नाशिक सायबर पोलिसांनी उत्तरप्रदेशातून संशयितांच्या बांधल्या मुसक्या
नाशिक (प्रतिनिधी): सोशल मीडियामुळे जग जवळ आले असे आपण नेहमीच म्हणतो. जग व जगातील चांगले लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून नक्कीच आपल्या जवळ आले असतील. परंतु यासोबतच काही अपप्रवृत्ती देखील आपल्या आजूबाजूला सोशल मीडियावर आहेत ज्या माणसाच्या अज्ञानाचा, लालचीपणाचा गैरफायदा उचलून त्यांची फसवणूक करण्यास पूर्णपणे सज्ज असतात. अशीच काहीशी घटना नाशिक मधील एका उद्योजक महिलेसोबत घडली आहे. याबाबत नाशिक सायबर क्राईमच्या वतीने तमाम सोशल मीडिया वापरणाऱ्या नागरिकांना बचावाचा सल्ला देखील देण्यात आला आहे.
नाशिक शहरात राहणाऱ्या सविता अविनाश पवार यांचा कॉस्मेटिक प्रोडक्टस् बनवण्याचा घरगुती व्यवसाय आहे. फेसबुकवर Vyaapaar infoIndia private limited ह्या फेसबुक पेजला सविता यांनी लाईक केले होते. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या फेसबुक पेजवर अपलोड केलेल्या प्रॉडक्ट्स बाबत फसवणूक करणाऱ्याने अनेक वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून सविता यांना व्यवसाय वृद्धीसाठी आम्ही आपल्याला मदत करू शकतो हे वेगवेगळ्या माध्यमातून सांगऱ्याचा पअत्न केला. आम्ही आपली कमाई वाढवण्यासाठी आपणास योग्य तो प्लॅटफॉर्म मिळवून देऊ शकतो, मात्र त्या बदल्यात २६ हजार रुपये भरून आपल्याला आमच्याकडे आपली अधिकृत नोंदणी करावी लागेल असे सांगण्यात आले. मात्र सविता यांनी ही रक्कम भरण्यास नकार दिल्यानंतर फसवणूक करणाऱ्याने वेळोवेळी पुन्हा त्यांना कॉल करून नंतर किमान एक हजार रुपये भरून आपण नोंदणी करू शकतात असे सांगितले व आम्ही आपल्या प्रॉडक्टची जाहिरात ही फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब या माध्यमांवर करू व आपणास आपल्या प्रॉडक्टच्या विक्रीसाठी ग्राहक देखील उपलब्ध करून देऊ असे सांगितले. तसेच आपले प्रॉडक्ट विकत घेण्यासाठी आमच्याकडे मोठमोठे खरेदीदार उपलब्ध आहेत. मात्र आपल्याला ऑनलाइन पेमेंट स्वीकारण्याकरिता गेटवे लिंक तयार करावी लागेल व ही लिंक तयार करण्यासाठी तुमच्या ‘पेमेंट गेटवे’चे लिमिट वाढवावे लागेल अशा भूलथापा मारल्या. सविता पवार या संबंधित भामट्याच्या बोलण्याला बळी पडल्या व वेळोवेळी त्यांनी पवार यांच्याकडून ऑनलाइन पाच लाख १३ हजार दोनशे रुपये घेतले. मात्र आपली फसवणूक झाली आहे असे पवार यांना जाणवल्यानंतर त्यांनी नाशिक शहर आयुक्तालयातील सायबर क्राईम या ठिकाणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला.
सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत फसवणूक करण्यासाठी वापरण्यात आलेल्या Vyaapaar infoIndia private limited या कंपनीची माहिती घेतली असता सदरच्या कंपनीचा डायरेक्टर हे नितीश रमेश कुमार रा. खोडा कॉलनी, गौतम बुद्ध नगर, गाजियाबाद, उत्तर प्रदेश व राज सोमवीर राघव रा. शिवपुरी, न्यू विजय नगर, गाजियाबाद, उत्तर प्रदेश येथील असल्याचे निष्पन्न झाले. ह्या संशयीतांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्या कामी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली, पोलीस उपनिरीक्षक संदीप बोराडे, शहाजी भोर, चंद्रकांत पाटील व इतर कर्मचाऱ्यांनी तांत्रिक विश्लेषण शाखेचा आधार घेत संशयित आरोपी नितीश रमेश कुमार यास गाजियाबाद येथून अटक केली व तेथील स्पेशल कोर्टमध्ये हजर करून ट्रान्झिट ऑर्डर मिळवत नाशिक येथे घेऊन आले. येथील न्यायालयात संशयितास हजर केले असता न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सायबर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी करत आहेत.