मुंबई: गुडीपाढव्याच्या मुहूर्तावर आंबे खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर हापूस आंबा दाखल झाल्यामुळे हापूस आंब्याचे दर खाली आले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचा गुढीपाडवा यंदा गोड होणार आहे.
नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये हापूस आंब्याची आवक यंदा दरवर्षीच्या तुलनेत जास्त आहे. सध्या दिवसाला ६० ते ६५ हजार हापूस आंब्याच्या पेट्या एपीएमसी मार्केटमध्ये येत आहेत. यामध्ये कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथून साधारण ४५ हजार हापूस आंब्याच्या पेटी येत असून १५ ते २० हजार पेट्या कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश या राज्यांतून दाखल होत आहेत.
आंबा जास्त येऊ लागला असल्याने दर सुद्धा सध्या कमी झालेले आहेत. पिकलेला हापूस आंबा ६०० ते १६०० रुपये डझन विकला जात असून हिरवा आंबा ४०० ते १ हजार रुपयाने विकला जात आहे. दरम्यान राज्यात तीन ते चार दिवस अवकाळी पाऊस पडत असला तरी कोकणात तो पडला नसल्याने आंब्यावर याचा परिणाम झालेला नाही. या वर्षी मार्च महिन्यात मोठी आवक असली तरी एप्रिलमध्ये हापूस आंब्याची आवक कमी राहिल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.
कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यातून गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत आंबा बागायतदार मोठ्या प्रमाणावर आपल्या हापूस व्यवसायाची सुरुवात करतात. यात कोट्यावधींची उलाढाल होते. यंदा आंब्याचे दर घसरल्याने गुढीपाडव्याला आमरस पुरीवर ताव मारणं सामान्यांच्या अवाक्यात आलं आहे.