Friday, October 4, 2024
Homeताज्या घडामोडीशिवसेनेच्या संसदीय नेतेपदी गजानन किर्तीकर

शिवसेनेच्या संसदीय नेतेपदी गजानन किर्तीकर

संजय राऊत यांची हकालपट्टी

नवी दिल्ली : शिवसेनेने खासदार संजय राऊत यांची संसदीय नेतेपदावरून हकालपट्टी करत त्यांच्या जागी गजानन किर्तीकर यांची नियुक्ती करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने गुरुवारी ठाकरे गटाला जोरदार झटका दिला. गजानन किर्तीकर यांच्या नियुक्तीचे अधिकृत पत्र लोकसभा अध्यक्षांना सोपवण्यात आले आहे.

एकनाथ शिंदे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना एक पत्र पाठवले आहे. त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, ‘२१ फेब्रुवारी २०२३ रोजी मुंबई येथे शिवसेना कार्यकारिणीची बैठक पार पडली. त्यात संजय राऊत येथून पुढे संसदेतील शिवसेना पक्षाचे नेते नसतील असा एकमताने निर्णय घेण्यात आला. त्यांच्या जागी गजानन किर्तीकर यांची या पदावर निवड केली जावी. आमच्याकडे बहुमत असल्याने, संजय राऊत यांना या पदावरून दूर केले जावे.’

दरम्यान, “शिवसेना पक्षाच्या संसदीय गटनेतेपदी नियुक्ती करीत माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल शिवसेना मुख्यनेते मुख्यमंत्री शिंदे तसेच संसदेतील सर्व शिवसेनेतील सहकाऱ्यांचे मी व्यक्तिशः आभार मानतो”, असे ट्विट नियुक्तीनंतर किर्तीकर यांनी केले आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिल्यानंतर सर्व महत्वाच्या पदावरून ठाकरे गटाच्या नेत्यांची हकालपट्टी करण्याचे काम शिंदे गटाकडून केले जात आहे. काही दिवसांपूर्वी संसदेतील पक्ष कार्यालयातून उद्धव आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो हटवून त्याजागी स्व.आनंद दिघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो लावण्यात आले होते. शिवसेनेतील बंडानंतर काही काळ ठाकरे गटासोबत असलेले किर्तीकर यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला होता. आता त्यांना शिंदे गटाने मोठी जबाबदारी दिली आहे.

उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांची शिवसेनेच्या संसदीय नेतेपदी नियुक्ती केली होती. त्यासंबंधीचे नियुक्तीपत्र त्यांनी लोकसभेच्या तत्कालीन अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना पाठवले होते. पण शिवसेनेच्या बंडाळीनंतर ठाकरे व शिंदे गटातील संघर्ष टोकाला गेला आहे. खासदार संजय राऊत यांनी ठाकरे गटातर्फे किल्ला लढवताना मुख्यमंत्री शिंदे व त्यांच्या शिवसेनेवर टीकेची झोड उठवली आहे. त्यांच्या या टिकेला ब्रेक लावण्यासाठी त्यांची संसदीय नेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -