ठाणे : ठाण्यात एकाचवेळी इन्फ्ल्युएंझा आणि कोरोनाची लागण झालेल्या वृद्धाचा बुधवारी मृत्यू झाला. तर आठवडाभरात कोरोनामुळे तिघांचा मृत्यू झाला आहे. या वृत्तास ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान, ठाण्यात सर्वसामान्यांच्या मनात मात्र यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ठाण्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ होण्याबरोबरच ‘एच३एन२’ इन्फ्ल्युएंझा या आजाराचे रुग्णही आढळत आहेत. यामुळे शहराची आरोग्यचिंता वाढल्याचे चित्र आहे. शुक्रवारी ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोनाचे २६ नविन रुग्ण आढळून आले. तर इन्फ्ल्युएंझाचे ३ रुग्ण आढळले. आज एकाचा मृत्यू झाला. मात्र मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात इन्फ्ल्युएंझाचे २२ रुग्ण असून सरकारी ओपीडी उपचार ७ रुग्णांवर करण्यात आले. तर खासगी रुग्णालयात १३ रुग्ण उपचार घेत आहेत.
जिल्ह्यात कोरोना सक्रीय रुग्णांची संख्या ३०६ इतकी झाली आहे. त्यापैकी २०६ रुग्ण हे एकट्या ठाणे महापालिका क्षेत्रातील आहेत. तर, कल्याण-डोंबिवली शहरात २५, नवी मुंबई शहरात २८, उल्हासनगर शहरात ३, भिवंडी शहरात १८, मिरा-भाईंदर शहरात १० आणि ग्रामीण भागात १६ इतके सक्रीय रुग्ण आहेत.
दरम्यान, मृत्यू झाला त्या वृद्धांना सहव्याधी होत्या. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांना ‘एच३एन२’ इन्फ्ल्युएंझा या आजाराचीही लागण झाल्याचे वैद्यकीय तपासणी अहवालातून उघड झाले होते. ‘एच३एन२’ इन्फ्ल्युएंझा या आजाराचे आतापर्यंत १९ रुग्ण शहरात आढळून आलेले आहेत. त्यातच बुधवारी या आजारामुळे एकाचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे.
‘एच३एन२’ इन्फ्ल्युएंझा आणि कोरोना हे दोन्ही श्वसनाचे आजार आहेत. ताप, खोकला आणि श्वास घेण्यात अडचण यांसह प्रत्येक विषाणूची लक्षणे ओव्हरलॅप होऊ शकतात. जर एखाद्या व्यक्तीला एकाच वेळी या दोन्ही विषाणूंचा संसर्ग झाला असेल, तर त्याचा परिणाम अधिक गंभीर लक्षणे आणि गुंतागुंत होऊ शकतो, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. लसीकरण हाच यावरील उपाय आहे.