मराठा महासंघ प्रणित “कंजुमर फोरमच्या” उद्घाटन प्रसंगी दिलीप जगताप यांचे मत!
मुंबई : ग्राहकांना आकर्षित करून त्यांची फसवणूक करण्याचे प्रमाण समाजात वाढले असून अश्या प्रकारच्या अनेक तक्रारी घेऊन नागरिक कंजूमर कोर्टात जातात काहीना न्याय मिळतो पण काही प्रकरणे वर्षानुवर्षे प्रलंबित राहतात. काही प्रकरणांत न्याय मिळताना विलंब होतो व काही प्रकरणात अपयश सुद्धा येते. त्या मुळे ग्राहक संरक्षण कायदे अजून कडक केले पाहिजेत असे स्पष्ट मत अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप यांनी व्यक्त केले आहे.
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या अंतर्गत “ऑल इंडिया कंझुमर फोरमची “स्थापना आज दादर येथील शिवाजी मंदिर नाट्यगृहात करण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते.
या नव्या फोरमचे उद्घाटन, सद्गुरू परम पूज्य सद्गुरू अण्णा महाराज चव्हाण, (इंदोर) यांच्या हस्ते आज पार पडले.
या वेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, हल्ली किरकोळ माल खरेदी, आर्थिक गुंतवणूक, तसेच घरे व वाहने घेण्यामध्ये ग्राहकांची सहज फसवणूक केली आहे. काही हॉस्पिटल मध्ये सुद्धा भरमसाठ बिलाची रक्कम आकारण्यात येत असून सर्व सामान्य ग्राहकाना होणारा त्रास लक्षात घेऊन व त्यांच्या शंकांचे निरसन करण्याच्या हेतूने तसेच नागरिकांच्या मागणीवरून महासंघाने या नवीन विभागाची स्थापना केली आहे. नव्या पदाधिकाऱ्यांनी ग्राहकांचा विश्वास संपादन होईल असेच काम करावे.
पहिल्यांदा आपल्या विभागामार्फत मदत व मार्गदर्शन करावे व त्यात यश न आल्यास कंजुमर कोर्टात जाण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करावे.व ते नक्की करतील असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.
प. पू. सद्गुरू अण्णा महाराज चव्हाण यांच्या उपस्थितीत या नवीन विभागाची स्थापना होत असल्याने त्यांच्या विचारानुसार हा विभाग ग्राहकांना चांगल्या प्रकारे सेवा देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या वेळी महासंघाचे सरचिटणीस संभाजीराजे दहातोंडे, उपाध्यक्ष संतोष नानवटे, कोषाध्यक्ष श्रीरंग बरगे, महिला आघाडी अध्यक्षा वैशाली जोंधळे, मराठा क्रांती मोर्चाचे वीरेंद्र पवार, सदानंद चव्हाण, एस. आर. सावंत, सुवर्णा पवार, प्रशांत सावंत, कविता विचारे, पंकज घाग, अविनाश राणे, अनिल ताडगे, मयूर गुजर, अनंत जाधव, ग्राहक संरक्षण विभागाचे अध्यक्ष ॲड. अरुण जगताप, सरचिटणीस शंकर बने, आदी पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.