी पोहोचले. मालकीचे घर महेश शहा याच्या नावावर होते; परंतु या पत्त्यावर तो रहात नसल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली. त्याचे वय झाले होते. त्यामुळे तो नाव बदलून राहत असावा, असा संशय पोलिसांना होता.
न्यायालयाच्या रेकॉर्ड असलेला आरोपी संघवी हाच महेश शहा आहे का? याची पोलिसांना खातरजमा करायची होती. त्यासाठी त्याच्याजवळील असलेल्या कागदपत्राची पडताळणी करणे आवश्यक होते. पोलिसांनी एक शक्कल लढवली. मुंबईतील बेस्ट कर्मचारी असल्याचे सांगून पोलीस पथकातील दोघांनी त्याचे घर गाठले. घराच्या लाइट बिलाचे व्हेरिफिकेशन करण्याचे कारण सांगून घरमालक महेश शहाला भेटायचे आहे, असे यावेळी साध्या वेशातील पोलिसांनी सांगितले; परंतु दोन-तीन झाले तरी महेश शहा हा घरमालक समोर येत नव्हता. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर पोलीस पथकाने त्याच्या घराचा विद्युतपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. त्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या बहाण्याने शहा याला भेटण्याचा प्रयत्न केला. वीजबिलाच्या निमित्ताने का होईना तो समोर आला आणि त्याला ताब्यात घेण्यात आले.
‘आम्ही पोलीस आहोत, तूच विरेंद्र संघवी आहे ना? आता खरे बोल’ असे पोलिसांनी त्याला दमाने सांगितले. अखेर त्याने आपल्या गुन्ह्यांची कबुली दिली. त्याच्याविरुद्ध अजामिनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. त्याची माहिती त्याला देण्यात आली आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याला पुन्हा अटक करण्यात आली.
फसवणूक प्रकरणात गेल्या २८ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात डी. बी. मार्ग पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकास अखेर यश आले. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात १९९५ साली फसवणुकीच्या गुन्ह्यात दाखल झालेल्या ४६५, ४६७,४१९, ४२० भादंवि या कलमामध्ये जास्तीत जास्त दहा वर्षे शिक्षेची तरतूद आहे. खटला सुरू असताना आरोपी फरार झाला होता. तो आता २८ वर्षांनी पोलिसांना सापडला आहे. या अटकेमुळे नव्याने त्या खटल्याची सुनावणी होईल. उतारवयात संघवीला आता कारागृहात दिवस काढावे लागू शकतात, हे मात्र निश्चित.
तात्पर्य : नावे बदला, राहत्या घराचे पत्ते बदला. गुन्हेगार कितीही हुशार असला तरी पोलिसांनी मनात आणले, तर त्याला शोधून काढू शकतात, हे पुन्हा एकदा दिसून आले.