Wednesday, October 29, 2025
Happy Diwali

न्यूझीलंडकडून श्रीलंकेचा सुपडा साफ

न्यूझीलंडकडून श्रीलंकेचा सुपडा साफ

वेलिंग्टन (वृत्तसंस्था) : केन विल्यमसन (२१५ धावा) आणि हेन्री निकोलस (नाबाद २०० धावा) या मधल्या फळीतील फलंदाजांच्या मॅरेथॉन भागीदारीच्या जोरावर दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेचा सुपडा साफ केला. या सामन्यातील विजयामुळे न्यूझीलंडने मालिकाही २-० अशी खिशात घातली.

दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडने ५८० धावांचा मोठा डोंगर उभारला. केन आणि हेन्री यांनी दमदार वैयक्तिक द्वीशतके ठोकली. त्यानंतर १६४ धावांवर श्रीलंकेला सर्वबाद केल्यावर त्यांना फॉलोऑन मिळाला. मग दुसऱ्या डावातही श्रीलंकेचा संघ ३५८ धावाच करू शकल्याने न्यूझीलंडने एक डाव आणि ५८ धावांनी सामना जिंकला.

वेलिंग्टन येथे खेळल्या गेलेल्या या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विल्यमसनने पहिल्या डावात शानदार फलंदाजी करताना २१५ धावा केल्या. त्याचवेळी माजी कर्णधाराच्या पाठोपाठ हेन्री निकोल्सनेही २०० धावांची नाबाद खेळी केली. या दोघांशिवाय डेव्हॉन कॉन्वे ७८ धावा करून बाद झाला. न्यूझीलंडने ४ बाद ५८० धावा करून पहिला डाव घोषित केला.

न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेच्या संघाने पहिले दोन दिवस वर्चस्व गाजवले. यानंतर तिसऱ्या दिवशी किवी संघाचा वरचष्मा होता. त्यानंतर चौथ्या आणि पाचव्या दिवशी दोन्ही संघांमध्ये बरोबरीची लढत झाली. श्रीलंकेने न्यूझीलंडला विजयासाठी २८५ धावांचे लक्ष्य दिले होते. न्यूझीलंडने शेवटच्या चेंडूवर ८ विकेट्स गमावून विजयी लक्ष्य पूर्ण केले.

Comments
Add Comment