कल्याण : अंबरनाथ तालुक्यातील नेवाळीमध्ये ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे दोन लहान मुलांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना कल्याण पूर्वेतील कैलास नगरमध्ये इमारत उभी करण्यासाठी भला मोठा खड्डा खोदून ठेवण्यात आला असून त्या खड्ड्यातील साचलेल्या पाण्यात बुडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.
शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास रेहान शेख हा विद्यार्थी शाळेला दांडी मारून या खड्ड्याच्या परिसरात खेळत होता. त्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पडलेला बॉल काढण्यासाठी रेहान गेला असता बॉल हाती लागला नाही, मात्र त्या बॉलने रेहानचा जीव घेतला.
रेहान घरातून शाळेत जाण्यासाठी निघाला मात्र तो शाळेत पोहोचलाच नाही. त्या खड्ड्यातील साचलेल्या पाण्यात बुडून रेहानचा मृत्यू झाला. घटनास्थळी शाळेची बॅग आढळून आली. याच बॅगेवरून रेहानच्या नातेवाइकांनी रेहानची ओळख पटवण्यात आली आहे.