श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास ठाणे

Share
  • सेवाव्रती: शिबानी जोशी

गुढीपाडवा हा दिवस मराठी संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. साडेतीन मुहूर्तांतील एक असलेला हा दिवस आहे. सध्या आपल्याला सर्वत्र गुढीपाडवा शोभायात्रा वाजत-गाजत काढताना दिसत आहेत; परंतु याची सुरुवात २५ वर्षांपूर्वी डोंबिवली येथे आबासाहेब पटवारी यांनी केली होती. १९९९ साली कै. आबासाहेब पटवारी यांनी डोंबिवली येथे एक अभूतपूर्व संकल्पना सत्यात उतरवली. भारतीय नववर्षाचे स्वागत करणारी स्वागतयात्रा! या संकल्पनेला डोंबिवलीकरांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि भारतीय आणि अगदी जागतिक पटलावर अनुकरणीय आणि अभिमानास्पद अशा संकल्पनेचा उदय झाला होता. आपली भारतीय संस्कृती आणि भारत-राष्ट्राविषयी अभिमान जागविणारी ‘नववर्ष स्वागतयात्रा’ ही संकल्पना! आज महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर आणि विदेशातही रुजली आहे. डोंबिवलीत सुरू झालेला हा चैतन्यमयी उपक्रम ठाण्यात करण्यासाठी आबासाहेब सातत्याने आग्रह करत होते. त्यांच्या आणि कै. मा. अच्युतराव वैद्य यांच्या प्रेरणेने ठाण्यातील काही कार्यकर्त्यांनी कौपीनेश्वर मंदिराच्या डॉ. रेगे यांच्या सहकार्याने हे शिवधनुष्य उचलायचे ठरविले.

अच्युतराव वैद्य, अरविंद जोशी, पाठक, गोखले अशा संघ कार्यकर्त्यांनी ठरवलं की आपणही अशी स्वागतयात्रा काढूया. डॉ. रेगे यांना विनंती केल्यावरून त्यांनी सुरुवातीला यात्रा काढली. तरुण पिढीला तसेच लहान मुलांना आपल्या सर्व धार्मिक आणि सांस्कृतिक सणांची माहिती व्हावी आणि लहानपणापासूनच त्यांच्यासमोर गुढीपाडव्याच्या निमित्ताने संस्कृतीचे दर्शन घडवलं तर त्यांना आपल्या संस्कृतीचा परिचय होईल या दृष्टीने गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आपल्या परंपरा आणि संस्कृतीचे दर्शन घडवत साजरा करावा अशा इच्छेने सुरू झालेल्या स्वागतयात्रेच अवकाश दरवर्षी वाढतच गेले. स्वागतयात्रेच्या तयारीसाठी समविचारी बरेच कार्यकर्ते जोडले गेले. यंदाचे निमंत्रक शंतनू खेडकर, परेश दांडेकर, कुमार जयवंत, प्रसाद दाते असे अनेकजण नोव्हेंबरपासूनच तयारीला लागतात. अक्षरशः पायाला भिंगरी लावून भेटीगाठी, शहरात विविध भागांत संपर्क अशी बरीच कामे करत असतात. ठाण्याची एकूण व्याप्ती आता खूप वाढली आहे. अफाट विस्तार झाला आहे. तिथल्या लोकांनाही हा आनंद घेता यावा म्हणून विस्तृत पसरलेल्या ठाण्यात कै. विद्याधर आपटे यांच्या संकल्पनेतून निरनिराळ्या भागांत संपर्क सुरू केला गेला. ठाण्यात सुरुवातीला जवळपास ११ ठिकाणी पूर्व-संध्येला दीपोत्सवांचे आयोजन सुरू झाले आणि त्यातूनच कळवा, वसंत विहार, ब्रह्मांड, ठाणे पूर्व, वर्तकनगर, वागळे इस्टेट, घोडबंदर-पातलीपाडा अशा ७ उप-यात्राही सुरू झाल्या. या यात्रांना केवळ मिरवणुकांचे स्वरूप न येता यातून समाजप्रबोधन व्हावे, समाजातील सर्व स्तरांचा सहभाग व्हावा व राष्ट्रीयतेचा संदेश मिळावा, यासाठी सतत प्रयत्न केले जातात. कोरोना-महामारीमुळे निर्बंध आल्यामुळे स्वागतयात्रा खंडित झाली होती. ती पुन्हा नव्या उत्साहाने २०२२ पासून सुरू झाली आहे. ही स्वागतयात्रा ठाण्याचा एक मानबिंदू ठरली आहे. सध्या उत्तम जोशी अध्यक्ष, संजीव ब्रह्मे कार्याध्यक्ष, तर अश्विनी बापट कार्यवाह म्हणून काम करत आहेत. या स्वागतयात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे यात सर्व जाती-धर्म-पंथाचा सहभाग असतो. यंदा बोहरा व पारशी समाजाचापण सहभाग असणार आहे. यंदा १६ समाजाच्या हस्ते गंगा आरती होणार आहे. यावर्षी स्वागतयात्रा उद्या सकाळी श्री कौपिनेश्वर मंदिरातून प्रस्थान करेल. यावर्षी ६० चित्ररथांची नोंदणी झाली आहे. महाराष्ट्र राज्याचे ठाणेकर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब पण यात्रेत सहभागी होणार आहेत. या वर्षीच्या स्वागतयात्रेमध्ये स्वागताध्यक्ष म्हणून यशस्वी व ठाण्यातील सुप्रसिद्ध स्पाईन सर्जन डॉ. विनोद इंगळहळीकर लाभलेले आहेत. तसेच यंदा पहिल्यांदाच ठाण्याचे जिल्हा न्यायाधीश आणि धर्मादाय आयुक्त स्वागतयात्रेत सहभागी होणार आहेत.

गुढीपाडव्याच्या आधी तीन दिवस भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन सुरू आहे. यावेळी पन्नासहून अधिक चित्ररथ, प्रबोधन करणारे १५० सायकलस्वार, मल्लखांब आणि जिम्नॅस्टिक प्रात्यक्षिके, एरियल कसरती, महिला बाईक रैली यांमधून ‘समर्थ भारत, श्रेष्ठ भारताचे’ दर्शन घडणार आहे, अशी माहिती श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासच्या ब्रह्मे यांनी दिली. यंदा आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत, त्यानिमित्ताने सर्व भारतीय पारंपरिक कला संस्कृती याचे दर्शन तसंच संवर्धन करण्यासाठीच गुढीपाडवा शोभायात्रा आयोजन करण्यात येत आहे, असं संजीव ब्रह्मे यांनी सांगितलं. स्वागतयात्रेची परिपूर्ण माहिती देणारे संकेतस्थळही तयार केले आहे. स्वागतयात्रेच्या निमित्ताने संस्कार भारती, ठाणे संस्थेच्या वतीने रांगोळी स्पर्धा आहे, तर स्वागतयात्रेच्या दिवशी सेल्फी विथ स्वागतयात्रा, फोटोग्राफी स्पर्धा, फोटो सर्कल सोसायटीतर्फे, तर पारंपरिक वेशभूषा, चित्ररथ स्पर्धा श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासतर्फे आयोजित करण्यात आली आहे. ठाण्यात शास्त्रीय नृत्य शिकवणाऱ्या अनेक संस्था आणि अनेक दिग्गज गुरू आहेत. रविवारी नृत्यधारा कार्यक्रमात ठाण्यातील विविध नृत्यसंस्थेच्या विद्यार्थिनी आणि त्यांच्या नृत्यगुरूनी नृत्य सादर केले. काल गंधार भालेराव यांचे बासरीवादन, पंडित मुकुंदराज देव यांच तबला वादन तसंच पंडित शैलेश भागवत यांचं सनई वादन झालं. पुण्याच गीता धर्म मंडळ इथल्या विद्यार्थ्यांचं भगवद्गीता पठण होईल, तर इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांचे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज या विषयावर व्याख्यान आयोजित केले. स्वागतयात्रेत पारंपरिक वेश करून १०० हून अधिक महिलांची बाईक रैली तसंच १५० सायकल स्वार निघणार आहेत. सुमारे ५० हून अधिक चित्ररथ सहभागी होणार असून ‘सामाजिक’, ‘सांस्कृतिक’, ‘शैक्षणिक’, ‘पर्यावरण’, ‘घनकचरा व्यवस्थापन’, ‘प्लास्टिक बंदी’, अवयवदानावर जनजागृती करणारे चित्ररथ असणार आहेत. त्याचप्रमाणे साडेतीन शक्तिपीठांचा चित्ररथ, डॉ. बेडेकर विद्या मंदिरचा ‘माझी शाळा, मराठी शाळा’ यांसारखे नावीन्यपूर्ण विषय हाताळणी करणारे चित्ररथ हे आकर्षण ठरणार आहेत. ठाण्यातील प्रसिद्ध स्पायीन सर्जन डॉ. विनोद इंगळहळीकर, “पद्मविभूषण” पंडिता, विदुषी डॉ. एन् राजम् विशेष अतिथी म्हणून स्वागत-यात्रेत सहभागी होणार आहेत.

“समर्थ भारत” व ” श्रेष्ठ भारत” तसेच “आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष” या विषयांवर आधारित आपली स्वागतयात्रा असणार आहे. ‘संस्कार भरती’तर्फे गावदेवी मैदान येथे १० हजार चौरस फुटांची रांगोळी साकारण्यात आली आहे. श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासचे विश्वस्त विद्याधर वालावलकर, अरविंद जोशी यासाठी अथक परिश्रम घेत आहेत. ठाण्याचे सर्व आमदार, खासदार, महापौर, नगरसेवक स्वागतयात्रेला सहकार्य व प्रोत्साहन देत असतात. वर्षातून एकदा येणारी पाडवा यात्रा करून न्यास थांबत नाही तर न्यासातर्फे अण्णा भाऊ साठे जयंती साजरी केली जाते तसेच काही दिवसांपूर्वी राजीव मल्होत्रा यांचं अभ्यासपूर्ण व्याख्यान आयोजित केलं होतं. गेल्या महिन्यात शास्त्रीय संगीतातील दर्दीना प्रत्यक्ष गायनाचा आनंद मिळावा यासाठी शास्त्रीय संगीत महोत्सव आयोजित केला होता, यात संजीव अभ्यंकर, आरती अंकलीकर, देवकी पंडित, शौनक अभिषेकी यांच्यासारख्या ज्येष्ठ कलाकारांनी रसिकांना मंत्रमुग्ध केलं होत.

थोडक्यात गुढीपाडवा स्वागतयात्रेसाठी सुरू झालेला हा न्यास आता वर्षभर विविध उपक्रम राबवत असतो आणि सर्वच उपक्रमांना ठाणेकरांची मोठ्या संख्येने उपस्थिती असते. सुरुवातीला अगदी लहान प्रमाणात सुरू झालेली ही स्वागतयात्रा आता संपूर्ण ठाण्यातील सामाजिक संस्थांना सामावून घेणारी शोभायात्रा ठरत आहे. धर्म, ज्ञाती, समाज, भाषा, प्रदेश, देश, राजकारण या साऱ्यांपलीकडे जाऊन सर्वांना एकत्र जोडणारी, विश्वधर्म जोपासणारी ही सुवर्णयात्रा आहे, असं मानून श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास वाटचाल करत आहे, करत राहणार आहे.

joshishibani@yahoo.com

Recent Posts

मुंबईकरांनो लक्ष द्या! कुर्ला ते घाटकोपर भागांत शनिवार, रविवारी पाणीकपात

महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठ्याची कामे हाती घेतली जाणार मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतर्फे घाटकोपर (पश्चिम) येथे…

43 minutes ago

Health: उन्हाळ्यात डोळ्यांचे विकार होण्याचा वाढतो धोका, डोळ्यांची घ्या अशी काळजी

ठाणे (प्रतिनिधी) : उष्म्याने ठाणेकर भलतेच हैराण झाले असून, एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा वाढत चालला…

1 hour ago

महाराष्ट्राला बालमृत्यूचे ग्रहण!

सात वर्षात १ लाखांहून अधिक नवजात बालकांचे मृत्यू मुंबई(साक्षी माने) : महाराष्ट्रात मोठ्या लोकसंख्येने जागोजागी…

2 hours ago

मेट्रो-७ अ दुसऱ्या बोगद्याचे भुयारीकरण मे अखेरीस पूर्ण होणार

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी २) ते अंधेरी पूर्व मेट्रो-७ अ या…

3 hours ago

कोकणातील तरुणाची वेगळी वाट…

माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…

8 hours ago

छोड आये हम वो गलियाँ…

वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…

8 hours ago