Sunday, March 16, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यपतेरो... झाडांची वाळलेली पाने

पतेरो… झाडांची वाळलेली पाने

  • रवींद्र तांबे

पतेरो म्हणजे, दुसरे तिसरे काही नसून झाडांची वाळलेली पाने. कोकणात तसेच इतर ठिकाणी सुद्धा पावसाळ्यापूर्वी आसपासच्या परिसरातील झाडलोट केली जाते. त्यात झाडांची वाळलेली पाने शेती उत्पादनासाठी उपयोगी पडतात. हे एक प्रकारे नैसर्गिक खत मानवाला निसर्गाने दिलेली विनामूल्य देणगी आहे. तसेच इतकेच नव्हे, तर झाडांची वाळलेली जी पाने असतात त्याचा सुद्धा जमिनीचा कस वाढविण्यासाठी उपयोग होतो. मात्र त्याचा योग्य प्रकारे उपयोग होणे आवश्यक आहे. कोकणामध्ये झाडावरून वाळून पाने खाली पडतात, त्यांना सर्रास ‘पतेरो’ असे म्हणतात. आता चैत्र महिना सुरू झालेला आहे. सर्व जुनी पाने गळून झाडांना नवीन पालवी येते आहे. तेव्हा झाडाच्या खाली गळून अडलेली पाने एकत्र करून वाफ्यात टाकली जातात. जेणे करून पावसापूर्वी परिसर स्वच्छ होणे आवश्यक असते. त्यामुळे ये-जा करताना त्रास होत नाही. तसेच नवीन गवताची वाढही होते. बऱ्याच वेळा पतेरो साफ केलेला नसेल, तर पतेरो पावसाच्या पाण्याने एकत्र साठला जातो. पाऊस गेल्यावर त्याचा वास सुद्धा कुजकट येतो. साठलेल्या पतेऱ्यात सरपटणारी जनावरे सुद्धा आसरा घेतात. तेव्हा त्याचा जास्त धोका मनुष्याला होऊ शकतो. हा धोका टाळण्यासाठी पावसापूर्वी पतेऱ्याची विल्हेवाट लावणे गरजेचे असते. त्यात शेतकरी राजा हुशार असला तरी अवकाळी पावसामुळे जगाचा पोशिंदा जेरीस आला आहे.

बऱ्याच वेळा चाकरमान्यांची मुले परीक्षा संपल्यावर गावी येतात. त्यांची मदत होईल म्हणून चाकरमानी आल्यानंतर बाग किंवा घराशेजारील परिसर साफसफाई करून घेतात. यामध्ये चाकरमान्यांची मुले झापातून किंवा डालातून गोळा केलेला पतेरा वाफ्यात नेऊन टाकतात. तेवढीच मदत गाववाल्यांना होते. सध्या मजुरीचे दरसुद्धा गगनाला भिडले आहेत. तेव्हा केव्हा एकदा चाकरमान्यांच्या मुलांची परीक्षा होते आणि गावी येतात. याची वाट पहात असतात. तेवढीच मदतिक मदत होईल, अशी गाववाल्यांची समज असते. मात्र चाकरमान्यांची मुलेसुद्धा आपण काम कसे करायचे? हे विचारून प्रामाणिकपणे हौसेने करीत असतात. यावेळी मात्र चाकरमानी येण्यापूर्वीच अधूनमधून पाऊस हजेरी लावत असल्याने शेतकरी चिंतेत दिसत आहे. कारण, अशा अवकाळी पावसाची झळ शेतकऱ्यांना लागते.

पूर्वी शेतीची मशागत करण्यासाठी पतेऱ्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असे. म्हणजे पावसाळ्यात तरवा पेरला जाणार आहे, त्या कोपऱ्यात पतेरो टाकून भाजणी केली जात असे. जेणेकरून जमीन भुसभुशीत होण्याला मदत होते. विशेष म्हणजे पतेऱ्यामुळे जमीन उत्तम प्रकारे भाजली जाते. त्यामुळे तरव्याची वाढपण अगदी जलदगतीने होते. काही ठिकाणी पतेऱ्यासाठी एखाद्याची बाग साफ करण्यासाठी घेतली जात असे. साफसफाईच्या मोबदल्यात गोळा केलेला थोडा पतेरा पण जमीन मालकाला दिला जात असतो. काही वेळ स्वत: जमीन मालक चहापाणी व फरसाण बागेची साफसफाई करणाऱ्यांना देतात. यातून एकमेकांविषयी अधिक आपुलकी व सहानुभूती निर्माण होते. आम्हीही शेती करताना शेतीच्या आजूबाजूच्या झाडांचा पतेरो गोळा करून वाफ्यात जाळत असू. त्यात पहिल्या पावसात भात पेरल्यावर जवळ-जवळ पंधरा दिवसांत तरवा लावायला यायचा. याचा परिणाम त्या कालावधीत पाऊस असो वा नसो त्याचा कोणताही परिणाम शेतीवर होत नसे. आता रासायनिक खतांचा वापर तरवा वाढण्यासाठी केला जातो. याला पावसाच्या पाण्याची नितांत आवश्यकता असते; परंतु जर पाऊस नसेल, तर रुजून आलेला तरवा सुद्धा करपून जातो. तसे पतेऱ्याच्या भाजणीमुळे होत नाही. तेव्हा पतेरा तरव्याला तरुणपण देते, असे म्हणता येईल.

बऱ्याच वेळा कोकणामध्ये पावसाळ्यापूर्वी घराच्या आसपासची साफसफाई तसेच शेतजमिनीच्या जवळील पालापाचोरा असेल तो एकत्र केला जातो. यासाठी बारीक कोयता, हिराची झाडू व भांगेरो अशा सहाय्याने वाळलेला पतेरो एकत्र केला जातो. नंतर दुसऱ्या दिवशी पतेरो झापात किंवा डालात भरून कोपऱ्यात टाकला जातो. नंतर कोपऱ्याच्या चारी बाजूला पसरून दोन ते तीन दिवस उन्हात वाळवला जातो. त्यानंतर गायरीतले सुखे शेण बारीक करून त्यावर टाकले जाते. तसेच काही शेतकरी शेणाऐवजी बकऱ्यांची लेंडीसुद्धा दांड्याने कुटून त्याची बारीक भुकटी करून पतेऱ्यावर पेरली जाते. त्यानंतर त्याला व्यवस्थित सुखायला देतात. नंतर संध्याकाळच्या वेळेला किंवा जोराचा वारा नसेल अशा वेळी आग लावली जाते. तसा शेतकरी ओल्या लिंगडीचे टाळ घेऊन कोपऱ्याच्या चारही बाजूने फिरत असतो. जेणेकरून वणवा जाऊ नये याची काळजी घेत असतात. दुसऱ्या दिवशी अगदी सकाळीच त्यातील शिल्लक राहिलेली बाहेरील काट्या एकत्र करून बाजूला ठेवतात. त्यानंतर हिराच्या झाडूने पतेऱ्याची जळून झालेली राख वाफ्यातच एकत्र करून ठेवली जाते. तरवा पेरण्यापूर्वी हाताने राख पूर्ण कोपऱ्यांत पसरली जाते. पूर्वी राखेला सर्रास नैसर्गिक खत म्हणून वापर केला जात असे. आजच्या काळात सुपीक जमिनी ओस पडत चालल्या आहेत. त्यामुळे पतेऱ्याचे महत्त्व कमी होताना दिसते. तेव्हा शेती न केल्याने पतेऱ्याचे महत्त्व कमी झाले, असे वाटत असले तरी पतेऱ्याची ओळख टिकवून ठेवणे गरजेचे आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -