Wednesday, June 18, 2025

आंब्याला संकटातून बाहेर काढा

आंब्याला संकटातून बाहेर काढा

मुंबई : ‘फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा आंबा आज संकटात आहे. त्याला या संकटातून बाहेर काढावे’, असे कळकळीचे आवाहन भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार नितेश राणे यांनी सोमवारी विधानसभेत केले.


अर्थसंकल्पावरील विभागवार चर्चेत कृषी विभागावर ते बोलत होते. यंदा आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. २५ फेब्रुवारीपासून ९ मार्चपर्यंत कोकणात ३५ ते ३९ डिग्री तापमान होते. त्यामुळे अनेक ठिकाणी आंब्याचे पीक भाजून मोहोर गळून पडला. त्यामुळे प्रत्यक्षात आंब्याचा फक्त दहा टक्के माल हाती लागला आहे. एपीएमसी मार्केटमध्ये आवक वाढल्याने दलाल दर पाडत आहेत. त्यामुळे आंबा उत्पादक कर्जबाजारी होत आहे. त्यातच दक्षिणेकडील आंबा कमी भावात उपलब्ध होत असल्यामुळे कोकणातील आंबा उत्पादकांची अवस्था बिकट झाली आहे, असे ते म्हणाले.


पीक कर्जाचा हप्ता नोव्हेंबरमध्ये घेतला जातो. यामध्ये देण्यात येणाऱ्या नुकसानभरपाईचे निकष कोकणासाठी बदलणे गरजेचे आहे. कोकणासाठी फळ पिकासाठी किमान तापमान बाराऐवजी १७ डिग्री असावे, फळ पिकाच्या पीक कर्जाचा कालावधी १ ऑक्टोबर ते ६ जून असावा, अवकाळी पाऊस, हवामानातील बदल, मोहोर गळू नये म्हणून कीटकनाशकांची वारंवार होत असलेली फवारणी, याची दखलही नुकसानभरपाई देताना विमा कंपनीने तसेच सरकारने घेतली पाहिजे आणि शेवटच्या टप्प्यातील आंबा उत्पादनाचा हमीभाव निश्चित करायला हवा, असेह नितेश राणे म्हणाले.




  • आंब्याला फळमाशीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. फळमाशी पकडण्यासाठी सवलतीच्या दरात ट्रॅप उपलब्ध केले असले तरी त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अडीचशे रुपयाला एक ट्रॅप विकत घ्यावा लागतो.

  • याउलट शेतकरी पाण्याच्या बाटलीद्वारे दहा ते पंधरा रुपयांमध्ये असा ट्रॅप तयार करतात. त्यामुळे कोकण कृषी विद्यापीठातर्फे देण्यात येणाऱ्या ट्रॅपच्या किमतीवर आपण पुनर्विचार करायला हवा. त्याचप्रमाणे हवामान खात्याच्या माहितीवरही लक्ष ठेवायला हवे. अनेकदा ही माहिती चुकीची असते. त्यामुळे उत्पादकाचे नुकसान होते. स्कॅनिंगला जाणाऱ्या आंब्यालाही हमीभाव कसा देता, येईल यावर विचार व्हायला हवा.

  • कोकण कृषी विद्यापीठातील अशासकीय सदस्य नेमताना पूर्ण विचार व्हावा. अनेक सदस्य शेतकरी नाहीत तसेच ते कोकणाबाहेरचे आहेत. त्यामुळे त्यांना कोकणातील आंब्याच्या उत्पादनाबद्दल फार आकलन करता येत नाही, असेही नितेश राणे यांनी सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >