मुंबई (वार्ताहर) : ग्रँट रोड येथे माथेफिरूने शेजारी राहणाऱ्या पाच जणांवर चाकूने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. चेतन गाला असे या आरोपीचे नाव असून डी.बी. मार्ग पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
ग्रँट रोड येथील पार्वती मॅन्शन इमारतीत दुपारी ३.३० च्या सुमारास ही घडली. ५४ वर्षीय आरोपी चेतन गाला हा हा मानसिक तणावात असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार, चेतन गाला याच्या कुटुंबीयांनी त्याला सोडले आहे. त्याच्या शेजाऱ्यांनी कुटुंबाला भडकवल्याचा संशय त्याच्या मनात होता. त्याच कारणाने तो मानसिक तणावात होता. याच रागातून शुक्रवारी शेजारील घरात जात कुटुंबातील सदस्यांवर चेतन याने हल्ला केला. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला. जखमीवर गिरगावातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी चेतन गाला याला अटक केली. त्याच्यावर कलम ३०२ नुसार डीबी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.