Saturday, January 17, 2026

सर्व(अ)ज्ञानी राऊतांच्या अडचणीत वाढ

सर्व(अ)ज्ञानी राऊतांच्या अडचणीत वाढ

बार्शी : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर एक आक्षेपार्ह फोटो ट्वीट केल्याप्रकरणी बार्शीमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. राऊत यांच्या ट्वीटनंतर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनीही राऊतांवर टीका केली होती.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीटरवर एका अत्याचारपीडित मुलीचा रक्तबंबाळ अवस्थेतला फोटो शेअर केला आहे. आपल्या ट्वीटमध्ये संजय राऊत म्हणतात, "देवेंद्रजी, हे चित्र बार्शीतले आहे. मुलगी तुमच्या कुटुंबातील नाही म्हणून तिचे रक्त वाया जाऊ देऊ नका. भाजपा पुरस्कृत गुंडांनी हा जीवघेणा हल्ला केला आहे. अल्पवयीन मुलगी पारधी समाजाची आहे.गरिबांच्या मुली रस्त्यावर पडल्या आहेत? ५ मार्चला हल्ला झाला आरोपी मोकाट आहेत."

यावर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी व्हिडीओच्या माध्यमातून संतप्त प्रतिक्रिया दिली होती. हा व्हिडीओ त्यांनी आपल्या अधिकृत खात्यावरुन ट्वीट केला होता. आपल्या ट्वीटमध्ये चित्रा वाघ यांनी संजय राऊतांनी हा फोटो व्हायरल केल्याबद्दल आक्षेप घेतला होता. तसेच महिला आयोगाला कारवाई करण्याची मागणीही केली होती.

 चित्रा वाघ यांनी गृहविभाग आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत संजय राऊतांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.
Comments
Add Comment