Thursday, July 25, 2024
Homeसंपादकीयअग्रलेख‘चतुरस्त्र’ आशाताई...महाराष्ट्र आभूषण!

‘चतुरस्त्र’ आशाताई…महाराष्ट्र आभूषण!

प्रत्येक भारतीयाच्या आयुष्यात आनंदाच्या, चैतन्याच्या क्षणांची सदोदित पेरणी करणाऱ्यांमध्ये ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांचा सर्वात वरचा क्रमांक लागतो. भारतरत्न लतादीदी आणि त्यांच्या भगिनी आशा भोसले या संगीत क्षेत्रातील एक दैवी शक्ती आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आपल्या गेल्या कित्येक पिढ्यांचे त्यांच्या सुरावटींनी मनसोक्त असे मनोरंजन केले आहे. क्षण आनंदाचा असो वा दु:खाचा…मिलनाचा की विरहाचा… किंवा अन्य कुठल्याही नातेसंबंधांचा…यांच्या सुरेल गीतांनी त्या त्या वेळी आपल्याला साथ दिलेली आहे आणि ते क्षणही सुसह्य केले आहेत. या सुरावटींनी कित्येक मरजूंच्या आयुष्यात बहारही आली असेल, तर अनेकांना जीवनाचा अर्थ उमगला असेल. अशा प्रकारे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात सुखाची पखरण करणाऱ्या आशा भोसले यांना महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च असा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार शुक्रवारी सायंकाळी ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्यदिव्य सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

आपल्या सुमधूर, मधाळ आणि कधी कधी घायाळ करणाऱ्या स्वरांनी संगीत क्षेत्रात ‘चतुरस्त्र’ हा शब्दही थिटा पडावा अशी चौफेर कामगिरी बजावत, गेल्या सात दशकांहून अधिक काळ रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या पद्मविभूषण आशाताई भोसले यांचा हा गौरव म्हणजे त्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराची शान वाढविणारा क्षण आहे, असे म्हटले पाहिजे. कोणत्याही क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने सेवा करणाऱ्या व्यक्तीला सर्वोच्च अशा ‘महाराष्ट्र भूषण’ या पुरस्काराने राज्य शासनाच्या वतीने गौरविण्यात येते. विशेष म्हणजे सन २०२१ या सालासाठी आशा भोसले यांना हा पुरस्कार जाहीर झाला होता.

विविध छटा असलेली अनेक प्रकारची गाणी अजरामर करणाऱ्या आशा भोसले यांचा जन्म १९३३ साली झाला. संगीत आणि नाटकाचा वारसा असलेल्या आशा भोसले यांनी लहानपणापासूनच गाण्याची आवड होती. घरातच गायकी असल्यामुळे गाणं शिकण्याची संधी त्यांना घरातूनच मिळाली. आशा भोसले यांची कारकीर्द सुरू झाली १९४३ साली. त्यानंतर १९४८ मध्ये त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि बॉलिवूडवर सात दशके त्यांनी अधिराज्य गाजवले. बॉलिवूडमध्ये आशाताईंना ‘मेलडी क्वीन’ म्हणून ओळखले जाते. आशाताईंनी आतापर्यंत ११ हजारांपेक्षा जास्त गाणी गायली आहेत. त्यांनी २० पेक्षा जास्त भाषांमध्ये गाणी गायली आहेत. विविध भाषांमध्ये हजारो गाणी गायल्यामुळे २०११ साली आशा भोसले यांचे नाव ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंदविण्यात आले. आशा भोसले यांनी हिंदी, मराठी, बंगाली, तेलुगू, तामिळ, इंग्रजी अशा भाषेत गाणी गायली आहेत. आशाताईंच्या या सोनेरी कारकिर्दीचा सन्मान महाराष्ट्र भूषण पुरस्कार थाटात संपन्न होणार आहे.

‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारासाठी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची राज्य सरकारने निवड करणे हा खरे तर राज्य सरकारचा बहुमान आहे. संगीत आणि नाटकाचा वारसा असलेल्या आशा भोसले यांना लहानपणापासूनच गाण्याची आवड होती. त्यांची कारकीर्द १९४३ मध्ये सुरू झाली असली तरी १९४८ मध्ये त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि अवघे बॉलिवूड संगीत आपल्या कवेत घेतले. त्यांनी बॉलिवूडमध्ये सात दशके अधिराज्य गाजवले. त्यांनी तब्बल १००० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये पार्श्वगायिका म्हणून शेकडो नायिकांना आवाज दिला. बॉलिवूडमध्ये आशाताईंना ‘मेलडी क्वीन’ म्हणून ओळखले जाते. आशाताईंनी आतापर्यंत ११ हजारांपेक्षा जास्त गाणी गायली आहेत. विविध भाषांमध्ये हजारो गाणी गायल्यामुळे २०११ साली आशा भोसले यांचे नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदविण्यात आले. त्यांनी मराठी, हिंदी, बंगाली, तेलुगू, तामिळ, इंग्रजी अशा विविध भाषांमध्ये गाणी गायली आहेत. त्यांना १८ वेळा फिल्मफेअरसाठी नामांकन मिळाले होते. मला आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळाले, त्यासाठी मी सर्वांची आभारी आहेच. मात्र ‘महाराष्ट्र भूषण’ हा वेगळा आणि घरचा पुरस्कार आहे. हा माझ्या मातीने केलेला माझा गौरव आहे. तसेच हा पुरस्कार जाहीर होणे म्हणजे घरच्यांकडून माझे कौतुक झाल्याचे मी समजते, अशा भावना आशाताई यांनी व्यक्त केल्या. तसेच या पुरस्कारासाठी त्यांनी राज्य शासनाचे आभार मानले.

आशा भोसले यांनी गाण्याच्या माध्यमातून अनके दशके देशवासीयांच्या मनावर अधिराज्य गाजवले. अजूनही त्यांची गाणी तेवढ्याच तन्मयतेने आणि अभिरुचीने ऐकली जातात. यापैकी मराठी भाषेतील त्यांनी गायलेली ‘मलमली तारुण्य माझे’, ‘केव्हातरी पाहाटे’, ‘बुगडी माझी सांडली गं’, अशा अनेक गीतांनी रसिकांच्या मनात कायमचे घर केलेले आहे. त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्यच गाण्याला वेचले आहे. मराठी तसेच हिंदी गीतांना त्यांच्या आवाजामुळेच एक नवी झळाळी प्राप्त झाली. त्यांच्या संपूर्ण हयातीत त्यांनी अनेक सदाबहार गीते चित्रपटसृष्टी आणि रसिकांना दिली. त्यांनी गायलेले ‘चुरा लिया हैं तुमने जो दिलको’ हे गीत आजही अनेकांना भुरळ घालते. चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानामुळे त्यांना अनेक मानाच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. भारत सरकारच्या मानाच्या अशा ‘पद्मविभूषण’ पुरस्कारानेसुद्धा त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्कारनेसुद्धा त्यांना गौरविण्यात आले आहे. त्या १९४३ सालापासून गायन क्षेत्रात कार्यरत असून त्यांचा जन्म १९३३ साली झाला असून त्यांनी २०२३ मध्ये आता वयाची नव्वदी गाठली आहे. अजूनही त्यांचा उत्साह हा तरुणाईला लाजवेल, असाच आहे. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आणि कित्येक कटू प्रसंगांना त्यांना तोंड द्यावे लागले. पण त्यांनी कधीही त्याचा बाऊ केला नाही की, त्याचा परिणाम आपल्या कारकिर्दीवर होऊ दिला नाही. प्रत्येक प्रसंगाला त्या नेटाने सामोऱ्या गेल्या आणि सदासर्वकाळ त्यांनी आनंदच दिला आहे. अशा या ‘चतुरस्त्र’ आनंदयात्री आशाताई म्हणजे महाराष्ट्राचे जणू आभूषणच म्हणायला हवे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -