कल्याण/ठाणे/भिवंडी : राहुल गांधी यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्ह्याच्या वतीने आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील, शहराध्यक्ष अभिजीत करंजुले, नाना सूर्यवंशी आदींसह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
शशिकांत कांबळे यांनी सांगितले की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘मोदी’ या आडनावावरून अपमानास्पद टिप्पणी करताना ओबीसी समाजाचा आणि या समाजाचा भाग असलेल्या तेली समाजबांधवांचा अपमान केला. न्यायालयाने या बद्दल राहुल गांधींना दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. राहुल गांधी हे आपल्या घराण्यामुळे आलेल्या राजेशाही मानसिकतेततून बाहेर पडले नाहीत असेच त्यांच्या वक्तव्यावरून दिसते. न्यायालयाने दिलेली शिक्षा मान्य करण्याच्या ऐवजी काँग्रेस नेते रस्त्यावर आंदोलने करून न्यायालयाचा व संविधानाचा अपमान करत आहेत. काँग्रेस नेत्यांनी न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल भाजप न्यायालयात दाद मागेल, असेही ते म्हणाले.
मोदी या आडनावाच्या अनेक व्यक्ती क्रीडापटू आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनीअर आहेत, व्यावसायिक आहेत. एखाद्या आडनावाशी संबंधित लोकांचा एखादी व्यक्ती जाहीर सभेत अपमान करत असेल तर त्या विशिष्ट आडनावाच्या व्यक्तींना मानहानीचा दावा दाखल करण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. आपण कोणालाही अपमानित करावे हा आपला अधिकार आहे, असे राहुल गांधींना वाटत असेल तर त्यांच्या वक्तव्यामुळे अपमानित झालेल्या व्यक्तीला त्याविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे, असेही शशिकांत कांबळे यांनी सांगितले.
राहुल गांधी यांचा भाजप कार्यकर्त्यांकडून धिक्कार; ठाण्यात तीव्र आंदोलन
ओबीसी समाजाचा अपमान केल्याबद्दल काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात ठाण्यात भाजपकडून तीव्र आंदोलन करण्यात आले. कोर्ट नाका येथे झालेल्या आंदोलनात भाजपच्या कार्यकर्त्यांसह ओबीसी समाजही सहभागी झाला होता.
या आंदोलनात भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांचा तीव्र शब्दांत धिक्कार केला. या आंदोलनात माजी ज्येष्ठ नगरसेवक मिलिंद पाटणकर, मनोहर डुंबरे, संजय वाघुले आदीसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘मोदी’ आडनावावरून अपमानास्पद वक्तव्य केले. त्यातून ओबीसी व समाजाचा भाग असलेल्या तेली समाजबांधवांचा अपमान केला आहे. या वक्तव्यांबद्दल राहुल गांधींनी शिक्षा भोगावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली.
भिवंडीत भाजपचे जोडे मारो आंदोलन
भिवंडीत भाजपच्यावतीने राहुल गांधी यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन राहुल गांधी यांनी काही वर्षांपूर्वी मोदी नावाचे लोक चोर असतात असं वक्तव्य केल्याने त्या विरोधात ओबीसी ची भावना दुखावल्याने भिवंडीत भिवंडी शहर भाजप जिल्हाध्यक्ष संतोष शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या.