Sunday, July 14, 2024
Homeमनोरंजननृत्य नाटिकेतूनच अभिनय क्षेत्रात पदार्पण

नृत्य नाटिकेतूनच अभिनय क्षेत्रात पदार्पण

  • टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल

किशोरी शहाणे, मराठी व हिंदी ग्लॅमर दुनियेतील सुपरस्टार अभिनेत्री. ‘गुम हैं किसी के प्यार मे’ ही तिची स्टार प्लस वाहिनीवरील मालिका सध्या गाजत आहे. त्यातील भूमिकेसाठी तिला बेस्ट ॲक्ट्रेसचा अवॉर्ड देखील मिळाला आहे. प्राइम व्हीडिओवरील ‘जीवन संध्या’ या मराठी चित्रपटातील तिच्या भूमिकेचे प्रेक्षकांनी कौतुक केले.

किशोरी शहाणे तिच्या ‘टर्निंग पॉइंट’विषयी म्हणते, ‘मी शाळेत असताना, दुर्गा झाली गौरी या नृत्य नाटिकेत काम केले. त्यामुळे नकळतपणे माझे अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण झाले, हा माझा पहिला टर्निंग पॉइंट होय. त्यानंतरचा टर्निंग पॉइंट म्हणजे माझा पहिला चित्रपट, ‘प्रेम करूया खुल्लम खुल्ला’ त्यात मला अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत तोडीस तोड भूमिका मिळाली. ती अभिनयाची एक शाळाच होती. त्यानंतर ‘माझा पती करोडपती’ चित्रपट मी केला. त्यानंतर जवळपास तीस ते चाळीस चित्रपट मी केले. त्यानंतर टी.वाय.बी.कॉम.चे वर्ष माझ्यासाठी टर्निंग पॉइंट ठरले. त्याच वर्षी ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’ हा चित्रपट मी केला. मी पहिल्यांदा सुप्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी सोबत नृत्यनाटिकेसाठी अमेरिकेला गेले. नंतर ‘रामायण’ केलं. आत्मविश्वास चित्रपट केला. माझे चित्रपट सुपरहिट झाले. ते वर्ष सोनेरी
वर्ष होते, असे मला वाटते.

त्यानंतरचा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट होता. तो म्हणजे माझं लग्न. मला असं खरंच वाटलं की, मी खूप काम करतेय, खूप फिरतेय. इकडे तिकडे जातेय. दीपक बलराज विज माझ्या जीवनात आले व माझा संसार सुरू झाला. त्यानंतर बॉबी या माझ्या मुलाचा जन्म झाला. बॉबी झाल्यानंतर मला खूप आनंद झाला. आयुष्यात आता वाटलं काय करिअर अन काय? आता हेच माझं आयुष्य. गृहिणी बनून राहण्यात मला खूप समाधानी वाटत होतं.

तीन-चार वर्षे झाली. परत जे घडायचं होतं तेच घडलं. माझ ‘घर एक मंदिर’ या हिंदी मालिकेतून पुनरागमन झालं. त्यानंतर मी अनेक मालिका केल्या.

त्यानंतर माझ्या करिअरमधला सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट होता तो म्हणजे माझी सेकंड इनिंग होय. ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटतील ‘चला जेजुरीला जाऊ’ ही लावणी. सगळेजण म्हणत होते की, किशोरी शहाणेचे पुनरागमन झाले आहे. त्या अगोदर आठ ते दहा वर्षे मी मनाने ब्रेक घेतला होता. त्यानंतर मी निर्माती व दिग्दर्शक झाले. ‘मोहट्याची रेणुका’ हा तो चित्रपट. या चित्रपटात सुबोध भावे व मी हीरो व हिरोईन. या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन मी केले. यानंतर माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट म्हणजे ‘बिग बॉस सीझन २’ मध्ये घालवलेले शंभर दिवस. यात मी खरी कशी आहे, हे लोकांना पाहता आले.’ ‘शायनिंग स्टार ऑफ दी सीझन’ हा अॅवॉर्ड मला मिळाला. नावीन्यपूर्ण बाब म्हणजे माझा प्रेक्षकवर्ग बालकापासून ते वृद्धांपर्यंत वाढला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -