Tuesday, July 16, 2024
Homeताज्या घडामोडीपंतप्रधान आवास योजनेच्या टेंडरमध्ये घोटाळा!

पंतप्रधान आवास योजनेच्या टेंडरमध्ये घोटाळा!

ईडीची छत्रपती संभाजीनगरमध्ये ९ ठिकाणी छापेमारी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजी नगर येथे पंतप्रधान आवास योजनेत मोठा घोटाळा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. आज सकाळीच ईडीकडून शहरातील ३ ठिकाणी छापेमारी करण्यात आली. त्यानंतर ईडीने तब्बल ९ वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

महापालिकेच्या हद्दीत राबविण्यात येणा-या पंतप्रधान आवास योजनेच्या टेंडरमध्ये घोटाळा झाला असून, एकाच लॅपटॉपवरून टेंडर भरण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी ईडीकडून छत्रपती संभाजीनगरातील ९ ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्यावतीने पंतप्रधान आवास योजना राबवण्यात येत होती. या योजनेंतर्गत उभारण्यात येणाऱ्या घरांसाठी टेंडर काढण्यात आले, पण या टेंडरमध्ये घोटाळा झाल्याचे निदर्शनास आले होते. महापालिकेचे प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या ही बाब समोर आणली होती. याप्रकरणी तीन कंत्राटदारांसह १९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता थेट ईडीचीच या प्रकरणात एन्ट्री झाल्याने खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी यापूर्वीच शहरातील सिटी चौक पोलिसात ४० हजार घरांच्या जवळपास ४ हजार कोटींच्या या प्रकल्पात अनेक बडे मासे अडकण्याची शक्यता आहे. याप्रकरणी महापालिका उपायुक्त अपर्णा थेटे यांच्या तक्रारीवरून तीन कंत्राटदार कंपन्यांसह त्यांच्या १९ मालक-भागीदारांविरोधात सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या योजनेसाठी टेंडर काढताना ती एकाच लॅपटॉपवरुन अर्थात एकाच आयपी अॅड्रेसवरुन निविदा भरण्यात आल्या. ही बाब प्रशासकांच्या नजरेस आल्यानंतर महापालिकेने सिटी चौक पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार देण्यात आली. या तक्रारीनुसार समरथ कन्स्ट्रक्शन, इंडोग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस, जग्वार ग्लोबल सर्व्हिसेस या कंत्राटदार कंपन्यांसह त्यांच्या भागीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कंत्राटदार कंपन्यांनी संयुक्त भागीदारीमध्ये पुणे परिसरात बांधलेल्या बहुमजली इमारतींची पाहणी करण्यासाठी महापालिकेने समिती स्थापन केली आहे. ही समिती या कंत्राटदारांनी बांधलेल्या इमारतींची पाहणी करून अहवाल सादर करणार असल्याची माहिती मनपा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.​​​​​​

या प्रकरणात महापालिकेची मोठी फसवणूक झाल्याने पंतप्रधान आवास योजनेचा हा घरकूल प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -