Friday, March 28, 2025
Homeमहाराष्ट्रकोकण'सत्ता, पद आणि पक्ष गेल्याने वेड्यासारखे बडबडू लागला'

‘सत्ता, पद आणि पक्ष गेल्याने वेड्यासारखे बडबडू लागला’

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उद्धव ठाकरेंवर टीका

कुडाळ : सत्ता, पद आणि पक्ष गेल्याने वेड्यासारखे बडबडू लागल्याची केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता सडकून टीका केली आहे. पक्षप्रमुख असताना त्यांनी कधी नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना जवळ केले नाही. त्यामुळे पक्षाची वाट लावली. मुख्यमंत्री असताना स्वत: अडीच वर्ष काही केले नाही आणि याला ते द्या, त्याला हे द्या, आम्ही संपाला पाठिंबा देऊ असे आता म्हणत आहेत. जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा. सत्ता गेल्याने पायाखालची वाळू सरकली आहे. सत्ता, पद आणि पक्ष गेल्याने आता वेड्यासारखे बडबडू लागल्याची टीका नाव न घेता नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर केली.

भाजपचे प्रदेश सचिव व माजी खासदार डॉ. निलेश राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ते सिंधुदुर्गातील कुडाळमध्ये बोलत होते. निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळमध्ये शिवगर्जना महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह आमदार वैभव नाईक यांच्यावरही तोफ डागली. ते म्हणाले की, शिवरायांचे नाव घेऊन राज्य केले. मात्र, फितुरी करुन आजही इतिहास उजळला जातो. सहकाऱ्यांवर, लोकांवर विश्वास ठेवता येत नाही. आता पायाखालची वाळू सरकली, पद गेले आणि वेड्यासारखे बडबडू लागले.

नारायण राणेंचे वैभव नाईक यांना प्रत्युत्तर

वैभव नाईक हे भविष्य सांगणारे असल्याचे म्हणत कानाखाली आवाज काढण्याची भाषा राणेंनी यावेळी केली. नारायण राणे दोन महिन्यांत राजीनामा देतील असे वैभव नाईकांनी पत्रकार परिषदेत म्हटले होते. जसे तो मला भेटून गेला आणि मी त्याला कानात सांगितले. कान पुढे केला असता तर कानफटात मारली असती, सांगायची गोष्ट वेगळीच. मी केंद्रीय मंत्री आहे. राजीनामा का देईन, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. माझा पक्ष आज सतेत्त आहे, सत्तेत ठेवायचा आहे. २०२४ मध्ये मोदी सरकारमध्ये ४२ ते ४५ खासदार राज्यातून निवडून पाठवायचे आहेत, या तयारीला आम्ही लागलो आहेत. आता खासदार पण भाजपचा होईल, असे राणे म्हणाले.

नारायण राणे पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील विरोधकांचा सामाजिक, विधायक, विकासात्मक काय कार्य आहे? असा सवालही त्यांनी केला. भविष्यात येणाऱ्या निवडणुकीत एकही जागा विरोधी पक्षाला मिळता कामा नये, असे आवाहन राणेंनी जिल्ह्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांना केले. विधानसभा, लोकसभा, जिल्हा परिषद शत प्रतिशत भाजप असण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

नितेश आणि निलेश या दोन्ही मुलांची स्तुती

यावेळी राणे यांनी आपल्या नितेश आणि निलेश या दोन्ही मुलांवर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला. निलेश राणे आणि नितेश राणे ही दोन्ही मुलं महाराष्ट्रात भाजपच्या माध्यमातून सर्वच क्षेत्रात अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहेत. मला त्यांच्या कार्याबद्दल, कर्तृत्वाबद्दल गर्व आहे.

भाजपचे प्रदेश सचिव व माजी खासदार डॉ. निलेश राणे यांचा वाढदिवस कुडाळ तालुक्यातील कुडाळ डेपो ग्राऊंड येथे हजारो लोकांच्या उपस्थितीत साजरा झाला. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, सौ. निलमताई नारायण राणे, आमदार नितेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली आदी मान्यवर उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -