मोखाडा, विक्रमगड या आदिवासीबहुल भागांमध्येही उत्पादन घ्यायला सुरुवात
जव्हार (प्रतिनिधी) : लालचुटूक स्ट्रॉबेरी म्हटले, तर डोळ्यांसमोर येते थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर. मात्र स्ट्रॉबेरीची लाली आता पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड या आदिवासीबहुल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसू लागलेली आहे. या भागांतील आदिवासी शेतकऱ्यांनी उत्पादन घ्यायला सुरुवात केली आहे, त्यामुळे त्यांच्या या कष्टाला स्ट्रॉबेरीचा गोडवा मिळाला आहे.
पारंपरिक भातशेती आणि नाचणी, वरई, उडीद अशा पिकाला बगल देत शेतकरी फळबाग लागवडीकडे वळताना आता पाहायला मिळतो. जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या ग्रामपंचायत न्याहाळे बु. पैकी गावंधपाडा येथे नुकतीच भाजप महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस डॉ. हेमंत सवरा यांच्याकडून येथील आदिवासी शेतकऱ्यांच्या स्ट्रॉबेरी शेतीची पाहणी केली असता, या स्ट्रॉबेरीच्या शेतीची प्रायोगिक तत्त्वावर येथील १० शेतकऱ्यांनी बायफ तसेच पॅनासोनिक यांच्या संयुक्त विद्यमाने शेती करण्यात आली असून, सदर शेती ही प्रत्येक शेतकऱ्याने साधारण दोन ते तीन गुंठ्यात केली आहे़ सदर शेतीला लागणारे ठिबक सिंचन, बियाणे, शेतीस लागणारे पाणी हे बायफ या शेतीविषयक काम करणाऱ्या संस्थेने शेतकऱ्यांना देऊन येथे स्ट्रॉबेरीची यशस्वी शेती करण्यात आली आहे.
या शेतीमधून दिवसाआड एक ते दोन किलो स्ट्रॉबेरीचे उत्पादन होऊन दोन हजार एवढी कमाई होत असल्याने शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता आली आहे. सदर शेतकऱ्यांना हाताला काम मिळून रोजगार उत्पन्न झाल्याने याचे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असले, तरी स्ट्रॉबेरी पीक हे अत्यल्प प्रमाणात होत असल्याने बाहेरच्या बाजारपेठेत नेण्यासाठी वाहतूक खर्च परवडत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी डॉ. सवरा यांच्याकडे केली असता, आपण ही योजना आदिवासी विकास विभागाच्या मार्फत राबविण्यासाठी प्रयत्न करून आदिवासी शेतकऱ्यांना नगदी पीक घेऊन आपली आर्थिक सक्षम कसा होईल याकडे लक्ष देऊया, असे शेतकऱ्यांना आश्वासित केले़ यावेळी पाहणीदरम्यान सुरेश कोरडा माजी सभापती जव्हार पंचायत समिती, विजय दुधेडा भाजप युवा मोर्चा सदस्य जव्हार, नीलेश मोरघा युवा मोर्चा, धावल्या दिघा माजी सरपंच न्याहाळे बू, किसन दिघा माजी सदस्य ग्रा. न्याहाळे बू., ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाबळेश्वर सारख्या थंड हवेच्या ठिकाणी मिळणारी स्ट्रॉबेरी पीक हे आता मिनी महाबळेश्वर म्हणून ओळख असलेल्या जव्हार भागात देखील यशस्वी झाले असून, त्याबद्दल बायफ तसेच पॅनासोनिक संस्थेचे व शेतकऱ्यांचे कौतुक करून आमचे तुम्हाला पूर्ण सहकार्य राहील, अशी हमी यावेळी डॉ. सवरा यांनी शेतकऱ्यांना दिली आहे़