आमदार नितेश राणेंचा सनसनाटी गौप्यस्फोट
नितेश राणेंनी जाहीरपणे नाव आणि सगळा घटनाक्रमच सांगितला.
मुंबई: काल शिवाजी पार्कवर झालेल्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय लघू, सुक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना सोडण्यामागे नेमका कोणाचा हात होता, या बाबत त्या व्यक्तीचे नाव न घेत सुचक वक्तव्य केले. यावर आज आमदार नितेश राणे यांनी त्या व्यक्तीचे नावच जाहीरपणे सांगितले. नितेश राणे यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना बाळासाहेबांच्या मागून कुजबूज करणारे ते उद्धव ठाकरेच होते असे स्पष्ट केले.
नितेश राणे म्हणाले, आपल्यामुळे ठाकरे पिता पुत्रांमध्ये भांडण नको म्हणून त्यावेळी नारायण राणे यांनी शिवसेना सोडली. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंना धमकी दिली की जर तुम्ही नारायण राणेंना परत घेतले तर मी बायको आणि मुलांना सोबत घेऊन मातोश्री सोडून निघून जाईन. पुत्र प्रेमापोटी बाळासाहेब ठाकरे हतबल झाले व त्यांनी राज ठाकरे यांना सांगितले की नारायण राणे यांना परत बोलवू नका!
नितेश राणे पुढे म्हणाले, की बाळासाहेब देव माणूस होते. त्यांना सोडणे नारायण राणे यांना खूप जड गेले. आता उद्धव ठाकरे हे केवळ सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र सोडून गेलेले नारायण राणे, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच व्यासपीठावर आले व त्यांनी गौप्यस्फोट केला तर उद्धव ठाकरे यांना तोंड दाखवणे कठीण जाईल. त्यानंतर जनताच त्यांना त्यांची जागा दाखवेल असेही ते म्हणाले. काल शिवतीर्थावर राज ठाकरे म्हणाले ते वास्तववादी सत्य होते. शिवसेना संपवण्यास उध्दव ठाकरेच जबाबदार असल्याचेही नितेश राणे यांनी सांगितले.