फलंदाज नितीश राणा सरावादरम्यान जखमी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयपीएलचा आगामी हंगाम सुरू होण्यापूर्वीच कोलकाता नाईट रायडर्सच्या अडचणीत वाढ होत आहे. दुखापतींचा पाठलाग सुटण्याचे नाव घेत नाही. श्रेयस अय्यर, लॉकी फर्ग्युसन यांच्या पाठोपाठ नितीश राणाही जखमी झाल्याचे समजते. सरावादरम्यान त्याला दुखापत झाली.
कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या खेळाडूंनी घरच्या मैदानावर ईडन गार्डन्सवर सराव सुरू केला असून, यामध्ये आतापर्यंत संघातील अनेक महत्त्वाचे खेळाडू सामील झाले आहेत. एका स्पोर्ट्स वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, सराव सत्रादरम्यान स्टार फलंदाज नितीश राणाच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली. नेटवर फलंदाजीचा सराव करताना राणाला दुखापत झाली होती. नितीश राणाने आधी नेट प्रॅक्टीसदरम्यान वेगवान गोलंदाजांचा सामना केला, तर दुसऱ्या बाजूला फिरकी गोलंदाजांचा सामना केला, त्यानंतर तो थ्रो-डाऊनचा सराव करण्यासाठी जात असताना त्याच्या डाव्या गुडघ्याला चेंडू लागला. यानंतर नितीशला तत्काळ मैदानाबाहेर नेण्यात आले. त्यानंतर त्याने पुढील सरावात भाग घेतला नाही.
आयपीएलच्या आगामी हंगामात केकेआरचा संघ २ एप्रिल रोजी पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. मात्र, त्याआधी फ्रँचायझीला श्रेयस अय्यरच्या जागी नव्या कर्णधाराच्या नावाची घोषणा करावी लागणार आहे.
धोनीच्या सरावाचा व्हीडिओ शेअर
आयपीएलच्या १६व्या हंगामाला काही दिवस शिल्लक असताना संघांतील खेळाडू तयारीला लागले आहेत. चेन्नई सुपर किंग्सचा संघही सराव करत असून त्यांचा स्टार खेळाडू महेंद्र सिंह धोनी फलंदाजी आणि गोलंदाजी करत आहे. चेन्नई सुपर किंग्सने धोनीचा एक व्हीडिओ शेअर केला आहे. त्यात धोनी फलंदाजी आणि गोलंदाजी करताना दिसत आहे.
चेन्नई सुपर किंग्सने शेअर केलेल्या धोनीच्या व्हीडिओत तो दोन वेगवेगळे शॉट्स खेळत आहे. पहिल्या शॉटमध्ये धोनी बॉलिंग करताना दिसत आहे, तर दुसऱ्या शॉटमध्ये तो बॅटिंग करून मोठा शॉट मारताना दिसत आहे.
संदीप शर्मा राजस्थानच्या ताफ्यात?
आयपीएलला काही दिवस शिल्लक असताना जखमी आणि अनुपलब्ध खेळाडूंचे बदली खेळाडू मिळविण्याला वेग आला आहे. राजस्थान रॉयलला वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाचा पर्यायी गोलंदाज शोधायचा आहे. दरम्यान लिलावात कोणाही खरेदी न केलेला संदीप शर्मा राजस्थानची जर्सी परिधान करून संघासोबत प्रवास करताना दिसला. त्यामुळे कृष्णाचा तो पर्यायी खेळाडू असल्याचे बोलले जात आहे. मात्र त्याबद्दल राजस्थानकडून अधिकृत घोषणा झालेली नाही.