Friday, April 25, 2025
Homeक्रीडातु बीसीसीआयचा अध्यक्ष होशील का? सचिनने दिलं मजेशीर उत्तर

तु बीसीसीआयचा अध्यक्ष होशील का? सचिनने दिलं मजेशीर उत्तर

मुंबई: भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भारतरत्न सचिन तेंडुलकरनं बीसीसीआयच्या अध्यक्षपदाबाबत महत्वाचं विधान केलं आहे. नवी दिल्लीत इंडिया टुडे कॉन्क्लेव २०२३ या सोहळ्यातील ‘सचिनिझम अँड आयडिया ऑफ इंडिया’ विशेष कार्यक्रमात सचिन तेंडुलकर बोलत होता.

सध्याचे बीसीसीआयचे अध्यक्ष आणि याआधीचे अध्यक्ष देखील माजी क्रिकेटपटू होते. मग भविष्यात तूही बीसीसीआयच्या अध्यक्षपदी पाहायला मिळणार आहेस का? असं सचिनला विचारण्यात आलं असता त्यानं अगदी मजेशीर उत्तर दिलं.

“मी वेगवान गोलंदाजी करत नाही”, असं सचिन म्हणाला. (रॉजर बिन्नी आणि सौरव गांगुली मध्यम गतीनं गोलंदाजी करायचे) एका दौऱ्यात जेव्हा गांगुलीनं विकेट्स घेतल्या होत्या तेव्हा तो 140kmph गतीनं गोलंदाजी करण्याचं सांगत होता. पण त्यानंतर त्याची कंबर दुखायला लागली होती, असं म्हणत सचिननं मी १४० च्या गतीनं गोलंदाजी करू शकत नाही असं मिश्किलपणे म्हटलं आणि बीसीसीआय अध्यक्षपदाच्या प्रश्नाला टाळलं.

सचिननं यावेळी हरभजन सिंग बाबत एक मजेशीर किस्साही सांगितला. सचिन म्हणाला, “मी जेव्हा पहिल्यांदाच मोहालीत हरभजनला पाहिलं होतं तेव्हा मला एकानं सांगितलं की भज्जी दुसरा खूप चांगला टाकतो. ही ९० च्या दशकातील गोष्ट आहे. प्रत्येक चेंडू टाकल्यानंतर तो रनअपसाठी न जाता थेट माझ्याकडे यायचा. जेव्हा तो नंतर टीममध्ये आला तेव्हा मी त्याला विचारलं. तेव्हा मला कळालं की मी प्रत्येक बॉल खेळल्यानंतर हेल्मेट नीट करण्यासाठी डोकं हलवायचो तर हरभजनला वाटायचं की मी त्याला बोलावतोय. त्यामुळे तो प्रत्येक चेंडू टाकल्यानंतर माझ्याजवळ यायचा”. सचिनने हा किस्सा सांगताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -