Tuesday, October 8, 2024
Homeताज्या घडामोडीपुन्हा अवकाळीचा इशारा! शेतक-याने जगायचे कसे?

पुन्हा अवकाळीचा इशारा! शेतक-याने जगायचे कसे?

मुंबई : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळीचे ढग असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. शुक्रवार २४ मार्चपासून राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या महिन्यात दोन वेळा आलेल्या अवकाळीतून शेतकरी अद्याप सावरलेला नाही. त्यातच पुन्हा अवकाळीचा इशारा दिल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली असून शेतक-याने जगायचे कसे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

मुंबईत पुढील तीन दिवस हलक्या पावसाची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. समुद्राकडून येणाऱ्या पश्चिमी वाऱ्यांमुळे पाऊस कोसळत आहे. पुढील ४८ तासात उत्तर महाराष्ट्र, दक्षिण कोकणात विजांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. त्याशिवाय पुढील तीन दिवस महाराष्ट्रातील तापमानात दोन ते तीन अंशांची घट बघायला मिळेल, असे मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राचे प्रमुख सुनिल कांबळे यांनी सांगितले.

तसेच २४ मार्चनंतर महाराष्ट्रात पुन्हा काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुन्हा अवकाळी पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

सध्या सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर अतोनात नुकसान झाले आहे. विदर्भ, मराठवाडा अन् उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे पिकांची नासाडी झाली. कोकणात आंबा-काजूचा मोहोर गळून पडला. यातून शेतकरी अद्याप सावरलेला नाही. राज्यात अनेक ठिकाणी उभी पिके पाण्यात गेल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. सरकारकडून मदतीची घोषणा झाली पण अनेक ठिकाणी बांधावर अधिकारी पोहचले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. त्यामुळे आधीच अडचणीत सापडलेला शेतकरी आणखी संकटात जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या पावसामुळे अचानक झालेल्या वातावरण बदलांमुळे मानवी आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक ठिकाणी सर्दी, खोकल्यांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. बदलत्या हवामानामुळे आजारांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -