- हेल्थ केअर : डॉ. लीना राजवाडे
शिशिर संपला, वसंत आला नूतनतेचे वस्त्र लेवुनि निसर्ग आला.”
भारतीय सांस्कृतिक परंपरा पुन्हा नव्याने समजून घेताना जाणीव होते ती काही रूढी, या निसर्गाशी समरस होण्यास आजतागायत, आपसूक मानवाला भाग पाडत आल्या आहेत. होळी, रंगपंचमीनंतर क्षितिजाकडे पाहिले तर लक्षात येईल, लवकरच चित्रा नक्षत्र दिसायला लागेल. चैत्र शुद्ध प्रतिपदा, नूतन वर्षारंभाची वेळही जवळ येईल.
होय वाचक हो, तेव्हा वसंताची, हिंदू नवीन वर्षाची होणारी सुरुवात आपण आरोग्यपूर्ण गुढी उभारण्याच्या संकल्पाने करूयात. पाडव्याला कडुनिंब, आंबा पाने, साखरेची माळ या गोष्टी विशेष महत्त्वपूर्ण असतात.
त्यांच्याविषयी अधिक जाणून घेऊ.
कडुनिंब : रात्रीच्या वेळी झाडाखाली झोपू नये, असं विज्ञान सांगतं. कारण रात्रीच्या वेळी झाडं कार्बन डायऑक्साईड सोडतात. पण हा नियम कडुनिंबाला लागू होत नाही. कारण कडुनिंबाचं झाड रात्रीच्या वेळीही प्राणवायू म्हणजे ऑक्सिजनचं उत्सर्जन करतं. आयुर्वेदात कडुनिंबाला खूप महत्त्व आहे. कारण कडुनिंब ही एक बहुगुणी वनस्पती आहे. म्हणूनच चैत्र महिन्यात कडुनिंबाची पानं सेवन करण्यास आयुर्वेदात खूप महत्त्व आहे. कारण, या काळात पानांचं सेवन केल्यास रक्त शुद्ध होतं. म्हणूनच गुढीपाडव्याला कडुनिंबाची फांदी किंवा पानं लावण्याची पद्धत आहे. कडुनिंब चर्मरोगांवर गुणकारी आहे. कडुनिंबामुळे माणसाला त्रासदायक ठरणाऱ्या असंख्य जंतूंचा नाश होतो. कडुनिंबाच्या पानांचं सेवन केल्याने आतड्यातले कृमी नष्ट होतात. केस गळती आणि अकाली पांढरे होत असतील, तर कडुनिंबाची पानं आणि बियांचा वापर लाभदायी ठरतो. कडुनिंबाची पानं गरम पाण्यात उकळून त्याने आंघोळ केल्यानेही केसांच्या तक्रारी कमी होतात. कडुनिंब हे औषधी तर आहेच, शिवाय ते सौंदर्यवर्धकही आहे. कडुनिंबाची पानं, डाळिंबाचं वरचं आवरण, हरड, लोध्र आणि दूध यांचा फेसपॅक बनवून लावला तर चेहरा साफ होतो. दंतविकार आणि नेत्रविकारांतही कडुनिंब फायदेशीर आहे. म्हणूनच पूर्वी कडुनिंबाची कोवळी फांदी चावून त्याचा दात घासण्यासाठी उपयोग केला जात असे. कडुनिंबाच्या बियांमध्येही औषधी गुणधर्म असतात. या बियांचं दोन थेंब शुद्ध तेल विड्याच्या पानातून खाल्ल्यास दम्यासह अन्य श्वसन विकार बरे होतात.
आंबा : आंब्याचं झाड आपल्याला मधुर फळं तर देतंच शिवाय त्याची पानं अनेक आजारही बरे करतं. आवाज बसला असेल किंवा स्वरभंग झाला असेल, तर आंब्याची पानं कामी येतात. आंब्याची पानं पाण्यात टाकून ते पाणी आटवून एक चतुर्थांश होईपर्यंत उकळावं. मग त्या पाण्यात मध टाकून सेवन केल्यास बसलेला आवाज सुटतो. आंब्याची पानं आणि साल समान मात्रेत घेऊन त्याची पावडर करून त्याने दात घासल्यास हिरड्या मजबूत होतात. आंब्याच्या कोवळ्या फांदीच्या पानांची पेस्ट बनवून ती डोक्याला लावली, तर केस काळे आणि लांब होतात. आंब्याची कोवळी पानं आणि काळ्या मिऱ्या एकत्र करून तयार केलेल्या गोळ्या घेतल्याने न थांबणारे जुलाब आणि उलट्या बंद होतात. सावलीत सुकवलेल्या आंब्याच्या कोवळ्या पानांचा चूर्ण सेवन केल्यास मधुमेहींनाही फायदा होतो.
श्रीखंड : याबद्दलही रूचिकर माहिती आयुर्वेदानुसार रसाला म्हणजेच श्रीखंड हे बृहण करणारे म्हणजेच रसरक्तादी सप्तधातूंना वाढविणारे आहे. वृष्य म्हणजेच वीर्यवर्धन करणारे आहे. रुचिप्रद म्हणजे भोजनात रुचि उत्पन्न करणारे आहे.
स्निग्ध म्हणजे शरीरात मार्दवता, स्नेहन निर्माण करणारे आहे. तसेच बल (ताकद) वाढवणारे आहे. एकंदरीतच लक्षात येईल की, श्रीखंड बलवर्धक पदार्थ आहे. कशा पद्धतीने श्रीखंड तयार करावे? याचे सुद्धा वर्णन आचार्यांनी केले आहे. मलईसकट दुधाचे दही तयार करून या दह्याला स्वच्छ कपड्यात बांधून ठेवतात. त्यातील जलीय तत्त्व पूर्णपणे निघून गेल्यावर या दह्याला आपण चक्का म्हणतो. एका भांड्याला जाड कापड बांधून त्यावर हा चक्का आणि साखर एकत्र करून गाळतात.
एकजीव झालेल्या या मिश्रणात दालचिनी, तमालपत्र, वेलची, केशर व सुंठ घालावे. तयार झाले आयुर्वेदोक्त रसाला (श्रीखंड). श्रीखंडात हे मसाले टाकण्याचा उद्देश हाच की, श्रीखंडाचे पाचन चांगले व्हावे व त्याच्या गुणांचे वर्धन व्हावे. त्यामुळे वरील द्रव्य नक्की टाकावे. अशा पद्धतीने श्रीखंड खाल्ल्याने कफ होत नाही किंवा मलबद्धता होत नाही. कोणताही पदार्थ पचण्याकरिता त्याला मसाल्याची जोड दिली जाते. अर्थात हे मसाले अल्प मात्रेत असावे जेणेकरून मुख्य पदार्थांचा स्वाद कमी होऊ नये किंवा त्याचे गुण कमी होऊ नये. श्रीखंडाचे पाचन चांगले व्हावे व गुणवर्धन व्हावे म्हणून हा संयोग करण्यामागचा उद्देश असावा. असे हे बलवर्धक श्रीखंड. आयुर्वेदिक पद्धतीने नक्की करून बघा.
ऋतुनुसार निसर्गात, वातावरणात जसे बदल होतात तसेच शरीरातही होत असतात. कफ दोष वाढण्याचा हा काळ आहे.
नैसर्गिकरीत्या हा वाढणारा कफ त्रासदायक होऊ नये म्हणून कडुनिंब, आंबा पाने, साखर योग्य प्रकारे वापरून आपण ही आरोग्याची गुढी उभारून नवीन वर्षाची सुरुवात करूया.