मुरबाड: टोकावडे वन विभागाच्या हद्दीत असलेले खेडले, पऱ्हे, पाडाले, ठुणे परिसरातील सुमारे दीडशे एकर जागेतील वनसंपदा वणव्यात जळून खाक झाली. यात वन्यजीव सृष्टी सुद्धा होरपळून मृत्यूमुखी पडली. मात्र याकडे वनखात्याचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात असून यास जबाबदार कोण असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे.
गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून मुरबाड तालुक्यात विविध ठिकाणी वणवा लागून हजारो एकर जमिनीवरील वनसंपदा जळून नष्ट झाली. यात लाखो रुपये खर्च करून लागवड केलेली झाडे आगीत जळून खाक झाली आहेत.
वृक्ष लागवड करण्यासाठी जो निधी खर्च होतो त्यापैकी काही निधी झाडांच्या संरक्षणासाठी वापरण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर मुरबाडे यांनी केली आहे. कर्मचारी व अधिकारी यांनी शिल्लक राहिलेल्या वनसंपदेचे वेळीच संरक्षण करण्यासाठी उपयोजना कराव्यात अशीही मागणी त्यांनी केली आहे.