भारताचे सामने पाकिस्तानबाहेर खेळविले जाण्याची योजना
कराची (वृत्तसंस्था) : आगामी आशिया चषक क्रिकेट स्पर्धा पाकिस्तानाच होण्याची शक्यता आहे. मात्र त्यासोबतच भारतीय संघाच्या सहभागाबाबतचा प्रश्नही सुटण्याची दाट शक्यता आहे. कारण भारताचे सामने पाकिस्तानबाहेर खेळविले जाण्याची योजना आहे. त्यामुळे भारताला पाकमध्ये न जाताही आशिया चषक स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.
आशिया चषक स्पर्धेच यजमानपद आपल्याकडे घेण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने उपाय शोधला आहे. त्यानुसार आशिया कप २०२३मध्ये सहभागी होणारा भारतीय क्रिकेट संघ आपले सामने दुसऱ्या देशात खेळेल अशी ही योजना आहे. भारतीय क्रिकेट संघ युएई, ओमान, श्रीलंका किंवा इंग्लंड यापैकी कोणत्याही एका देशात आपले सामने खेळणार आहे.
आशिया कपसंदर्भात टीम इंडियाच्या सामन्यांचे ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही. वृत्तसंस्थेने आपल्या अहवालात या संपूर्ण योजनेची माहिती दिली. भारतीय क्रिकेट संघाच्या सामन्यांचे ठिकाण ठरवण्यासाठी त्या देशातील हवामानाची विशेष काळजी घेतली जाईल, असेही पीसीबीने म्हटल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
आशिया चषक स्पर्धेत यंदा केवळ ६ संघ सहभागी होणार आहेत. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि एक क्वालिफायर टीम यंदा आशिया कपमध्ये खेळताना दिसणार आहेत. या सर्व टीम दोन गटात विभागल्या जाणार आहेत. दोन्ही गटांतर्गत ६ संघांमध्ये एकूण ६ सामने खेळवले जाणार आहेत.