म्हणाले तुम्ही देवावर हात ठेवा आणि…
सिंधुदुर्ग: मागील काही काळामध्ये आमदार वैभव नाईक शिंदेसोबत यायला तयार होते, मात्र त्यासाठी त्यांनी राणे जर कुडाळ – मालवण मधून निवडणूक लढणार नसतील आणि मला कुडाळ – मालवण मधून तिकीट मिळणार असेल तर मी यायला तयार आहे, अशी अट टाकल्याचा गौप्यस्फोट भाजप प्रदेश सचिव तसेच माजी खासदार निलेश राणे यांनी केला. यावेळी त्यांनी वैभव नाईक असं बोलले की नाही? असा सवाल करत ते ज्या मंदिरात सांगतील त्या मंदिरात मी यायला तयार आहे. त्यांनी देवावर हात ठेवून सांगावं ही चर्चा झाली की नाही, असं आवाहनच दिलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वारंवार भेटणाऱ्या वैभव नाईकचा निष्ठा या शब्दाशी काहीही संबंध नाही. त्यामुळे निष्ठेच्या वार्ता वैभव नाईक याने करू नये. असाही जोरदार प्रहार वैभव नाईक यांच्यावर निलेश राणे यांनी केला. निलेश राणे म्हणाले, नाईक तुम्ही शिंदे साहेबांकडे किती वेळा जाऊन काय काय बोललात? किती कामे करून घेतली? कधी कुठे कुठे कसे भेटलात? हे सगळ्यांना माहित आहे त्यामुळे तुम्ही निष्ठेच्या वार्ता करु नका.
माजी खासदार निलेश राणे व वैभव नाईक यांच्यातील राजकीय वाद काही जुना नाही. मात्र वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत आपली कामे करून घेतली. असे असताना ते उद्धव ठाकरे यांचा निष्ठावंत कार्यकर्ता असल्याचं सांगतात. मात्र, स्वतःच राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी, मी आमदार राहिलो पाहिजे या गणितामुळे त्यांना उद्धव ठाकरेंशी देणंघेणं नाही असं खळबळजनक विधान माजी खासदार निलेश राणे यांनी केलं आहे.