Tuesday, July 1, 2025

मुरबाडमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेल्या गारपीटीने भाजीपाला किडला

मुरबाडमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेल्या गारपीटीने भाजीपाला किडला

झालेल्या नुकसानामुळे शेतकरी हवालदिल


मुरबाड : मुरबाड तालुक्यातील आंबेळे (खुर्द) येथे गुरुवारी रात्री झालेल्या गारपीटीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. गारपीट झाल्यानंतर भाजीपाल्याच्या पिकांवर झालेल्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे यावेळेस आवक कमी होईल असे तेथील शेतकऱ्यांनी सांगितले आहे.


मुरबाडमध्ये आंबेळे (खुर्द) ८.३० वाजण्याच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात विजेच्या कडकडासह गारपीट झाल्याने भेंडी, लाल भेंडी, पिवळी मिरची, डांगर, टोमॅटो, टरबुज, वांगी इत्यादी पिकांचे नुकसान झाले आहे. भेंडी पिकावर करप्या भुरीरोग, मावा, तुटतडे या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळले.


तसेच गेले ३ ते ४ दिवस सतत पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे तसेच ढगाळ वातावरणामुळे पिकांची कळी तसेच लहान फळे गळून पडल्याने आणि मुरडा इत्यादी रोगांचा प्रादुर्भाव पिकांवर होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.


त्यामुळे कृषी खात्याने याकडे त्वरित लक्ष देऊन नुकसानग्रस्त भाजीपाला पिकाचे पंचनामे करावेत आणि त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी व कृषी मित्र देविदास गडगे यांनी केली आहे.

Comments
Add Comment