एलपीजीवर दिल्या जाणा-या सबसिडीचा कालावधी आणखी एक वर्षाने वाढवला
नवी दिल्ली : मोदी सरकारने उज्ज्वला योजनेच्या ९.६ कोटी लाभार्थ्यांसाठी अनुदानाचा कालावधी आणखी एक वर्षाने वाढवण्यात आला आहे. याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, २०२२ मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना एका वर्षात १२ सिलिंडर आणि एका सिलिंडरवर २०० रुपये सबसिडी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय किंमतीत कोणताही मोठा बदल नसल्यामुळे ही सबसिडी आणखी एक वर्ष वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जनतेवरील महागाईचा बोजा कमी करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. या घोषणेवर २०२२-२३ मध्ये ६,१०० कोटी रुपये आणि २०२३-२४ मध्ये ७,६८० कोटी रुपये खर्च होणार असल्याची माहितीही यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी दिली. लाभार्थ्यांना मिळणारे अनुदान त्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येणार आहे.