- भाग्यश्री साळुंके, समुपदेशक
पुण्यात कोयत्या गँगची मोठी दहशत तयार झाली होती. पंधरा-सोळा वर्षांची मुले हातात कोयता घेऊन कोणाला धमकी द्यायला मागेपुढे पाहत नव्हती. कोण आहेत ही मुले?, त्याचा कोणी वापर तर करून घेत नाही ना?, असे असंख्य प्रश्न मनात निर्माण झाले. ज्यावेळी या प्रकरणातील माहिती समजली त्यावेळी एका वेगळ्या टोळीचा जन्म रंजक पद्धतीने झाल्याचे समजले. पुण्यातील भागा-भागांतील भाई संस्कृतीतील वर्चस्ववादातून ही गँग तयार झाल्याची माहिती पुढे आली. पण त्यासाठी अल्पवयीन मुलांचा मोठ्या चतुराईने वापर केला गेला. आठवी-नववी इयत्तेतून शिक्षण सोडलेली, घरची आर्थिक परिस्थिती खराब असलेली, वडील दारूच्या व्यसनाधिन झालेले, त्यामुळे या मुलांना कुटुंबाचा अंकुश नसलेली ही मुले काही स्थानिक गुंड प्रवृत्तीच्या जाळ्यात अलगद ओढली गेली. ही बाब आता पोलीस तपासातून पुढे आली आहे. यासंदर्भात पुणे परिसरात ५० हून अधिक गुन्ह्यांची नोंद झालेली आहे.
पोलिसांनी या टोळीकडून १०० हून कोयते जप्त केले आहेत. या प्रकरणात मुलांचा गुन्ह्यासाठी वापर करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी मोक्काअंतर्गत अटक केली आहे, तर बालगुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. ज्या आरोपींना मोक्का लावण्यात आला आहे, त्याच्याकडून आलेली माहिती की, ही लहान मुले असल्याने यांना शिक्षा कमी होईल. पोलीस त्याच्याकडे दुर्लक्ष करतील म्हणून आम्ही सोळा-सतरा वर्षांच्या मुलांचा वापर केला… किती धक्कादायक आहे ना हा जबाब. या टोळीच्या वापरात अल्पवयीन मुलांचे आयुष्य काळ्या अंधारात गेले त्याचे काय? परंतु पुणे पोलिसांनी ज्या पद्धतीने कडक कारवाईचा बडगा उगारला त्यातून आता गेल्या अडीच महिन्यांत अल्पवयीन मुलांना वापर करणाऱ्या टोळीच्या कारवाया थंडावल्या आहे. चुकीच्या मार्गावर जाणाऱ्या मुलांमध्ये आता पोलीस दादांच्या कारवाईचा आदरयुक्त भीती निर्माण झाली आहे; परंतु पोलिसांनी या गँगचा बिमोड करण्यासाठी तीन गोष्टीचा वापर केला. एक तर कठोर कारवाई. जी मुले पकडलेली होती, त्यांच्या आई-वडिलांशी संपर्क करून मुलांना सुधारण्याची संधी मिळावी आणि तिसरा महत्त्वाचा टप्पा म्हणजे समुपदेशन.
यातील काही मुलांना मी स्वत: भेटले. ‘आपण का बरे असे वागलात, आई-वडिलांना का वाटत असेल, तुमचे पुढचे भविष्य काय आहे याची कल्पना आहे का?’ असे प्रश्न विचारून त्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्या मुलांनी आपल्या चुकांची कबुली देत, आम्हाला आता सुधारायचे आहे, अशी विनवणी केली. ‘मॅडम, आम्हाला आता खरंच सुधारायचे आहे. काही चांगला मार्ग सांगा. घरी पोलीस येतात तेव्हा आई-वडिलांची बदमानी होते. आम्हाला यातून बाहेर काढण्याचा मार्ग सांगा. पुढे हाताला काम मिळाले, तर आम्ही सुधारू.’ अशी भावना यातील मुलांनी बोलून दाखवल्या. त्यावेळी तुमचे भविष्य चांगले घडू शकते. या चुकीच्या मार्गावरून पुढे जाऊ नका, असा सल्ला मी त्यांना दिला.
बाल गुन्हेगारीची समस्या ही कोयता गँगपुरता मर्यादित नाही, तर मुलांमध्ये वाढलेला राग, अहंकार हे सुद्धा बालगुन्हेगारीला कारणीभूत ठरतात. आई, वडील आणि मुले यातील नाते हे सर्वांत महत्त्वाचे कारण असते. मुलांना आई-वडिलांची भिती असावी पण ती आदरयुक्त असावी. काही वेळेला अतिभिती, अतिधाक यामुळे ही मुले बिघडतात. चुकीच्या मार्गाला जातात. आई-वडील रागवतील म्हणून काही मुले खूप गोष्टी लपवतात आणि एकामागून एक चुका करत जातात. त्यांना ते चुकतात, याची जाणीवही नसते. कारण अशा वेळी अशी मुले मुली एक आधार शोधतात आणि त्यामध्ये ती चुकीच्या मार्गाला जातात आणि कधी कधी इतके पुढे जातात की आपल्या माथ्यावर गुन्हेगारीचा शिक्का कधी बसला? याचे भान त्यांना राहत नाही.
आजकाल गरीब झोपडपट्टीतील नव्हे, तर मध्यमवर्गीय घरातील मुले ही आत्मप्रोढी झालेली दिसतात. त्यांच्यमध्ये राग, द्वेष, क्रोध खूप वाढलेला दिसतो. थोड्या थोड्या गोष्टीवरून त्यांची चिडचिड राग, खूप वाढतो. मग ही मुले मुली रागीट, चिडचिडे का झाले यांचे कारण काय याचा विचार कोणी केला का? आपण नेहमी फक्त बोलत राहतो की, ‘माझा मुलगा, मुलगी खूप त्रास देतो, ते ऐकत नाही, त्यांना लगेच राग येतो, ती खूप उलट बोलतात. मग मला पण राग येतो आणि मग माझा पारा चढतो आणि त्यांचे रूपांतर चुकीच्या गोष्टीमध्ये होते’, म्हणजे काय तर त्यांच्यावर ओरडणे, मारणे अशा प्रकारे पण पालकांच्या हे लक्षातच येत नाही की रागाने राग वाढतो. त्यातून चांगले काही निष्पन्न होत नाही, तर त्यातून चुकीचेच रिझल्ट मिळतात. आज मुला मुलींचे अफेअर्सचे प्रमाण वाढले आहे. याचे कारण सोशल मीडिया हे एकच असू शकत नाही. आपण बालगुन्हेगारीबद्दल बोलतोय, बालगुन्हेगारी म्हणजे फक्त खून, मारामारी, चोरी एवढेच गुन्हे मर्यादित नाहीत, तर उद्याचे भविष्य असलेल्या मुलांना योग्य मार्ग दाखवणारे हात समाजात तयार व्हायला हवेत. ही वाट चुकलेली, गुन्हेगारीकडे वळलेली मुले पुन्हा मुख्य प्रवाहात येऊ शकतात. त्यांना हवाय आत्मविश्वास निर्माण करणारा मायेचा हात.
या बालगुन्हेगारी रोखण्यासाठी काय करता येऊ शकते?
- एक म्हणजे जी मुले प्रवाहात नाहीत, त्यांना प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणे
- मुलांचे मैदानी खेळ जवळजवळ बंद झाले आहेत. मोबाईल फोन, सोशल मीडियाचा वाढलेला वापर त्यांना कमी करायला लावणे
- गुन्हेगारीच्या पाशात अडकलेल्या मुलांसाठी योगा, मेडिटिशन, रीडिंग, विविध स्पर्धा यासारखे उपक्रम राबवण्याची गरज आहे.
- विविध व्याख्याने आयोजत करणे जेणेकरून त्यांचे पॉझिटिव्ह विचार काढून त्यांच्यातील निगेटिव्हिटी कमी होण्यास मदत होईल.
- समाजाने ज्यांना बाहेर काढले आणि त्यातून ते चुकीचे वागत आहेत, अशांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करणे.
- वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे.
(लेखिका पुणे येथील आर. के. बहुद्देशीय संस्थेमार्फत समुपदेशन करतात)