विस्डेन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप ११ संघ जाहीर
लंडन (वृत्तसंस्था) : विस्डेनने जाहीर केलेल्या २०२१-२०२३ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप ११ जणांच्या संघात भारताच्या रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत यांची वर्णी लागली आहे. संघातील यष्टीरक्षक म्हणून पंतची निवड झाली आहे. पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्या एकाही खेळाडूला संघात स्थान मिळालेले नाही.
सर्वाधिक खेळाडू ऑस्ट्रेलियाचे आहेत. त्यात सलामीवीर उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आणि फिरकीपटू नॅथन लायन यांचा समावेश आहे. याशिवाय श्रीलंकेकडून दिमुथ करुणारत्ने आणि दिनेश चंडिमल या दोन फलंदाजांना संघात स्थान मिळाले. दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा आणि इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो यांना संघात स्थान देण्यात आले.
भारताचे अव्वल फलंदाज रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली यांना संघात स्थान मिळालेले नाही.