राज ठाकरेंनी बिंगच फोडलं
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज गुढीपाडवा सभेची तोफ धडाडलीच. यावेळी त्यांनी नारायण राणे यांनी शिवसेना सोडून जावी यासाठी कटकारस्थान करणाऱ्याचं बिंग फोडलं. नारायण राणे त्यावेळी शिवसेना सोडून जाणार नव्हते. पण, त्यावेळी नेमकं काय घडलं? हे जाहीरपणे सांगत एकाप्रकारे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
राज ठाकरे म्हणाले “नारायण राणे बाहेर गेलेच नसते. मी त्यांना म्हणालो, मी साहेबांशी बोलतो जाऊ नका. ते मला बोलले, बोला तुम्ही साहेबांशी. मी बाळासाहेबांना फोन केला. म्हटलं, त्यांची इच्छा नाहीय. जाऊ देऊ नका. बाळासाहेब मला म्हणाले, त्यांना लगेच घरी घेऊन ये. मी नारायणरावांना फोन केला. लगेच या आपल्याला साहेबांकडे जायचंय. ते तिकडून निघाले आणि मला बाळासाहेबांचा फोन आला. अरे नको बोलवूस.”, असं सांगत राज ठाकरे यांनी पुढचा किस्सा सांगितला.
“फोनवर बोलताना मला मागून आवाज येत होता. नाईलाजास्तव मला नारायणरावांना सांगावं लागलं की, येऊ नका. ज्याप्रकारे लोकांना बाहेर काढण्याचं राजकारण चालू होतं त्याचा शेवट हा होता. त्यांचं राजकारण त्यांनाच लख लाभ.”, असं राज ठाकरे म्हणाले.