- गोलमाल : महेश पांचाळ
हॅलो, मी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांचा पीए बोलतोय. कृपया आपल्या कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टरचा नंबर द्याल का?’, साहेबांना त्यांच्याशी बोलायचे आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून फोन आला म्हटले की, कोणीही त्यावर चटकन विश्वास ठेवेल. तसा भारतातील सर्व मोठ्या शहरांमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्री करणाऱ्या स्टोअर्सची साखळी असलेल्या कंपनीचा नंबर स्टोअर्समधील स्टाफकडून या पीए महाशयांना देण्यात आला. पीए महाशयांनी एम.डी. यांचा मोबाइल क्रमांक घेऊन त्यावर संपर्क केला; परंतु एम.डी. यांना आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी बोलत असल्याचे मोबाइलवरून सांगण्यात आले. क्रिकेटपटू रिकी भुई यास क्रिकेट किट घेण्यासाठी १२ लाख रुपयांची स्पॉन्सरशिप हवी आहे. आपल्या सीएसआर फंडातून त्यांना मदत करावी किंवा कंपनीकडून त्यांना सहकार्य कसे होईल हे पाहावे, असे एम.डी. यांना सांगण्यात आले.
नॅशनल क्रिकेट अकॅडमीच्या नावे असणाऱ्या EQUITAS SMALL FINANCE BANK च्या खात्यावर पैसे जमा करावेत, अशी विनंती करण्यात आली. त्यानंतर विश्वास वाटावा यासाठी कंपनीचे एम.डी. यांना आंध्रा क्रिकेट असोसिएशनच्या नावाची कागदपत्रे पीए नागेश्वर रेड्डी यांच्या व्हॉट्सअॅपवरून पाठवण्यात आली होती. क्रिकेटपटू रिकी भुई याचा ईमेलसुद्धा पाठवण्यात आला होता. कंपनीच्या एमडीने मिनिट ऑफ मीटिंगमध्ये प्रस्ताव ठेवला आणि ११ लाख ७६ हजार रुपयांचा धनादेश देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. धनादेश अॅकॅडमीच्या नावे जमा करण्यात आला. कंपनीच्या अकाऊंट खात्यावरून ज्या नॅशनल क्रिकेट अॅकॅडमीच्या नावे धनादेश जमा करण्यात आला होता, ते खाते हे खासगी कंपनीचे असल्याचा संशय आला. त्यानंतर पीए नागेश्वर रेड्डी यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला; परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. मुळात या कंपनीचे मुख्य कार्यालय हे मुंबईत आहे. या कंपनीत दक्षिण भारतीय उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्र्यांबाबत वेगळा आदर त्यांच्या मनात होता. त्यातून क्रिकेटपटूला मदत करण्याचा निर्णय कंपनीने घेतला होता. यातील सत्य काय आहे हे बाहेर यावे यासाठी कंपनीच्या एम.डी.कडून सायबर पोलिसांकडे सविस्तर तक्रार केली.
पोलिसांनी या संदर्भातील सविस्तर जबाब नोंदवून घेतला. संशयित आरोपीने गुन्हा करण्यासाठी वापरलेले मोबाइल क्रमांक, बँक खाते, ईमेल आईडी यांचा तांत्रिक तपास करण्यात आला. त्यानंतर मोठ्या कौशल्याने मुख्य आरोपी नागराजू आप्पलास्वामी बुडूमुरू याला आंध्र प्रदेशातून ताब्यात घेण्यात आले. नागराजू हा २८ वर्षांचा आहे. तो आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांचा पीए नसल्याचे तपासात उघड झाले. पीए नागेश्वर रेड्डी यंच्या नावाचा त्याने वापर केल्याचे उघड झाले. आरोपी नागराजूने फसवणूक केलेल्या रकमेपैकी ७ लाख ६६ हजार रुपयांची रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात आली होती. ती गोठविण्यात आली आहे. अशा रीतीने आंध्र प्रदेश, तेलंगाना राज्यामध्ये सुमारे ६० वेगवेगळ्या कॉर्पोरेट कंपन्यांची जवळपास ३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याची कबुली नागराजूने दिली. त्यांच्यावर आंध्र प्रदेश, तेलंगाना या राज्यामध्ये ३० पेक्षा जास्त गुन्हे दाखल असल्याची माहिती निष्पन्न झाली आहे.
तसेच आरोपी नागराजूने वेगवेगळ्या कॉर्पोरेट कंपन्यांचे एम. डी. डायरेक्टर यांच्याशी आंध्र प्रदेश, तेलंगाना राज्याचे मुख्यमंत्री व त्यांचे पीए म्हणून बोलत असल्याचे भासवून कोट्यवधी रुपयांना गंडा घातला आहे. कंपन्यांतील प्रमुख व्यक्तीला मोबाइलद्वारे संपर्क साधणे. त्यांना गरीब क्रिकेटपटूस क्रिकेट किट घेण्यासाठी स्पॉन्सरशिप म्हणून पैसे पाठवण्यासाठी भाग पाडणे आणि त्यासाठी तो नॅशनल क्रिकेट अकॅडमी, व आंध्रा क्रिकेट असोसिएशन यांची बनावट कागदपत्रे बनावट ईमेलद्वारे पाठवणे ही त्याची गुन्ह्यांची पद्धत दिसून आली आहे. विशेष म्हणजे आरोपी नागराजू हा काही काळ रणजी क्रिकेट खेळला होता. त्यामुळे क्रिकेटपटूंच्या नावाखाली कॉर्पोरेट कंपन्यांकडून पैसे उकळण्याची आयडिया त्याला सुचली होती.
पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई विवेक फणसाळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सहआयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस उपआयुक्त डॉ. बाळसिंग राजपूत, सहा. पोलीस आयुक्त रामचंद्र लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक सुवर्णा शिंदे, पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार घोरपडे, पो. शि. विकास डीगे, पो. शि. गौरव भावसार यांनी यशस्वी तपास करत एका नव्या गुन्ह्यांच्या पद्धतीचा बुरखा फाडला आहे.
तात्पर्य : कॉर्पोरेट कंपन्यांच्या माध्यमातून सीएसआर फंड किंवा गंगाजळीचा पैसा जमा असतो. या पैशांवर गरीब क्रिकेटपटूंना मदत करण्याच्या नावाखाली डल्ला मारला जात असेल, तर लाखो रुपये देणगीरूपात देतानाही आता विचार करण्याची वेळ आली आहे.