मोर्फिंग कायदे आणि आपण

Share
  • मुंबई डॉट कॉम: अल्पेश म्हात्रे

काही दिवसांपूर्वी एक बातमी वाचनात आली होती, एका पुरुषाला मसाज करण्यासाठी खासगी सेवा घेण्याची इच्छा होती, त्यासाठी त्याने मसाज पार्लरच्या जाहिराती पाहिल्या व एक जाहिरात निवडली. त्या जाहिरातीत दिलेल्या नंबरवर त्याने फोन केला. काही कालावधीनंतर त्या फोनवरून एक कॉल आला. समोर एक महिला बोलत होती, त्या समोरच्या महिलेने खात्री केल्यानंतर मसाजची खासगी सेवा देण्यासाठी त्याच्या मोबाइलवर काही महिलांचे फोटो पाठवले. ती व्यक्ती ते फोटो बघत असताना त्याला जोरदार झटका बसला, कारण एक फोटो हा त्याची बायको व बहीण यांचा एकत्रित पण आक्षेपार्ह अवस्थेतील होता. हे पाहताच त्याच्या पायाखालची वाळूच सरकली. तो माणूस समजूतदार होता, त्याने धीटपणे आपल्या बायको व बहिणीला विश्वासात घेतले व नक्की हा काय प्रकार आहे याची शहानिशा केली. त्यात या फोटोबद्दल आपणास काहीच कल्पना नसल्याचे त्या दोघींनी सांगितले. मग त्या तिघांनीही या प्रकरणाचा छडा लावण्याचे ठरवले. त्या मोबाइलवर येणाऱ्या फोनवर त्याने त्या महिलेची ओळख वाढवली व आपण भेटण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगितले व त्या महिलेशी भेटण्याची गळ घातली, मात्र या गोष्टीची शंका त्या समोरच्या महिलेला आली व ती बरेच दिवस गुंगारा देण्याच्या प्रयत्नात होती. मात्र, एक दिवस ती जाळ्यात सापडलीच. पकडल्यानंतर मात्र नंतर तिने मान्य केले व धक्कादायक गोष्टी सांगितल्या. या मागे एक मोठी टोळी कार्यरत असल्याचे तिने सांगितले. आपल्याला त्या दोघींचा फोटो मोर्फिंग करून मिळाला व आपण ते आपल्या जाहिरातीत वापरल्याचे सांगितले. या प्रकरणाने काहीही चूक नसताना त्या दोन महिलांना मनस्ताप झाला तो झालाच. आता ही गोष्ट आठवण्याचे कारण म्हणजे सध्या गाजत असलेले राजकारणातील दोन व्यक्तीचे फोटो मोर्फिंग प्रकरण.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दहिसर येथील बाईक रॅलीत शिवसेनेच्या प्रवक्त्या नेत्या शीतल म्हात्रे व मागाठाण्याचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या व्हीडिओत संवाद सुरू असताना अशोभनीय बदल करून तो समाज माध्यमात प्रसिद्ध करण्यात आला आणि सर्वत्र एकच खळबळ उडाली. राजकारणातील व्यक्तींनी काहीही केले की, लगेच चर्चेचा विषय बनतो. सार्वजनिक ठिकाणी केलेले कृत्य व्हायरल होण्यास वेळ लागत नाही. त्यात नंतर या प्रकरणाचा शिवसेना व विरोधी पक्ष यांनी राजकारणासाठी भरपूर वापर करून घेतला, एकमेकांबद्दल बरीच चिखलफेक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास, विशेष तपास पथक (एस. आय. टी.) कडे सोपवण्यात आला. यातून सत्य बाहेर येईल ते येईल. मात्र झालेल्या बदनामीचे काय, करणारा कोण, हे सर्व कोणाचे षडयंत्र हे बाहेर येईल तेव्हा येईल, यातील दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, पण आपल्या कायद्यात यासाठी तरतूद आहे का? कठोर शिक्षा आहे का? हा मोठा प्रश्न आहेच. मुळात फोटो मोर्फिंग म्हणजे काय तर मॉर्फ म्हणजे एडिट करून त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर करणे, म्हणजे एक फोटो दुसऱ्या फोटोमध्ये अथवा व्हीडिओमध्ये एकत्रित करण्याची ही प्रक्रिया आहे. हा अॅनिमेशनमधला एक प्रकार आहे. समजा, तुमच्याकडे तुमचेच दोन वेगवेगळे फोटो आहेत. तुमचा एक आणि दुसरा जोडीदाराचा, तर मॉर्फिंग सॉफ्टवेअरचा वापर करून ठरावीक सेकंदची वेळ देऊन फाईल बनवता येते. हल्ली सर्रास कोणीही हल्ली आपल्या स्मार्टफोनमधून विविध सॉफ्टवेअर वापरून व मोबाइल अॅप वापरून हा प्रकार करू शकतो. या फोटोमॉर्फिंग प्रकारचा सायबर गुन्हेगारांनी सध्या प्रचंड धुमाकूळ घातला आहे.

आज या प्रकारातील गुन्ह्याची संख्या किती तरी पटीने वाढलेली आहे. आपल्याला फोन येतो, समोरून महिला बोलते, अश्लील कृत्य करते, मग आपण फोन बंद करेपर्यंत आपला कॉल व्हीडिओ स्वरूपात बनवून तो कोणाबरोबर मोर्फिंग करून आपल्याला पुन्हा आपल्याला पाठवला जातो व तो डिलिट करण्यासाठी मोठी खंडणी मागितली जाते. विशेष म्हणजे आपल्या सामाजिक बदनामीपोटी मोठ्या प्रमाणात ब्लॅकमेल करून पैसे उकळले जातात, त्यामुळेच गुन्हेगारांचेही फावत आहे. आज मोठ्या संख्येने अशा प्रकारच्या घटना उघडकीस येत आहेत. मात्र, याला आपणच जबाबदार असतो. कारण आपल्याला असलेले कायद्याचे तोकडे ज्ञान.

शीतल म्हात्रे प्रकरणामध्ये समाजमाध्यम अकाऊंटद्वारे घृणास्पद व अश्लील व्हीडिओ व्हायरल करून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून त्याद्वारे संबंधित बदनामी केल्याचे दिसून येते. संबंधित आक्षेपार्य व्हीडिओ जाणीवपूर्वक काही व्हॉट्सअॅप ग्रुपवर वायरल केल्याने सदरचे कृत्य गंभीर प्रकारातील आहे. यात आरोपीला माहिती तंत्रज्ञान

आयटी कायदा, २००० (२००८ मध्ये सुधारित) ‘कोणत्याही व्यक्तीच्या किंवा तिच्या संमतीशिवाय त्याच्या खासगी क्षेत्राच्या’ प्रतिमांचे प्रसारण करणे हा गुन्हा ठरवला आहे. त्यासाठी त्या आरोपीस तीन वर्षे तुरुंगवास किंवा दोन लाख रुपयांपेक्षा जास्त दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. कायदा काय सांगतो? एखाद्या व्यक्तीचा चेहऱ्याचा भाग किंवा शरीराचा कोणताही भाग मॉर्फ अथवा एडिट करून विविध माध्यमांद्वारे तो इंटरनेटवर अपलोड करणं हा कायद्यान्वये गुन्हा आहे. बहुतेक वेळेस समोरच्याची बदनामी करण्यासाठीच याचा वापर केला जातो. आपल्या अज्ञानाचा फायदा घेऊन अशा गुन्हेगारांची चलती होत आहे. आपणही आता कायद्याचा अभ्यास करून धीटपणे या प्रकरणामध्ये सामोरे गेले पाहिजे. आज दुसऱ्यांवर ही वेळ आली आहे, मात्र कधी तरी आपणावर ही वेळ येणार आहे हे आपण विसरता कामा नये.

आजही सायबर गुन्हेगार आपल्यापेक्षा खूप पुढचा वेगाने विचार करतात आणि आपल्याला बरोबर जाळ्यात अडकवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपला देश सायबर क्षेत्रात खूपच प्रगती करू शकला. मात्र या सायबर क्षेत्रात गुन्हेगारी तेवढीच उदयाला आली. तंत्रज्ञानाचा जसा चांगला वापर असतो, तसा त्याचा वाईट वापरही होऊ लागला. मात्र, आता गरज आहे ती आपणच सक्षम होण्यासाठी. कदाचित आज हे दुसऱ्यावर प्रकरण आले आहे. कदाचित हे प्रकरण उद्या आपल्या बाबतीतही घडू शकते. म्हणून न घाबरता धीटपणे या प्रकरणाला सामोरे जाणे हेच आपल्या हाती आहे.

Recent Posts

वाळवंटातील बांधकाम क्षेत्रात अब्दुल्ला अ‍ॅण्ड असोसिएट्स

शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…

33 minutes ago

भारतासाठी कंटेंट हब बनण्याची सुवर्णसंधी!

वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…

39 minutes ago

काश्मीरची ढगफुटी : मानवजातीला इशारा

काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…

46 minutes ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २२ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…

52 minutes ago

Mhada House : सर्वसामान्यांना मिळणार स्वस्तात घर! म्हाडा करणार घरांच्या किंमतीत घट

किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…

53 minutes ago

Pune News : पुण्यातील गुन्हेगारीला बसणार चाप! पोलिसांचा मोठा निर्णय

पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी नंतर क्राइम शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात…

1 hour ago