-
कथा : रमेश तांबे
सकाळी थोड्या रागातच मीना शाळेत गेली. कारण आज शाळेत निघताना मीनाचे आईशी कडाक्याचे भांडण झाले होते. भांडणाचे कारण होते वही! मीनाला नवी वही हवी होती. पण आईने जुन्या वह्यांचे कोरे कागद फाडून तिला एक वही बनवून दिली होती. जुनीपुराणी पानं, ओबडधोबड शिवलेली, पानांचा रंगदेखील एक सारखा नव्हता. आईने दिलेली वही मीनाने कोपऱ्यात भिरकावून दिली. दोन तास खपून आईने ती वही तयार केली होती. पण आईच्या त्रासाची, आपल्या गरिबीची कोणतीही पर्वा मीनाने आज केली नाही अन् नव्या वहीवरून आईशी जोरदार भांडली.
‘जा आज घरी येणारच नाही’ अशी धमकी देऊन ती घराबाहेर पडली. शाळेत जाताना मीनाचे डोळे भरून आले होते. सगळी मुलं नव्या वह्या, नवी पुस्तके, नवी दप्तरे आणतात. पेन, पेन्सिल तर दर आठवड्याला नव्या! अन् मी गेली वर्षभर एकच खोडरबर वापरते. तोही दुसऱ्याने दिलेला! सारखा विचार करून मीनाच्या रागाचा पारा अधिकच चढत होता.
‘जाऊ दे आज मी शाळेतच जात नाही.’ असं म्हणत तिने तिचे पाय शाळेशेजारच्या बागेकडे वळवले. बागेत जाऊन ती एका मोठ्या झाडाखाली बसली. पाठीवरचे जुनेपुराणे दप्तर बाजूला ठेवले अन् खाली मान घालून बसली. तिला तो सकाळचा प्रसंग अन् ती जुनीपुराणी वहीच आठवत होती!
तेवढ्यात समोर एक मोर आला अन् गवतातले दाणे टिपू लागला. ‘अय्या मोर!’ मीना जोरात ओरडली.
दोन्ही हात गालावर ठेवत मीना त्या सुंदर मोराकडे बघत बसली. मोर मीनाभोवती दोन वेळा फिरला अन् जाताना तिला सुंदर मोरपीस देऊन गेला. मीनाने धावत जाऊन ते पीस उचलले अन् त्याकडे नुसतीच बघत बसली. मोरपीस आपल्या गालावर फिरवत राहिली अन् त्या आनंदात बुडून गेली. थोड्या वेळाने तिथं एक बदक आले. क्वॅक् क्वॅक् आवाज करीत मीना समोर फिरत राहिले. त्याची ती विचित्र चाल बघून मीनाला हसू फुटले. थोड्या वेळाने कोकिळेचा कुहू कुहू आवाज ऐकू आला. तिने कोकीळ कधी पाहिला नव्हता म्हणून ती झाडावर बसलेला कोकीळ शोधू लागली. अन् काय आश्चर्य काळ्या काळ्या रंगाचा कोकीळ तिच्या समोर उभा राहून आपल्या गोड आवाजाने सारी बाग प्रसन्न करू लागला.
मीनालाही खूप आनंद देऊन कोकीळ उडून गेला. तेवढ्यात तिथं दोन चिमण्या आल्या. टुणटुण उड्या मारीत दाणे टिपत, अंगावरचा करडा रंग मिरवत त्या भुरर्कन उडून गेल्या. नंतर मीना समोर आला एक कावळा. काळ्याकुट्ट रंगाचा, चिरक्या आवाजाचा, कावळ्याने मीना समोर दोन-चार भराऱ्या घेतल्या, अन् मान तिरकी करून गवतातले किडे टिपून तोही निघून गेला.
इकडे मीना विचारात पडली. मोर सुंदर दिसतो म्हणून बदकाला वाईट वाटत नाही. कोकीळ काळा पण किती गोड गातो. करड्या रंगाच्या इवल्याशा चिमण्या टुणटुण उड्या मारतात. कावळ्याकडे ना रंग ना आवाज पण किती मजेत राहतो. पण मी! एक नवी वही नाही म्हणून आईशी भांडले! आईला त्रास दिला. स्वतःला त्रास करवून घेतला. आपल्याकडे जे आहे त्यात आपण आनंदी राहू शकतो. हे मीनाच्या लक्षात आले.
आता मीना तडक घरी आली. अन् आईच्या गळ्यात पडून रडू लागली. म्हणाली, ‘आई मला माफ कर, मी चुकले! तुला उगाच त्रास दिला. मला जुनी वही चालेल. आपण अभ्यास कशावरही करू शकतो. त्यासाठी नवीच वही पहिजे असे काही नाही.’ आई मीनाकडे मोठ्या कौतुकाने बघत होती. मग आईने भरल्या डोळ्यांने मीनाला मिठी मारली अन् पुटपुटली, ‘आज माझी पोर मोठी झाली!’