आपापसात वादविवादांतून राडा करून कोर्टकचेऱ्या खेळत बसण्यापेक्षा माकडांसारखे एकमेकांवर प्रेम करा. यातून राडा होणार नाही. उलट खऱ्या अर्थाने माणुसकीचे दर्शन होऊन पुढील पिढी गुण्यागोविंदाने नांदेल. त्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील माकडांचा आलेला अनुभव थोडक्यात लिहिण्याचा एक प्रयत्न करत आहे. तेव्हा सर्वांनी त्यांचा आदर्श घेऊन एकमेकांशी प्रेमाने वागल्यास एकजुटीने विकासाच्या दिशेने पुढे जाऊ शकतो. त्यासाठी माकडांसारखे एकमेकांवर प्रेम केले पाहिजे.
१२ मार्च २०२३ रोजी मी मुंबईमधील प्रसिद्ध अशा बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये गेलो होतो. तसे माझ्यासोबत रश्मी, सायली, रंजना, स्वानंदी, प्राची आणि स्वरा (स्वीटू) होती. उद्यानामध्ये पर्यटकांना फिरण्याची वेळ सकाळी ७.३० ते सायंकाळी ६.३० पर्यंत असते; परंतु आम्ही बोरिवलीमध्ये राहत असल्यामुळे दुपारनंतर उद्यानात जायचे ठरले. तसे घरातून दुपारी तीन वाजता चालत निघालो. त्यात स्वीटूला अधूनमधून सर्वांनी उचलून घेण्याचे ठरले. तसे सर्वांनी शेवटपर्यंत पाळले.
संध्याकाळी चारच्या सुमारास आम्ही सर्वजण गप्पागोष्टी करीत उद्यानामधून चाललो होतो. समोरच कैरीचे लोणचे दिसल्याने तिचा अगोदर सर्वांनी आस्वाद घेतला. त्यानंतर उकडलेले मक्याचे कणीस त्यावर लिंबूरस प्यायल्याने आम्ही सर्व ताजेतवाने झालो. छोट्या स्वराला उद्यानात खेळण्यासाठी काय काय आहे, याची पाहणी केली. जरी वनराणी मिनी टॉय ट्रेन बंद असली तरी घनदाट जंगल, त्यात बागडणारी लहान मोठी माकडे, चारी बाजूने लोखंडी कुंपणात असणारा हरणांचा कळप, मोर, लांडोर, सांभर इत्यादी प्राणी व पक्ष्यांचे मनसोक्त दर्शन पिंजऱ्याच्या बाहेरून घेता येते. तसेच उद्यानात लहान मुलांना खेळण्यासाठी लहान-मोठ्या घसरगुंड्या, बैठक व्यवस्था, छोटे बंगले, पाण्याची सोय, इलेक्ट्रिकवर चालणारी; परंतु वरती टप नसलेली गाडी, बोटिंग करणे हे महागडे असले तरी फक्त १५ मिनिटे आणि विशेषकरून लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी फायबरचे बनविलेले विविध प्राणी सुशोभीकरण करून उभे केले आहेत. लांबून पाहिल्यावर जणू काय जिवंतच प्राणी आहेत, असे वाटते. त्यामुळे अनेक बच्चे कंपनी त्यांच्या पाठीवर बसून आपल्यासोबत असणाऱ्या सोबत्याला आपल्या मोबाइलमध्ये फोटो काढण्यासाठी सांगतात. त्यामध्ये आम्हालासुद्धा मोह आवरता आला नाही. स्वराला वरती बसून सायली फोटो काढत होती. तशी तीसुद्धा त्यात चांगलीच रमली होती. इकडे-तिकडे पाहत असताना माझी नजर समोरच असणाऱ्या दोन माकडांकडे गेली. एक माकड एवढ्या गजबजलेल्या उद्यानात दुसऱ्या माकडाच्या अंगावरून आपले दोन्ही हात फिरवत होता. इतकेच काय त्याच्या अंगावरील केस इकडे-तिकडे करून अंग साफ करत होता. दुसरा माकड त्याच्याजवळ शांत पडला होता. कारण त्यांचा एकमेकांवर विश्वास होता. आज मात्र माणसांचा एकमेकांवर विश्वास नाही, असेच म्हणावे लागेल. त्यानंतर ते दोघेही थोड्या वेळाने एका मागून एक आंब्याच्या झाडावर उड्या मारत चढले.
त्याच्या आदल्या दिवशी आम्ही सर्वजण भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान अर्थात राणीच्या बागेत गेलो होतो. त्यावेळी तेथे पण माकडे पाहिली. ती मात्र बंदिस्त होती. त्यांचा आटापिटा होता, कधी एकदा बंदिस्त तारेच्या कुंपणातून बाहेर यायला मिळेल. मात्र या जन्मी तरी त्यांना त्या कुंपणामधून बाहेर येणे अशक्य आहे. त्यामुळे ती एकांतात आतील लोखंडी साखळीला धरून झोके घेताना दिसत होती. त्यांना दुसऱ्याचे देणे-घेणे काहीच नव्हते. बरोबर अशीच परिस्थिती देशात दिसते. यासाठी राजकीय नेते नव्हे, तर कार्यकर्त्यांनी अशा राजकीय कुंपणातून बाहेर येणे आवश्यक आहे, तरच खऱ्या अर्थाने तरुणांना स्वातंत्र्य मिळेल. आज राजकारणात एकाच गावातील अथवा घरातील सख्खे भाऊ व बापलेक पक्के वैरी होताना दिसतात. मालमत्तेसाठी लहान भावाचा खून पण केल्याची कबुली दिली आहे. तेव्हा नेमके यातून आपण काय साध्य करणार आहोत? उलट यात आपलेच नुकसान होते. जेव्हा कळते तेव्हा वेळ निघून गेलेली असते. मग सांगा आता निष्ठावंत कार्यकर्ते गेले कुठे? तेव्हा कोर्टकचेऱ्या खेळून आपण काय साधणार आहोत? त्यातून आपण काय मिळवणार आहोत? याचा प्रामाणिक विचार होणे गरजेचे आहे.
गाव, तालुका, जिल्हा, राज्य आणि देश यांचा विकासाच्या दृष्टिकोनातून विचार करता अनेक राजकीय पक्ष असले तरी देशाच्या विकासासाठी एकजुटीने काम करणे आवश्यक आहे. मात्र आपल्या देशात तसे होताना दिसत नाही. उलट राजकीय भूकंप जास्त होताना दिसतात. यात सर्वसाधारण कार्यकर्ते होरपळताना दिसत आहेत. हे देशाच्या विकासाला मारक आहे. जरी एकमेकांचा एकमेकांना विरोध असला तरी विकासासाठी एकजुटीने लढा दिला पाहिजे. एकजूट हीच खरी विकासाला गती देते. तेव्हा मतभेद जरी असले तरी बोरिवलीमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील दोन माकडांसारखे गुण्यागोविंदाने राहिले पाहिजे. तेव्हा देशातील नागरिकांनीसुद्धा माकडांसारखे एकमेकांवर प्रेम करायला हवे. हाच आदर्श देशातील तरुण पिढी घेणार आहे, तरच आपला लोकशाहीप्रधान भारत देश महासत्ता होण्याला वेळ लागणार नाही.
महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठ्याची कामे हाती घेतली जाणार मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतर्फे घाटकोपर (पश्चिम) येथे…
ठाणे (प्रतिनिधी) : उष्म्याने ठाणेकर भलतेच हैराण झाले असून, एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा वाढत चालला…
सात वर्षात १ लाखांहून अधिक नवजात बालकांचे मृत्यू मुंबई(साक्षी माने) : महाराष्ट्रात मोठ्या लोकसंख्येने जागोजागी…
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी २) ते अंधेरी पूर्व मेट्रो-७ अ या…
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…