पुणे : पुण्यातील विमाननगर परिसरात पोस्ट खात्यातील कोट्यावधी रुपयाचा घोटाळा समोर आला आहे. विमाननगर येथील बीआरडी ९ शाखा येथे टीडी गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांचे खाते उघडण्यास लावले आणि कमिशन म्हणून सुमारे ५ लाख रुपये उप-डाकपाल आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांनी वाटून घेतले. तर विमाननगर येथील उप-डाकघरात उप-डाकपालाने टीडी खात्याची गुंतवणूक आणि सुकन्या समृद्धी योजनेतील सुमारे ४५ हजार रुपये आर्थिक गैरव्यवहार करून लाटल्याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी योगेश नानासाहेब वीर (४२) बाळलक्ष्मी निवास खडकमाळ, स्वारगेट पुणे यांनी आपली फसवणूक केल्याबद्दल आरोपी उप-डाकपाल ज्योतीराम फुलचंद माळी (४०) आणि रमेश गुलाब भोसले यांच्यावर आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप करत पोलिसात तक्रार दिली आहे.
दिलेला तक्रारीत वीर यांच्या तक्रारीनुसार, आरोपी माळी आणि भोसले हे उप-डाकपाल म्हणून कार्यरत असताना ९ बीआरडी डंकर्क लाईन मध्ये असलेल्या ५९ टीडी गुंतवणूकदारांची एकूण २ कोटी ४ लाख ६० हजार रुपये इतकी रक्कमेचे टीडी खाते उघडायला लावले. त्यानंतर कमिशन म्हणून ४ लाख ९५ हजार २०० रुपयांपैकी आरोपी वीर याने ७५ टक्के रक्कम स्वतः घेतली आणि २५ टक्के रक्कम दुसरे आरोपी भोसले यांनी आपापसात वाटून घेतली.
टीडी खातेधारकांचा विश्वास संपादन करून आणि खोट्या सह्या करून टपाल विभागाची फसवणूक केल्याप्रकरणी या दोन्ही आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा १ मे २०१४ ते १ जून २०१८ दरम्यान घडला आहे.
तर पोस्ट खात्याच्या विमान नगर परिसरातील दुसऱ्या प्रकरणात विमान नगर उप-डाकघरात आरोपी विलास एच देठे हा १० एप्रिल २०१४ ते १४ सप्टेंबर २०१८ उप-डाकपाल म्हणून कार्यरत असताना त्याने आवृत्ती ठेव खात्यात टीडी आणि सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खातेदाराने त्याच्या खात्यात रक्कम जमा करण्यासाठी आणली असता काउंटरवर त्यांची रक्कम स्वीकारून खातेदारकाच्या पासबुक वर रक्कम स्वीकारली म्हणून त्या तारखेचे शिक्के मारून शासकीय फिनाफॅल प्रणाली मध्ये नोंद करण्याची जबाबदारी विश्वासाने दिली असता आरोपी देठ याने १९ खातेदारानी टीडी आणि सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत विविध तारखांना जमा केलेल्या रक्कम एकूण ४५ हजार ९०० रुपये सरकारी हिशोबात जमा न करता आर्थिक गैरव्यवहार केला. यामुळे १९ खातेधारकांची आणि टपाल खात्याची फसवणूक केल्याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, पुण्यातील तीनही अधिकाऱ्यांना अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणाचा पुढील तपास विमानतळ पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहेत.