Friday, June 20, 2025

अमेरिकेतील मेजर क्रिकेट लीगमध्ये खेळणार मुंबई इंडियन्सचा संघ

अमेरिकेतील मेजर क्रिकेट लीगमध्ये खेळणार मुंबई इंडियन्सचा संघ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयपीएलमधील दिग्गज संघ मुंबई इंडियन्स आता अमेरिकेतील मेजर क्रिकेट लीगमध्येही खेळताना दिसणार आहे. मुंबई इंडियन्सचा संघ न्यूयॉर्क संघाची धुरा सांभाळणार आहे.


अमेरिकेत होणाऱ्या मेजर क्रिकेट लीगमध्ये एकूण ६ फ्रँचायझींनी भाग घेतला आहे. त्यात भारतातील एकूण ४ फ्रँचायझींनी भाग घेतला आहे. या संघांमध्ये कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघांचा समावेश आहे. या लीगमध्ये गुंतवणूक करणारी पहिली भारतीय फ्रँचायझी कोलकाता नाइट रायडर्स होती. केकेआरने लॉस एंजेलिस संघावर बाजी लावली होती.


मुंबई इंडियन्ससाठी ही जगातील पाचवी फ्रँचायझी असेल. यापूर्वी, मुंबई इंडियन्सने आयपीएल, एमआय केपटाऊन (एसए२०), एमआय एमिरेट्स (आयएलटी २०) आणि मुंबई इंडियन्स (डब्ल्यूपीएल) मध्येही आपले संघ उतरवले आहेत.


मुंबई इंडियन्सच्या मालक नीता अंबानी म्हणाल्या की, वाढत्या एमआय कुटुंबात आमच्या न्यू यॉर्क फ्रँचायझीचे स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे. अमेरिकेच्या या पहिल्या क्रिकेट लीगमध्ये प्रवेश केल्यानंतर मुंबई इंडियन्स हा जगातील एक मोठा जागतिक क्रिकेट ब्रँड बनेल. मुंबई इंडियन्ससाठी ही एक नवीन सुरुवात आहे आणि मी पुढच्या प्रवासाची वाट पाहत आहे.

Comments
Add Comment