Monday, July 22, 2024
Homeसाप्ताहिककोलाजगड-किल्ले कसे पाहावेत?

गड-किल्ले कसे पाहावेत?

  • विशेष : प्रवीण कदम

महाराष्ट्र आणि किल्ले हे एक अविभाज्य समीकरण आहे. महाराष्ट्रात सातवाहन काळापासून किल्ल्यांचे अस्तित्व जरी असले तरी त्यांचे खरे महत्त्व मध्ययुगातील शिवछत्रपतींच्या स्वराज्यामुळेच अधोरेखित झाले. ब्रिटिशांनी १८१८ साली मराठा साम्राज्य नष्ट केले आणि महाराष्ट्राच्या किल्ल्यांचा खऱ्या अर्थाने वनवास सुरू झाला. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी किल्ल्यांचे राजकीय महत्त्व जाणीवपूर्वक संपुष्टात आणले आणि त्यामुळे त्या काळात लोकांची किल्ल्यांवरील वहिवाट बंद झाली. तत्कालीन सामाजिक चळवळींचा मुख्य उद्देश स्वातंत्र्यप्राप्ती असल्यामुळे किल्ले विस्मृतीत गेले. त्यानंतर जवळपास १२५ वर्षांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आणि १९६० साली महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. या संपूर्ण काळात किल्ल्यांची अक्षम्य हेळसांड झाली. त्यामुळे किल्ल्यांवरील वास्तूंची पडझड होऊन भग्न अवशेष उरले. गेल्या ५०-६० वर्षांमध्ये जनमानसात किल्ल्यांविषयी आस्था आणि कुतूहल निर्माण झाल्यामुळे किल्ल्यांकडे लोक मराठी अस्मितेचे प्रतीक म्हणून पाहू लागले आहेत. इतिहासाचा अभ्यास आणि पर्यटन या दोन प्रमुख उद्देशांमुळे किल्ल्यांवरील वर्दळ वाढू लागली. साहजिकच शासनाचाही किल्ल्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे.

महाराष्ट्रात अंदाजे ३५० किल्ले असल्याची नोंद आढळून येते; परंतु सर्वसामान्य लोकांना सहजपणे जाऊन बघता येतील असे ५० किल्ले आहेत. त्यामध्ये उंच डोंगरांमध्ये असलेले गिरीदुर्ग, सपाट भूप्रदेशात असलेले भूदुर्ग आणि समुद्रकिनारी किंवा समुद्रात बेटांवर असलेल्या जलदुर्गांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही किल्ल्यावर पूर्वीचे सर्वच वास्तू घटक पूर्णत्वाने अस्तित्वात नसल्यामुळे किल्ला बघताना बहुतांश वेळी कल्पनाशक्तीच्या आधारे त्या वास्तूंची रचना व मूळ स्वरूप कसे होते, याचे आडाखे बांधावे लागतात. म्हणूनच किल्ला कसा पाहावा याचे तंत्र माहिती असणे आवश्यक आहे. सोबत इतिहास अभ्यासक किंवा मार्गदर्शक असल्यास उत्तमच. एखाद्या किल्ल्याचे पूर्ण आकलन होण्यासाठी त्या किल्ल्याचा इतिहास, त्याचे भौगोलिक स्थान आणि तेथील अवशेषांच्या स्थापत्याची रचना याचा पूर्व अभ्यास करून मगच किल्ला पाहायला जावे. किल्ल्यावर जाण्यासाठी कोणते मार्ग आहेत याची शहानिशा करावी. गिरीदुर्गाना भेट देताना स्थानिक वाटाड्या घेणे अत्यंत आवश्यक असते किंवा अनुभवी ट्रेकर्ससोबत जावे अन्यथा जंगलामध्ये वाट चुकण्याची दाट शक्यता असते.

आपण निवडलेल्या किल्ल्यावर गेल्यानंतर त्या किल्ल्यावरून आसमंतातील कोणकोणती शिखरे, किल्ले, नद्या, घाट, बंदरे दिसतात? त्यासाठी किल्ल्यातील कोणत्या ठिकाणी उभे राहावे? रात्रीच्या वेळी किल्ल्यावरून आकाशदर्शन करता येईल का? अशा बाबतीतली माहिती आधीच मिळविणे इष्ट ठरते. किल्ल्यावर जाताना आपल्यासोबत किल्ल्याचा नकाशा असावा जेणेकरून ऐतिहासिक महत्त्व असलेल्या सर्व स्थळांचे निरीक्षण करता येईल. आज इंटरनेट आणि उत्तम लेखकांची पुस्तके यांसारखी साधने सहज उपलब्ध असल्याने ही सर्व माहिती मिळविणे अगदी सोप्पे झाले आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही किल्ल्यावर गेल्यास तटबंदी, बुरुज, पाण्याची तळी, टाके, तलाव, बालेकिल्ला, जंग्या, चर्या, फांजी, तोफा, भुयारी टाके, खांबटाके, विहिरी, हौद, अंबारखाना, कोठारे, मंदिरे, नगारखाना, प्रवेशद्वार इत्यादी अनेक वास्तू घटक आपल्याला हमखास आढळून येतात. सुदैवाने महाराष्ट्रातील किल्ल्यांवरील वास्तूंमध्ये आपल्याला स्थापत्याचे खूप वैविध्य बघायला मिळते. त्यामध्ये मुस्लीम, ब्रिटिश, पोर्तुगीज, यांच्यासारख्या परदेशी राज्यकर्त्यांसह एतद्देशीय राज्यकर्त्यांच्या काळातील कलाविष्कार दिसून येतात. नीट अभ्यास केल्यास या सत्तांतराच्या खाणाखुणा दिसतात. वसई आणि विजयदुर्गसारख्या किल्ल्यांच्या भिंतींवर तोफगोळ्यांच्या माऱ्यामुळे झालेल्या जखमाही आपल्याला पाहता येतात. किल्ल्यांच्या दरवाजांवरील द्वारशिल्पे, अनेक ठिकाणचे मोडी, फारसी, मराठी, इत्यादी भाषेतील शिलालेख यामध्ये सुद्धा अभ्यासण्यासारख्या बऱ्याच गोष्टी असतात. एक एक किल्ला एक एक वर्ष लढेल, अशी शिवरायांची दुर्गनीती होती. त्यामुळे किल्ल्यांवरील जलव्यवस्थापन हा एक समजून घेण्याचा विषय आहे. नळदुर्गसारख्या किल्ल्यातील जलव्यवस्थापन आणि धबधबा प्रेक्षणीय असतो. अनेक किल्ल्यांवर तेथील गड देवतेचे मंदिर असते. त्या देवतेचे वेगळे सण, उत्सव, जत्रा यांची परंपरा असते. अशा कार्यक्रमांच्या वेळी गडावर गेल्यास स्थानिक संस्कृती आणि परंपरांचे दर्शन होते.

शिवकालीन किल्ल्यांच्या प्रवेशद्वाराची बांधणी गनिमी कावा, धनुष्य बाण आणि ढाल-तलवारीच्या युद्धासाठी पूरक अशी असते. काही ठिकाणी आजही मूळ लाकडी दरवाजे अस्तित्वात आहेत. शत्रूने धडक देऊन उघडू किंवा तोडू नये म्हणून लाकडी दरवाजांवर केलेली खिळ्यांची योजना असो की मर्यादित प्रवेशासाठी असलेला दिंडी दरवाजा असो, हे सारे पाहताना त्या काळातील प्रसंग आठवतात. काही ठिकाणी चोर दरवाजे शोधून बघावे लागतात. दरवाजाच्या झडपा आतून बंद करण्यासाठी दरवाजांच्या मागच्या बाजूस अडसर बसविण्याच्या खोबण्या दिसतात. दरवाजांची उघडझाप करण्यासाठी झडपांच्या वरील व खालील बाजूस असलेल्या बिजागराच्या खोबण्या असतात. दरवाजाच्या उंबरठ्याखाली पावसाचे पाणी जाण्यासाठी केलेली छिद्रे असतात. अंजनवेलच्या गोपाळगडाच्या तटबंदीच्या भोवताली खंदक आहे. अशा खंदकाची रचना आणि तो पार करण्याची व्यवस्था हे आपल्याला आजही अचंबित करते.

बुरुजाच्या आतून बंदुकीचा मारा करण्यासाठी खाचवजा तिरकस छिद्रे असतात. त्यांना जंग्या म्हणतात. तटबंदीवरून किल्ल्याच्या परिघामध्ये फिरण्यासाठी असणाऱ्या सपाट जागेला फांजी म्हणतात. काही किल्ल्यांवर तोफेचे गाडे फिरू शकतील इतक्या रुंद फांजी असतात. अशा ठिकाणी तोफा वर चढविण्यासाठी केलेले चढ सुद्धा आपल्याला दिसतात. वसई आणि कुलाबा किल्ल्यात अशी व्यवस्था आजही बघता येते. वसई आणि विजयदुर्ग किल्ल्यातील तटबंदीच्या खालून भुयारे व लहान खोल्यांची रचना केलेली आढळते. तटबंदीच्या बाहेरील बाजूस पाकळ्यांसारखे बांधकाम असते त्यांना चर्या म्हणतात. दोन चर्यांच्या मधला भागाचा उपयोग जंगीसारखा करता येतो.

रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी पाचाड गावात छत्रपती शिवरायांनी आपल्या मातोश्री जिजाबाई यांच्यासाठी बनविलेला वाडा हा सुद्धा एक प्रकारचा भुईकोट आहे. त्याच्या तटबंदीमध्ये शौचकुपांची व्यवस्था आहे. या शौचकुपांच्या ठिकाणी दरवाजे नसून तिथे पडदे लावण्याची सोय होती, हे भिंतींमधील खिळ्यांच्या अवशेषांवरून समजते. किल्ल्यांवर असणाऱ्या तोफांवर राजचिन्हे आणि कधी कधी काही आकडे असतात. त्यावरून त्या तोफांची बनावट आणि त्यामध्ये भरल्या जाणाऱ्या गोळ्यांचे वजन तसेच तिच्या क्षेपण क्षमतेची माहिती मिळते. महाराष्ट्रातील किल्ल्यांवर अत्यंत दुर्मीळ आणि वेगवेगळ्या बनावटीच्या तोफा आहेत. त्यात बांगडी तोफा, ओतीव तोफा, घडीव तोफा, मिश्र धातूंच्या तोफा असे प्रकार आहेत. यातील प्रत्येक वास्तू, तोफा आणि शिल्पांचे प्रत्येक किल्ल्यावर वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आहेत. किल्ल्याच्या भोवतालच्या गावांमध्ये अनेक वीरांच्या समाध्या, छत्र्या, वीरांची स्मारके, वीरगळ, गद्धेगळ आणि सती गेलेल्या स्त्रियांची स्मारकशिल्पे म्हणजे सतीशिळा असतात. किल्ल्यावर आणि त्याच्या भोवताली आपल्याला अशा अनेक वास्तू, शिल्पे, कबरी पाहायला मिळू शकतात. महिपतगडसारख्या किल्ल्यावरील महाकाय जोती आणि बांधकामाच्या चुन्याचे ढीग आजही आपल्याला अचंबित करतात. इतिहासाचे गूढ आपल्या मनात निर्माण करतात.

महाराष्ट्रातील दुर्गबांधणी स्थापत्य इतर राज्यातील किल्ल्यांच्या बांधणीपेक्षा आपली वेगळी राकट आणि कणखर नजाकत बाळगून आहेत. किल्ल्याच्या परिसरात तेथील नैसर्गिक वनस्पती, प्राणी, पक्षी यांची जैवविविधता हा सुद्धा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. किल्ला पाहायला जाण्याआधी जसा किल्ल्याचा ऐतिहासिक, भौगोलिक अभ्यास करणे आवश्यक असते तसेच किल्ला बघून झाल्यानंतर मनात आलेल्या शंकांचे निरसन करून घेण्यासाठी पुन्हा त्या किल्ल्याची माहिती शोधावी लागते. म्हणजेच एखादा किल्ला पाहिल्यानंतर किल्ला समजण्याची क्रिया संपत नसून त्यानंतर इतिहासाची उजळणी आणि आपण पाहून आलेल्या किल्ल्याचा इतर किल्ल्यांच्या संदर्भाने होणाऱ्या अभ्यासाची सुरुवात अशी एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. तेव्हा कुठे आपल्याला खऱ्या अर्थाने किल्ला पाहायचा म्हणजे नक्की काय याचा अनुभव मिळतो. कोणताही किल्ला एकदा जाऊन समजत नसतो, तर किल्ला समजून घेण्यासाठी त्याच्या अनेक वाऱ्या कराव्या लागतात. त्याचा इतिहास आणि त्याच्या भोवतालचा परिसर पिंजून काढावा लागतो. तेव्हा कुठे किल्ल्याच्या इतिहासातील हरवलेली पाने आणि दुवे सापडतात. किल्ल्याच्या जवळील ग्रामस्थांकडून तिथल्या स्थानिक प्रथा समजून घ्याव्यात, त्यातून अनेक परंपरांचा उलगडा होतो. त्यांनी सांगितलेल्या आख्यायिकांमधून आपल्याला किल्ल्याच्या गतकाळाचे धागेदोरे सापडतात. आपले गडकिल्ले हे महाराष्ट्राची अस्मिता आणि अमूल्य वारसा आहे, याचे सतत भान ठेवावे. गड-किल्ले बघताना आपल्या हातून किल्ल्याच्या पावित्र्यास हानी पोहोचेल अथवा पर्यावरणाचा ऱ्हास होईल, अशी कृती मात्र कटाक्षाने टाळावी.

(लेखक गड-किल्ले संवर्धन समिती, महाराष्ट्र शासन कोकण विभागाचे सदस्य आहेत.)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -