Monday, July 22, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यआर्थिक फसवणुकीचे आणखी काही प्रकार

आर्थिक फसवणुकीचे आणखी काही प्रकार

  • मुंबई ग्राहक पंचायत: अभय दातार 

वाचकहो, १० मार्च २०२३ च्या लेखात आपण बँकेशी संबंधित आर्थिक फसवणुकीचे काही प्रकार पाहिले. रिझर्व्ह बँकेच्या लोकपाल कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तिकेत आर्थिक फसवणुकीचे उर्वरित प्रकारही दिले आहेत, त्यासंबंधी या लेखात जाणून घेऊया.

नोकरीची खोटी आमिषे दाखवणे – यात एसएमएस किंवा समाजमाध्यमांद्वारे काही लिंक्स पाठवल्या जातात. त्याद्वारे मिळू शकणाऱ्या नोकऱ्यांची गुलाबी चित्रे, जसे की गलेलठ्ठ पगार, कार, इत्यादी. आपली वेगवेगळी माहिती विचारली जाते. ती दिल्यावर नोकरी मिळाल्याचे कळवले जाते आणि त्याचबरोबर काही गोष्टींची पूर्तता करण्यासाठी अमूक इतके पैसे भरा असे सांगितले जाते. नोकरी मिळाल्याच्या आनंदात ही फसवणूक लक्षात येत नाही आणि आपण भरलेले पैसे गमावून बसतो. साधारणपणे कोणत्याही कंपनीच्या संकेतस्थळावर ‘करिअर’ असा एक पर्याय असतो. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी तो निवडून मगच आपली आवश्यक तेवढीच माहिती द्यावी.

कर्जाचे आमिष – आज दुर्दैवाने अशी परिस्थिती आहे की, अनेकजण सहज कर्जाच्या विळख्यात सापडतात आणि सर्वस्व गमावून बसतात. त्याला बऱ्याच अंशी मासिक उत्पन्नाच्या अमूक पट कर्ज, कमी व्याजदर, सुलभ मासिक हप्ते, अशी आमिषे दाखवणारे संदेश किंवा जाहिराती कारणीभूत असतात. बनावट संकेतस्थळांमुळे त्या खऱ्या वाटू शकतात. या जाहिरातींमध्ये प्रसिद्ध कंपन्यांचे लोगोही वापरले जातात. विचारलेली माहिती भरली की, काही तासातच अमूक इतके कर्ज मंजूर झाल्याचा संदेश येतो आणि त्याच्या जोडीला अमूक शुल्क म्हणून अमूक इतके पैसे भरा म्हणून सांगितले जाते आणि आपण फसतो. कर्ज देणारी कोणतीही प्रथितयश कंपनी अथवा बँक अशा प्रकारचे शुल्क कर्जाच्या रकमेतून वळते करून घेते. कर्ज म्हणून मंजूर केली गेलेली रक्कम आपल्या मासिक मिळकतीच्या मानाने मोठी आहे का? कर्जावर लावला जाणारा व्याजदर इतर कर्जदारांच्या व्याजदराच्या तुलनेत फारच कमी आहे का? कर्ज मंजूर करणारी कंपनी कोठे आहे, या बाबी तपासून पाहाव्यात. या व्यतिरिक्त मोठा सुळसुळाट झाला आहे तो बनावट लोन अॅप्सचा. खरे म्हणजे कोणीही सोम्या गोम्या उठून कर्ज देण्याचा व्यवसाय सुरू करू शकत नाही. त्यासाठी रिझर्व्ह बँक आणि इतर काही संबंधित आस्थापनांकडून परवाना काढावा लागतो. या अॅप्समध्येही कंपन्यांच्या लोगोच्या बनावट प्रतिकृती, बनावट कर्ज मंजुरीपत्रे, धनादेशांच्या खोट्या प्रती, इत्यादींचा सर्रास वापर केला जातो. अशा वेळी कर्जदाराचा नोंदणी क्रमांक आहे का? त्याला व्यवसाय करण्यास परवानगी कोणी दिली वगैरे माहिती या अॅप्सवर असणे आवश्यक आहे. या गुन्हेगारांना खरा रस असतो तो आपली सगळी माहिती काढून घेण्यात; आपले पतमानांकन किती आहे याची त्यांना फिकीर नसते किंवा ते त्याबद्दल काही विचारत देखील नाहीत.

वरील दोन्ही प्रकारांत गुन्हेगार कोणताही मागमूस न ठेवता बनावट संकेतस्थळे, बनावट लिंक्स वगैरे पुरावे नष्ट करून गायब होतात. त्यामुळे आपणहून कोणी कर्ज मंजूर केल्याचे सांगत असेल, तर अजिबात विश्वास ठेवू नका आणि कोणताही तपशील पुरवू नका.

पोन्झी सापळे – आर्थिक फसवणुकीच्या सर्वात जुन्या प्रकारांपैकी एक असा हा प्रकार असून त्यात चित्ताकर्षक जाहिराती, अवाजवी परतावा, नवीन सभासद केल्यास भरघोस कमिशन यांचा सुकाळ असतो. वाचकांपैकी बऱ्याच जणांनी याचा अनुभव घेतला असेल. आपल्याला बक्षीस लागल्याचा फोन येतो, या दिवशी इतक्या वाजता अमूक ठिकाणी भेटा आणि बक्षीस घेऊन जा, असे सांगितले जाते आणि बरोबर बँकेचे चेकबुक घेऊन आपल्या जोडीदारासोबत या असा आग्रह केला जातो. तिथे गेल्यावर झकपक कपडे घातलेला प्रतिनिधी येतो. अमूक एका कालावधीसाठी अमूक इतकी गुंतवणूक केल्यास मिळणाऱ्या लाभाचे गुलाबी चित्र रंगवतो; नवीन मेंबर आणल्यास चांगले कमिशन, अशी लालूच दाखवली जाते. तेथील वातावरणाचा परिणाम होऊन आपणही एका फॉर्मवर सही करून सांगितलेल्या रकमेचा चेक देऊन गळाला अडकतो. सुरुवातीचे काही महिने ठीक जातात, पण पुढे सगळेच गाडे घसरते आणि आपण फसवले गेल्याचे लक्षात येते. तोपर्यंत कंपनीचे ऑफिस बंद झालेले असते आणि कर्मचारीही पसार झालेले असतात. तुमची जर अशा प्रकारे फसवणूक झाली असेल, तर तुमच्या शहरातील ‘गुन्हे अन्वेषण विभाग’ अधिकाऱ्याशी तातडीने संपर्क साधा. या विभागाने अशा प्रकारच्या फसवणुकीसंबंधात यापूर्वी गुन्हे दाखल करून काही प्रकरणांत गुंतवणूकदारांची निदान मूळ रक्कम तरी परत मिळवून दिली आहे.

आकर्षक व्याजदराचे आमिष – अशी आमिषे दाखवणाऱ्या कंपन्यांना रिझर्व्ह बँकेने ठेवी गोळा करण्याची परवानगी दिली आहे का ते आधी तपासून पाहावे. रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार अशा कंपन्या सर्वसाधारणपणे किमान १ वर्ष आणि कमाल ५ वर्षे या कालावधीसाठीच ठेवी घेऊ शकतात. तसेच हे व्याज वार्षिक १२.५ टक्क्यांपेक्षा जास्ती असता कामा नये. गुंतवणूकदाराने कंपनीचा व्यवसाय काय आहे तेही पाहायला हवे. कंपनीचा कोणी एजंट ठेवी गोळा करण्यासाठी आला असेल, तर कंपनीने त्याला प्राधिकृत केले आहे का ते तपासावे. सर्व काही ठीक वाटल्यास रक्कम रोखीने न देता चेकनेच द्यावी व तो चेकही कोणाच्या वैयक्तिक नावाने न देता कंपनीच्या नावाने द्यावा. बँका, विमा, शेअर बाजार, पोन्झी सापळे, वगैरे प्रकारांत फसवणूक झाल्यास ऑनलाइन तक्रार करता येते. त्याचा तपशील पुस्तकात पुढीलप्रमाणे दिला आहे.

बँकेशी संबंधित तक्रारी : https://cms.rbi.org.in/
शेअर्स आणि म्युच्युअल फंडसंबंधी तक्रारी : https://scores.gov.in/
बिगर बँकिंग कंपन्यांशी संबंधित तक्रारी : https://grids.nhbonline.org.in/
सायबर गुन्ह्यांविषयी तक्रारी : https://cybercrime.gov.in/
अर्थात अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आपली फसवणूक करणारे गुन्हेगार आपल्या दोन पावले पुढेच असतात. त्यामुळे स्वामी समर्थांनी उपदेश केल्याप्रमाणे आपण नेहमी ‘अखंड सावधान असावे’ हेच खरे.

mgpshikshan@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -