- मंगला गाडगीळ: मुंबई ग्राहक पंचायत
गेल्या आठवड्यात १५ मार्च हा दिवस जागतिक ग्राहक हक्क दिन म्हणून जगभरात साजरा केला गेला. १९८३ साली ग्राहक चळवळीतील कार्यकर्ते, अन्वर फजल यांनी आंतरराष्ट्रीय दिवसाची कल्पना मांडली. ग्राहकांच्या हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक ग्राहक हक्क दिनाची योजना करण्यात आली. तो दिवस दर वर्षी १५ मार्च असेल, असे कन्झ्युमर इंटरनॅशलने (ग्राहकांची जागतिक संघटना) ठरवले. जगातील प्रत्येक जण ग्राहक असल्यामुळे सर्वार्थाने जागतिक ग्राहक दिन म्हणजेच १५ मार्च हा आपला दिवस.
यंदा या दिन वैशिष्ट्याचे ४०वे वर्ष साजरे झाले. अशा प्रकारे साजरे करण्याने संपूर्ण जग एकत्र येते. आपण आपल्या स्थानिक समस्यांकडे जागतिक दृष्टिकोनातून पाहू शकतो, त्यासाठी राष्ट्रीय मोहिमा आखू शकतो. जगभरातील ग्राहक संघटनांच्या अनुभवातून काहीतरी नवीन अंगीकारू शकतो आणि आपल्या संस्थेचा आवाज जागतिक पातळीवर पोहोचवू शकतो. ज्या मुद्द्याकडे सर्वांचे लक्ष वेधायचे, अशा मुद्द्याची कन्झ्युमर इंटरनॅशल त्या वर्षी घोषणा करते. उदा. २००७ साली कन्झ्युमर्स इंटरनॅशनलच्या (सीआय) नेतृत्वाखाली, औषधांच्या जाहिराती आणि त्यांचे अनैतिक विपणन यांच्या विरोधात ग्राहक चळवळ एकवटली. औषधे आणि आरोग्यासंबंधी माहिती पारदर्शकपणे समोर यायला हवी असा मुद्दा मांडला गेला. २०१५ साली चौरस आहाराचा तर २०१६ साली अँटिबायोटिक्सचा मुद्दा ऐरणीवर आणला. ऑनलाइन आर्थिक व्यवहार वाढत असल्याने २०२२ साली ‘फेअर डिजिटल फायनान्स’ या मुद्यावर भर दिला होता.
या वर्षी हरित ऊर्जा किंवा ‘ग्रीन एनर्जी’ या विषयावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. म्हणूनच यंदाची घोषणा ‘स्वच्छ ऊर्जेतील संक्रमणातून ग्राहकांचे सक्षमीकरण’-‘Empowering Consumers Through Clean Energy Transitions’. अशी आहे. आपल्याला दिसतच आहे की २०२२पासून जागतिक पातळीवर ऊर्जेच्या किमती ५०% ने वाढल्या आहेत. या वर्षी त्या आणखी वाढतील. एक ऊर्जा महाग झाल्यावर, त्याचा जीवनमानावर मोठाच परिणाम होत असतो. ग्राहकांना जीवनावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. एक सर्वेक्षण सांगते की उर्जेवरचा खर्च भागवताना ८०% पेक्षा जास्त ग्राहकांची धावपळ होत आहे. शिवाय त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे हवामान बदल रोखण्यासाठी, शाश्वत आणि आधुनिक ऊर्जा महत्त्वाची ठरणार आहे कारण ऊर्जा वापरातील बदल, भविष्यातील हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी उपयोगी पडणार आहे. या विषयावर एक परिषद झाली. यात युरोपियन कमिशन, वर्ल्ड एनर्जी कौन्सिल, UNCTAD, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम तसेच आफ्रिका, झिम्बाब्वे, अरब अमिराती, अमेरिका, जर्मनी आणि भारतातील सरकारी अधिकारी उपस्थित होते. ऊर्जेचा वापर मुख्यत्वे घरात, प्रवासासाठी आणि वीज निर्मिती या क्षेत्रात होत असतो. घर म्हटले, तर ऊर्जेचा वापर घर गार/गरम ठेवण्यासाठी, अन्न शिजवण्यासाठी आणि इमारती बांधण्यासाठी होतो.
प्रवास या विषयात सार्वजनिक प्रवास सेवा, विजेवर चालणारी वाहने, चार्जिंगची व्यवस्था आणि शहरांमध्ये कुठे काय असावे? याचे व्यवस्थापन हे मुद्दे महत्त्वाचे असतात. वीज निर्मितीच्या बाबतीत विजेची एकूण मागणी, त्याचा अंदाज घेणे, गटागटाने तयार केलेली वीज व तिचा वापर, मायक्रोग्रिड्स आणि अक्षय वीज निर्मिती आदी मुद्दे महत्त्वाचे असतात. हवामान बदलाच्या आणि जागतिक तापमान वाढीच्या संकटाची तीव्रता कमी करण्यासाठी जीवाष्म इंधन वापरून मिळवलेली ऊर्जा ते आधुनिक हरित ऊर्जा हे संक्रमण होणे गरजेचे आहे. गेली सहा वर्षे सीआय याचा प्रचार आणि प्रसार करत आहे. गेल्या वर्षीच सीआयने ठरविले होते की, २०२३ मध्ये ‘ग्राहकांचे संरक्षण आणि अक्षय ऊर्जेत होणारे संक्रमण’ या मुद्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे. जगातील प्रत्येकाला वीजेची आवश्यकता असते. वीज ‘हरित’ असावी हे मात्र तितकेसे गांभीर्याने घेतले जात नाही. अशा हरित विजेसाठी विविध पर्याय बाजारात उपलब्ध असतात. ती ऊर्जा वापरण्यात काहीही त्रास नसतो. सौर ऊर्जा वापरायची, तर सुरुवातीचा खर्च बराच असतो. हा कमी कसा होऊ शकेल किंवा हा खर्च केला जरी, तरी अंतिमतः ही ऊर्जा कशी स्वस्त पडते किंवा या उपकरणांचा रखरखाव कसा केला पाहिजे हे ग्राहकांना हरित ऊर्जेकडे वळवण्यातील महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्याबद्दलची समग्र माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. या बाबतीत बऱ्याच देशांत काम चालू झाले आहे.
नेदरलँड्समध्ये एक लाखावर ग्राहक हरित ऊर्जेच्या वापराकडे वळले आहेत. झिम्बाब्वे या देशात तेथील ऊर्जा नियामक मंडळ (ZERA) शहरी भागात स्वच्छ ऊर्जेची माहिती देणारी मोहीम चालवत आहेत. इंग्लंडमधील विच (WHICH) ही ग्राहक संघटना सरकारबरोबर काम करत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे हरित ऊर्जेवर कशी चालेल यासाठी प्रयत्न करत आहे. येमेनसारख्या देशात यादवी माजलेली असली तरी तेथील ग्राहक संघटना सौर ऊर्जेचा प्रचार आणि प्रसार जोरात करताना दिसत आहे. दक्षिण अमेरिकेतील चिली या देशात औष्णिक वीजनिर्मिती कमी करून स्वच्छ आणि अक्षय वीजनिर्मिती कशी होईल? यासाठी प्रयत्न चालू आहेत. आपल्या भारत देशातही याबाबत प्रचार आणि प्रसाराचे काम जोरात चालू आहे. सीआय या ग्राहक संघटनेचे १०० देशातील २०० वर ग्राहक संघटना सभासद आहेत. संघटनेचे ब्रिदवाक्यच मुळी ‘Coming together for a change’ ‘परिवर्तनासाठी एकत्र येऊ या’ असे आहे. ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी’ या केशवसुतांच्या कवितेच्या ओळीप्रमाणे आपणही औष्णिक ऊर्जेला रामराम करत हरित ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करण्याचा प्रयत्न करू या. ऊर्जेच्या बाबतीत आपण आपल्यात परिवर्तन घडवून आणू या.