Wednesday, April 30, 2025

महामुंबईराजकीयमहत्वाची बातमी

उद्धव यांच्यामुळेच अनेकजण पक्षातून बाहेर पडले

उद्धव यांच्यामुळेच अनेकजण पक्षातून बाहेर पडले

गुढीपाडव्याच्या संध्येला राज ठाकरेंकडून उद्धव यांचा समाचार

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात बोलताना शिवसेनेच्या सध्याच्या झालेल्या स्थितीवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाचा यावरुन झालेल्या वादानं वेदना झाल्याचं म्हटलं. उद्धव ठाकरे यांनी अनेकांना पक्षातून बाहेर पडण्यासाठी स्थिती निर्माण केल्याचं राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे म्हणाले, भाजप आणि शिवसेनेनं एकत्रितपणे निवडणुका लढल्या होत्या. मात्र, आपल्या शिवाय भाजप सत्ता स्थापन करु शकत नाही हे लक्षात आल्यावर उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिले. बाळासाहेब असते तर त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाऊ दिलं असतं का, असा सवाल राज ठाकरेंनी केला. शिवसेनेच्या आजच्या स्थितीला राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना जबाबदार धरलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील राज ठाकरे यांनी सल्ला दिला. मुख्यमंत्रिपद तुम्हाला मिळालं आहे तर शेतकऱ्यांची कामं करा, पेन्शनचा प्रश्न मिटवा, असं राज ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे जिकडं सभा घेतील तिकडे सभा घेत फिरु नका, असं राज ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्रात मागच्या सरकारच्या काळात मनसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ते गुन्हे राज्य सरकारनं मागं घ्यावेत, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली. हाजी अली समुद्रातील अनधिकृत बांधकाम येत्या महिनाभरात तोडा नाहीतर तेथे मोठे गणपती मंदिर बांधू, असा इशारा राज ठाकरेंनी दिला.

राज ठाकरे यांनी मनसैनिकांना मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा सोडला नसल्याचा संदेश आजच्या भाषणातून दिला. मनसैनिकांनी दक्ष राहावं, असं देखील राज ठाकरे म्हणाले. राज्यातील सत्तासंघर्षाचं प्रकरण सुप्रीम कोर्टात असल्यानं सरकारचं लक्ष तिकडं असल्यावरुन राज ठाकरेंनी टीका केली. आताच विधानसभा निवडणुका घेण्याचं आव्हान राज ठाकरेंनी दिलं.

Comments
Add Comment