Thursday, July 18, 2024
Homeसाप्ताहिककोलाजपराधीन आहे...

पराधीन आहे…

  • नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे

ही १९५५-५६ सालची गोष्ट! त्यावेळी आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे संचालक सीताकांत लाड यांच्या मनात एक नवा कार्यक्रम करायचे घोळत होते. श्रोत्यांचे मनोरंजनही व्हावे आणि त्यातून उत्तम नैतिक मूल्येही समाजात रुजवली जावीत हा त्यांचा हेतू! त्यांनी त्यासाठी त्यांचे मित्र गजानन दिगंबर माडगूळकर यांना बोलावले. दोघांच्या चर्चेतून असे ठरले की, वाल्मिकी रामायणावर आठवड्यातून एक, याप्रमाणे वर्षभरात ५२ गाण्यांची मालिका करावी. गदिमांनी तत्काळ ‘स्वये श्रीरामप्रभू ऐकती लवकुश रामायण गाती’ हे पहिले गाणे लिहून दिले. मात्र तो कागद ऐन ध्वनिमुद्रणाच्या दिवशी हरवला!

लाड यांनी गदिमांना पुन्हा गाणे लिहून देण्याची विनंती केली. कविवर्य या निष्काळजीपणामुळे नाराज झाले होते. ते पुन्हा लिहायला तयार होईनात. मग लाडांनी गंमतच केली. एका खोलीत सर्व लेखन-साहित्य ठेवून त्यांनी गदिमांना अक्षरश: कोंडले आणि सांगितले, ‘गाणे लिहून झाल्यावरच तुम्हाला सोडण्यात येईल!’ गदिमा १५ मिनिटांत गाणे घेऊन बाहेर आले! महामुनी वाल्मिकींचे २८००० श्लोकांचे रामायण केवळ ५६ गाण्यात बसवणारे गदिमाही तसे महाकवीच की!

गीतरामायणात भारतीय तत्त्वज्ञान आणि अध्यात्म समजावून सांगणारी अनेक गाणी आहेत. एका गाण्याचे शब्द आजही जीवनातील महत्त्वाचे सत्य सांगून जातात –

‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा…’

महाराज दशरथांच्या मृत्यूची दु:खद बातमी रामाला सांगायला भरत वनात येतो. त्याला यानिमित्ताने रामाला परत न्यायचे असते. रामाशी बोलताना तो माता कैकयीचा धिक्कार करतो! वडिलांचे रामाला वनवासात पाठवणेही त्याला रुचलेले नसते. राम त्याचे सांत्वन करून सांगतो, ‘बाबा रे, वनवास हे माझ्याच पूर्वकर्मातून निर्माण झालेले माझे प्राक्तन आहे. त्यासाठी आई किंवा वडील दोषी नाहीत.’

‘माय कैकयी ना दोषी, नव्हे दोषि तात,
राज्यत्याग काननयात्रा, सर्व कर्मजात,
खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा,
पराधीन आहे जगतीं…’

जिथे प्रगती होते तिथेच पतनाची सुरुवात असते. राजवैभवाचा लोभ हा व्यर्थच! कारण सर्वाच्या अंती विनाशच आहे. माणसांच्या भेटीचे अंतिम भविष्य वियोग हेच असते. त्यामुळे, भरता, इथे थांबू नकोस. माणूस नियतीच्या आधीन असतो म्हणून बाळा, शोक आवर –

अंत उन्नतीचा पतनीं होई या जगात,
सर्व संग्रहाचा वत्सा, नाश हाच अंत.
वियोगार्थ मीलन होते, नेम हा जगाचा,
पराधीन आहे…

भारतीय अध्यात्मात डोळ्यांना दिसणारे विश्व एवढेच खरे नाही. हा केवळ पंचेंद्रियांना होणारा स्वप्नवत आभास आहे. वास्तवात ब्रह्म हेच सत्य आहे. रामही तेच समजावून सांगतो –

जिवासवें जन्मे मृत्यू, जोड जन्मजात,
दिसे भासतें तें सारें विश्व नाशवंत,
काय शोक करिसी वेड्या, स्वप्नींच्या फळांचा?
पराधीन आहे जगती…

भरता, तू जरी मला भेटायला अकस्मात वनात आला असलास तरी आपल्या प्रिय वडिलांचे देहावसान हे अतर्क्य नाही. आपली सगळी बुद्धी, चतुराई मृत्यूच्या वास्तवापाशी संपुष्टात येत असते. आपण सगळे दैवाधीन असतो –

तात स्वर्गवासी झाले, बंधू ये वनांत,
अतर्क्य ना झालें काहीं, जरी अकस्मात.
मरण-कल्पनेशीं थांबे तर्क जाणत्यांचा,
पराधीन आहे जगती…

वार्धक्य, मृत्यू, दु:ख यातून कुणीही सुटलेला नाही. सुख आणि दु:ख दोन्ही अटळच आहेत. या जगात जे जे निर्माण होते, वाढते त्याचा अंतही निश्चित आहे.

