गुढीपाडवा! चैत्र शुद्ध प्रतिपदा! या दिवशी ब्रह्मदेवानी सृष्टी निर्माण केली; विष्णूनी मत्स्यरूप धारण करून शंकासुराचा वध केला; शालिवाहन राजाने कालगणना सुरू केली. प्रभू रामचंद्र रावणाचा वध करून चौदा वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत परत आले, हाच वसंत ऋतूच्या आगमनाचा, हिंदू नववर्षाचा पहिला दिवस, चैत्र शुद्ध प्रतिपदा!
- गुलदस्ता : मृणालिनी कुलकर्णी
साडेतीन मुहूर्तातला एक म्हणून हा आनंदोत्सव घरोघरी पारंपरिक पद्धतीने, पारंपरिक वेशात गुढी उभारून, दारी तोरण लावून, रांगोळी (चैत्र) काढून, गोडधोड करून मराठी नववर्षाचे स्वागत उत्साहाने, आनंदाने केले जाते. दारी उभारलेली गुढी ही विजयाची, समृद्धीची प्रतीक मानतात. झाडांना फुटलेली नवी पालवी, आंब्याला आलेला मोहर हाच नैसर्गिक बदल, नववर्षाचे स्वागत करतो. याचीच निशाणी म्हणून गुढीला, दाराला आंब्याची डहाळी लावतात. हीच नवजीवनाची, वसुंधरेची गुढी! निसर्गाविषयी कृतज्ञता म्हणजेच निसर्गपूजा! वैविध्याने नटलेल्या निसर्गातील, पर्यावरणातील सौंदर्य वेचणे. ‘सुंदर ते वेचावे, सुंदर करोनी मांडावे.’…
ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या सृष्टीत, निसर्गात आनंदाचे एवढे मोठे साम्राज्य पसरले आहे. याचा मुलांना अनुभव मिळावा, यासाठी मोकळ्या वातावरणांत, वृक्षाच्या सावलीत विद्यादानाचे कार्य गुरुदेव रवींद्रनाथांनी सुरू केले. नाही तर वाहत्या नदीपेक्षा नकाशातील नदीची निळी रेघ महत्त्वाची ठरायला लागते. आकाशांत रोज रात्री फुकटात पाहायला मिळणाऱ्या नक्षत्रांची नावे न पाहताच पाठ केली जातात. शांतिनिकेतनमधली शेकड्याने झाडे, वरती येणारे पक्षी ऋतुमानानुसार घडणाऱ्या बदलातून आकाशातल्या फौजा कुठे निघाल्या यावरून दक्षिण उत्तर वारे विद्यार्थी ओळखायला शिकतात. आपण नाना प्रकारच्या खेळ मांडणाऱ्या ऋतूची किती उपेक्षा करतो ते पाहा, ऋतुमानानुसार झाडावर फुलाचं, फळाचं उगवणं, फुलणं, कोमेजणं, गळून पडणं, हे आपल्यासाठीही लागू पडतं हे संस्कार कधी होणार? झाडाच्या शेंड्यावर चालणारा सूर्यप्रकाशाचा खेळ, वाहती नदी हे सारे बालमन टिपते, शिकते. सुंदर ते वेचावे…
एकदा शांतिनिकेतनमध्ये महात्मा गांधी आणि गुरुदेव यांचे बोलणे संपल्यावर फिरायला जाताना गुरुदेवांनी आपला पोशाख बदलला. पोशाख का बदलला या गांधीजींच्या प्रश्नाला गुरुदेव म्हणाले, ‘झाडांना, पक्ष्यांना, फुलापानांनासुद्धा आपल्याकडे पाहताना प्रसन्न नको का वाटायला? असे कलासक्त सौंदर्यदृष्टी असलेले, जीवनाला आनंदयज्ञ मानणारे रवींद्रनाथ टागोर आपल्याला त्यांच्या कलेतून सौंदर्य, प्रसन्नता आणि आनंद देतात आणि लेखणीतून धीर देतात. सुंदर…
आनंदाची बाब म्हणजे आता लोककला, क्रीडा, प्रवासाचा आस्वाद घेत आहेत. दोन दिवसांच्या सुट्टीला लगेच बाहेर पडतात. नाटक, चित्रपट, संगीत, अभिवाचन, प्रदर्शनासोबतच स्वतःचे रेकॉर्डिंग मॉडेलिंग जाहिरात क्षेत्र, घोड्याच्या रेस; इतकेच नव्हे तरुणासोबत निवृत्तही डोंगरावर ट्रेकिंगचा आनंद घेतात. प्रत्येक ठिकाणचा जोश, जल्लोष, अनुभव वेगळा. खूप वेचतो, सुंदर…
आपल्यासमोर विविध क्षेत्रांतील अनेक प्रेरणादायी उतुंग व्यक्तिमत्त्वांकडून वेचण्यासारखे, शिकण्यासारखे खूप आहे. दुरूनही काही जणांचा सहवास चैतन्यदायी असतो.
काही व्यक्तिमत्त्वे –
१. जे. आर. डी. टाटा – A. भारताच्या सर्वात मोठ्या उद्योगसमूहाचे प्रमुख. तरीही जे. आर. डी. टाटांचे ते जीवन सर्वस्व नव्हते. ते स्वतः अत्यंत संवेदनशील आणि परोपकारी होते. त्यांना लोकांमध्ये रस होता. ज्यांना ते ओळखतही नसत त्यांच्याकडे पाहूनही ते स्मित करीत. जेव्हा टाटा स्वतः गाडी चालवितात तेव्हा एखाद्याने त्यांच्याकडे पाहून ओळखल्यासारखे वाटताच, जे. आर. डी. लगेच स्मित करतात. अगदी छोट्या गोष्टीमुळे ती व्यक्ती खूश होते. ते म्हणतात, दुसऱ्याला झालेला आनंद मला आनंद देतो. रोजच्या धकाधकीत अनेक छोट्या गोष्टीकडे आपण लक्षच देत नाही.
B. जे. आर. डीं.चा ड्रायव्हर पीटर सांगतात, ‘कधी काही कारणामुळे दुपारच्या जेवणाचा बेत बदलला तर तसे कळविण्यासाठी जे. आर. डी. स्वतः २४ मजले खाली येऊन मला सांगत. पण, कधीही त्यांनी कुणाबरोबर मला निरोप पाठविला नाही.
C. भारताच्या नागरी विमान वाहतुकीला ५० वर्षे पूर्ण झाली त्यावेळेस जे. आर. डी. यांनी वयाच्या ७८ व्या वर्षी पुन्हा एकट्याने कराची ते मुंबई विमान चालविले. गर्दीला उद्देशून म्हणाले, तुम्ही तरुणांनी स्फूर्ती घ्यावी म्हणून केवळ यासाठी मी विमान चालविले आणि माझ्यासारखे ७८ वर्षांपर्यंत तुम्ही जगा.
२. भारताचे संरक्षणमंत्री के. सी. पंत स्वतः ‘अग्नी’च्या उड्डाण पाहण्यासाठी आले असता त्यांनी कलामांना विचारले, “कलाम, उद्याचे ‘अग्नी’चे यश साजरे करण्यासाठी माझ्याकडून तुम्हांला काय अपेक्षित आहे? अगदी साधा प्रश्न! पण मला लगेच उत्तर सुचले नाही. माझ्याजवळ कशाची कमतरता होती? कुठल्या गोष्टीने मला अधिक आनंद मिळेल. मग मी म्हणालो, ‘आम्हाला एक लाख रोपे हवी आहेत. हैदराबाद संशोधन संकुलात लावण्यासाठी’ संरक्षण मंत्र्यांचा चेहरा मैत्र भावनेने प्रकाशात उजळून निघाला. ते चटकन म्हणाले, ‘तुम्ही ‘अग्नी’च्या यशासाठी धरतीमातेचे आशीर्वाद मागत आहेत. उद्या नक्की यश मिळवू. चांगले विचार वेचायला फक्त आपली ज्ञानेंद्रिये उघडी हवीत.
आपल्या साहित्यातून नवसंजीवनी देणारे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांना कोण विसरेल? आपल्या लेखनाने, कलेने, वागणुकीने प्रत्येकाचे जग सुंदर करून गेले. त्यानं फक्त देणंच माहीत होते.
अनेक कलाकार, खेळाडू, लेखक आपल्या कलेतून आपल्याला जीवनाकडे आनंदी, खोडकर नजरेने बघायला शिकवितात. कलासाधक व्हायला जन्म पुरत नाही. निदान स्पर्श, गंध, स्वाद, श्रवण आणि दर्शन याद्वारे सुंदर ते वेचत आपण विकसित होत पुढे जातो. सुंदर…
जीवनाचा वेग वाढलाय. मन स्थिर करा. व्हॉट्सअॅपवर गुरुजी रविशंकर सांगतात,
“किसीके गलती के उपर प्रश्नचिन्ह उठाना छोड दो।
भूलसे किसी की गलती हो तो करने दो, वो भी छोड दो।
ये समय है सिखनेका और कुशलताओको बढानेका! बस।
जीवनमे हास्य रस पलकने दो! घर को स्वर्ग बना दो!
गुढीपाडव्याच्या शुभदिनी संकल्प करू या, “सुंदर ते वेचावे, सुंदर करोनी मांडावे!”