आरटीई प्रवेशाच्या १ लाख जागांसाठी ३ लाखांवर अर्ज
मुंबई (प्रतिनिधी) : शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार राज्यातील खासगी शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या २५ टक्के आरटीईच्या राखीव जागांच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी अर्ज आले आहेत. १ लाख १ हजार जागा उपलब्ध असताना तब्बल राज्यभरातून तीन लाखांहून अधिक पालकांनी अर्ज केले आहेत. यावेळी आरटीई प्रवेशासाठी यंदा प्रचंड मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.
प्राथमिक शिक्षण संचालनालयाने आरटीईच्या प्रवेशासाठी १७ मार्चपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत दिली होती. मात्र अखेरच्या दिवशी असंख्य पालकांना अर्ज करताना आलेल्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन संचालनालयाने या प्रवेशासाठीची २५ मार्च रात्री १२ वाजेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. आरटीई प्रवेशासाठी राज्यातील खासगी व्यवस्थापनाच्या ८ हजार ८२८ शाळांमध्ये १ लाख १ हजार ९६९ जागा उपलब्ध आहेत. या जागांवर प्रवेशासाठी १७ मार्च रोजी राज्यभरातून तब्बल ३ लाख १४ हजार ७३१ प्रवेश अर्ज आले आहेत. दरम्यान २५ मार्चनंतर अर्ज करण्यासाठी कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही, असे शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी स्पष्ट केले.
राज्यात आरटीईच्या प्रवेशासाठी सर्वाधिक अर्ज पुणे विभागातून आले आहेत. पुणे जिल्ह्यातील १५ हजार ६५५ जागांसाठी तब्बल ६८ हजार १९२ विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. त्यानंतर सर्वाधिक अर्ज हे नागपूर जिल्ह्यातून असून जिल्ह्यातील ६५७७ जागांसाठी ३३ हजार १६५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत, तर ठाणे जिल्ह्यातून १२ हजार २७८ जागांसाठी २७ हजार ६६५ विद्यार्थ्यांनी अर्ज आले आहेत. मुंबई विभागात आरटीईच्या ६५६९ जागा असून या जागांसाठी आतापर्यंत १५ हजार ७८७ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.