जरामरण यांतून सुटला कोण प्राणिजात?
दुःखमुक्त जगला का रे कुणी जीवनांत?
वर्धमान तें तें चाले मार्ग रे क्षयाचा,
पराधीन आहे…

हजारो वर्षांपूर्वीच्या संस्कृत कवींनी केलेल्या एका सुभाषिताचा आशय गदिमा इथे अलगदपणे गुंफतात. ते म्हणतात, ‘जसे समुद्रात योगायोगाने दोन ओंडके जवळ येतात, एकत्र तरंगतात आणि एक मोठी लाट आल्यावर क्षणार्धात दोन दिशांना फेकले जातात, त्यांची परत कधीच भेट होत नाही, तसे मानवी संबंधांचे आहे –

दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट,
एक लाट तोडी दोघां, पुन्हा नाहीं गाठ,
क्षणिक तेंवि आहे बाळा, मेळ माणसांचा,
पराधीन…

पित्याचा श्राद्धविधी उरकून राम भरताला म्हणतो, ‘आता वडिलांचे वचन पूर्ण करणे हेच आपले कर्तव्य आहे. तुला राज्य सांभाळणे भाग आहे! मलाही वनवास पूर्ण करावाच लागेल. म्हणून, तू डोळे पूस आणि आनंदाने परत जा. आपल्या कर्तव्याला लाग.

नको आंसू ढाळूं आतां, पूस लोचनांस
तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास
अयोध्येत हो तू राजा, रंक मी वनींचा
पराधीन आहे जगती…

भरत रामाला अयोध्येस परतून राज्यकारभार हाती घेण्याचा आग्रह करतो त्यावर गदिमांचा राम भरताला विचारतो, ‘अरे, जो पित्याचे वचन पूर्ण करण्यासाठी वनवासाला निघाला आहे, त्याने राजमुकुट घालणे शोभेल तरी का? त्याऐवजी आपण पितृवचन पूर्ण करून कृतार्थ होऊ –

नको आग्रहाने मजसी परतवूस व्यर्थ,
पितृवचन पाळून दोघे होऊ रे कृतार्थ,
मुकुटकवच धारण करिं, कां वेष तापसाचा?
पराधीन आहे…

‘मी वनवासाची चौदा वर्षे पूर्ण केल्याशिवाय परतणार नाही. वडिलांच्या आज्ञेप्रमाणे तूच राज्य सांभाळायचे आहे. माझ्यासारखाच तूही वडिलांच्या वचनात बांधला गेलेला आहेस. माणूस हा पराधीनच असतो –

संपल्याविना हीं वर्षें दशोत्तरीं चार
अयोध्येस नाहीं येणें, सत्य हें त्रिवार
तूंच एक स्वामी आतां राज्यसंपदेचा
पराधीन…

राम जरी कर्तव्यकठोर असला तरी तो स्नेहल आहे, प्रेमळ आहे. तो भरताचे बंधुप्रेम ओळखतो, भरताचा स्वभाव ओळखून त्याला हळुवारपणे समजावतो. गदिमांनी हे सगळे बारकावे अचूक टिपले आहेत. त्यांचा राम म्हणतो, तुम्ही सर्व अयोध्यावासी पुन्हा वनात येऊ नका. मला तुमचे प्रेम समजते. तरी तुम्ही आपल्या नगरीचा लौकिक वाढविण्यासाठी परत जा आणि प्रजाहितदक्ष राहून राज्य करा –

पुन्हां नका येऊ कोणी दूर या वनांत
प्रेमभाव तुमचा माझ्या जागता मनांत
मान वाढवी तूं लोकीं अयोध्यापुरीचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा.

एका अर्थाने पाहिले तर श्रीराम हा श्रीकृष्णाच्या काही हजार वर्षे आधीचा अवतार! पण, कृष्णाच्या निष्काम कर्मयोगाचे पालन त्यानेच किती तंतोतंतपणे आचरणात आणले होते! महाकवींच्या कलाकृती अशा गोष्टी जाता-जाता अधोरेखित करून टाकतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -