Saturday, April 19, 2025
Homeमहत्वाची बातमीहिंदू नववर्षाचे जल्लोषात स्वागत!

हिंदू नववर्षाचे जल्लोषात स्वागत!

मुंबई : राज्यात सर्वत्र गुढीपाडव्याचा सण जल्लोषात आणि मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मुंबईसह ठाणे पालघर जिल्ह्यातही नववर्षानिमित्त शोभायात्रा उत्साहात पार पडत आहेत. यावर्षी शोभा यात्रांवर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्या ना कोणत्या पक्षाचा पगडा दिसून येत आहे.

चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा निमित्त अनेक ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईसह ठाणे, डोंबिवली, कल्याण, नाशिक आणि राज्यात ठिकठिकाणी स्वागत यात्रा काढण्यात आली. तर काल पावसाने व्यत्यय आणला असला तरीही आज पून्हा नव्या जोमाने अनेक ठिकाणी भव्य दिव्य रांगोळ्या काढल्या आहेत.

मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याणमध्ये शोभायात्रा

गुढीपाडव्यानिमित्त गिरगाव, मालाड, कांदिवली, बोरीवली, घाटकोपर, वरळीसह ठाणे, कल्याण, डोंबिवलीत शोभा यात्रेत लेझीम आणि ढोलपथकांचे आयोजन करण्यात आले. हिंदू बांधव पारंपरिक धोतर-सदरा, डोक्यावर भगवा फेटा व भगिनींनी पारंपरिक नऊवारी साडी असा पेहराव करून सहभागी झाले होते. या शोभायात्रेत विविध संदेश देणारे चित्ररथ आकर्षित करत होते.

पारंपरिक वेशातील महिला व पुरुष, लेझीम-ढोलचा ताल, विविध चित्तथरारक प्रात्यक्षिके, भजनी मंडळी, दिंडी, रांगोळ्यांच्या पायघड्या, मावळ्यांच्या वेशातील घोडेस्वार, दुचाकीवरील नऊवारी नेसलेल्या तरुणी, आकर्षक चित्ररथ अशा जल्लोषाच्या वातावरणात शहरात ठिकठिकाणी नववर्षानिमित्त स्वागत यात्रांचे आयोजन करण्यात आले होते. या शोभायात्रांमध्ये तरुणाई मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्याने वातावरणात आल्हाददायक चैतन्य निर्माण झाले होते.

अनेक परिसरात भव्य रांगोळ्या काढण्यात आल्या असून त्यामधून पाणी वाचवा, स्वच्छता राखा, पर्यावरण वाचवा, पाण्याचे व्यवस्थापन, आरोग्य विषय, ऐतिहासिक, पौराणिक असे विविध संदेश देण्यात आले आहेत.

डोंबिवलीतील शोभायात्रेत मुख्यमंत्री शिंदेंनी दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

डोंबिवलीतही सकाळी पाडव्याची शोभायात्रा निघाली, यामध्ये पारंपारिक वेशभुषेत अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे देखील उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्वांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देताना सरकारची इच्छा नेमकी काय आहे हे देखील सांगितले. या राज्याचा सर्वांगिण विकास करण्यामध्ये पंतप्रधान मोदींची आपल्याला साथ मिळते आहे. डबल इंजिन सरकार वेगानं काम करत आहे. त्यामुळं सर्वसामान्यांना सुखाचे दिवस आले पाहिजेत हाच आमचा प्रयत्न असणार आहे. यामध्ये आमचा कुठलाही पर्सनल अजेंडा नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या.

कल्याण शहरात भव्य हिंदू नववर्ष स्वागत यात्रा

ऐतिहासिक कल्याण शहरात आपले सण आणि परंपरा यांच्या माध्यमातून समाजाची प्रगती यांचं महत्त्व समाजावर बिंबविण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून आज गुढीपाडव्याला भव्य नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या वर्षाच्या नववर्ष स्वागत यात्रेची संकल्पना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अशी असून याद्वारे काही घटना चित्ररथ स्वरूपात मांडण्यात आल्या.

नववर्ष स्वागत यात्रेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षाची संकल्पना

ही नववर्ष स्वागत यात्रा परंपरेनुसार सकाळी साडेसहा वाजता कल्याण पश्चिमेतील सिंडिकेट येथून सुरू होऊन नंतर कमिशनर बंगला, एमएसईबी कार्यालय, संतोषी माता रोड मार्गे मॅक्सी ग्राउंड उर्फ यशवंतराव चव्हाण क्रीडांगण, अनंत हलवाई, एचडीएफसी बँक, सहजानंद चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, शंकरराव चौक, अहिल्याबाई चौक, टिळक चौक, पार नाका, लालचौकी अशी होऊन नमस्कार मंडळ येथे सांगता करण्यात आली.

या स्वागत यात्रेत केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार विश्वनाथ भोईर, माजी आमदार नरेंद्र पवार, भाजपा शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, कल्याण संस्कृती मंचचे अध्यक्ष अॅड. निशिकांत बुधकर, रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणचे अध्यक्ष डॉक्टर सुश्रुत वैद्य, आयएमए कल्याणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील आदींसह इतर अनेक मान्यवर आणि कल्याणकर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कल्याण पूर्वेत भव्य हिंदू नव वर्ष स्वागत यात्रा

भारतीय हिंदू संस्कृती प्रमाणे सुरु होणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी बुधवारी कल्याण पूर्वेत भव्य हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

हिंदू नव वर्ष स्वागत यात्रा समिती कल्याण पूर्व यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या भव्य स्वागत यात्रेचा प्रारंभ श्री गणपती चौक, कर्मवीर दादासाहेब गायकवाड क्रिडा पटांगणा जवळील साईबाबा मंदिरासमोर सकाळी गुढी उभारून करण्यात आला. ही शोभा यात्रा मुख्य बाजार पेठेतून पुढे जुनी जनता सहकारी बँकेस समोरुन म्हसोबा चौक, तिसगांव रोड मार्गे तिसगांव नाक्यावरून तिसगांवातील तिसाई मंदीराच्या प्रांगणात आल्या नंतर या ठिकाणी यात्रेचा समारोप करण्यात आला.

या यात्रेत बासरीवाला ढोल ताशा पथक, गोंधळी, तारकानृत्य, मल्लखांब, तुळस धारी महिला, वारकरी संप्रदायाची विविध मंडळे, सायकल स्वार, स्केटींग, बैलगाड्या यांचे बरोबरच हिंदू संस्कृतीच्या परंपरेचे दर्शन घडविणारे विविध संस्था संघटनांचे चित्ररथ सहभागी झाले असल्याची माहिती स्वागत यात्रा समितीचे अध्यक्ष आमदार गणपत गायकवाड यांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -