नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मागील २४ तासांत देशात १३०० नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. वातावरण बदलामुळे सर्दी ताप आणि खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे, त्यामुळे कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. त्यातच एच३एन२ च्या विषाणूने डोके वर काढले आहे, त्यामुळे नागरिकांचा धोका दुप्पट झाला आहे.
मागील २४ तासात देशभरात तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात या राज्यातील प्रत्येकी एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
देशात गेल्या २४ तासात महाराष्ट्रात १२५ सक्रिय रुग्णांची वाढ महाराष्ट्रात झाली आहे. याशिवाय गुजरातमध्ये १०६, दिल्ली ६१, केरळ ५२, तामिळनाडू ३९, हिमाचल प्रदेश २५, राजस्थान २०, गोवा १६, हरियाणा १४, उत्तराखंड नऊ, कर्नाटक आठ, आंध्र प्रदेश आणि ओडिशा प्रत्येकी पाच, जम्मू आणि काश्मीरचे केंद्रशासित प्रदेश आणि झारखंडमध्ये प्रत्येकी चार, बिहार, चंदीगड आणि पंजाबमध्ये प्रत्येकी दोन, मेघालय, सिक्कीम आणि उत्तर प्रदेशमध्ये अनुक्रमे प्रत्येकी एक प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या ७,६०५ इतकी झाली आहे. उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण रुग्ण संख्येच्या ०.०२ टक्के इतके आहे. रुग्ण बरे होण्याचा दर सध्या ९८.७९ टक्के इतका आहे.
गेल्या २४ तासात ७१८ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत देशातील बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४,४१,६०,९९७ इतकी झाली आहे. देशातील दैनंदिन कोरोना पॉझिटिव्हिटी दर १.४६ टक्के इतका आहे. सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर १.०८ टक्के इतका आहे.
राज्यात ३३४ कोरोना रुग्णांची नोंद
राज्यात बुधवारी कोरोनाच्या ३३४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या आता १ हजार ६४८ वर गेली आहे. तर कोविडबाधित एका रुग्णाचा आज मृत्यू झाला आहे. राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. त्यापाठोपाठ मुंबई, ठाण्यात अधिक रुग्ण आहे. पुण्यात ४९६, मुंबईत ३६१ आणि ठाण्यात ३१४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
दरम्यान, जगात कोविडची ९४ हजार नवीन प्रकरणे समोर आली आहेत. अजूनही ही जागतिक महामारी संपलेली नाही कारण नवीन प्रकरणे समोर येत आहेत. जगातील १९ % प्रकरणे अमेरिकेतून, १२.६ % रशियातून आणि १ % जगातील प्रकरणे आपल्या देशात आहेत, असे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले.