मा. खासदार निलेश राणे अभीष्टचिंतन विशेष
- डॉ. सुकृत खांडेकर
माजी खासदार व भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव निलेश राणे यांचा आज वाढदिवस. निलेश राणे यांच्या पाठीशी त्यांचे वडील केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे मोठे वलय आहे. पण निलेश यांनी आपल्या कामाने सार्वजनिक जीवनात आपले स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. निलेश व त्यांचे धाकटे बंधू आमदार नितेश राणे ही जोडी म्हणजे कोकणचा आवाज आहे. वडिलांच्या संस्कारातून दोन्ही बंधू आक्रमक व लढाऊ आहेत. रोखठोक बोलणे व एक घाव दोन तुकडे, हा त्यांचा स्वभाव आहे. पण त्यांची बांधिलकी थेट सामान्य माणसाशी आहे. पक्षाचा कार्यकर्ता व जनता हा त्यांच्या सार्वजनिक जीवनाचा केंद्रबिंदू आहे. निलेश राणे हे आपणहून कोणाच्या वाट्याला जाणार नाहीत, पण त्यांच्या वाटेला कोणी गेले तर त्याला पळताभुई केल्याशिवाय सोडणार नाहीत. भारतीय जनता पक्ष, पक्षाचे नेते, सर्वोच्च नेते नरेंद्र मोदी व अमितभाई शहा आणि वडील केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्याविषयी कोणी वेडेवाकडे बोलले, तर त्याला ते सोडणार नाहीत. जे राजकारणात फुकाच्या घोषणा करतात किंवा फालतू बडबड करतात, त्यांनाही खडे बोल सुनावल्याशिवाय निलेशदादा गप्प बसत नाहीत. बारामती लोकसभा मतदारसंघ सुप्रिया सुळे यांचा. त्या तेथील खासदार आहेत. सहापैकी दोन आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे. अजित पवार तर अनेकदा पालकमंत्री होते, पवारसाहेब स्वत: बारामतीचे िकम जोंग, सर्व स्थानिक संस्थांवर राष्ट्रवादीचा कब्जा. तरीही बारामतीचे प्रश्न सोडविण्यासाठी आंदोलन करावे लागत असेल, तर बारामतीचे खासदारच बदलावे लागतील…. निलेश राणेंच्या या झणझणीत ट्वीटमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तंबूत मोठी दाणादाण उडाली. बारामती म्हणजे पवार परिवार असे राष्ट्रवादीचे नेते छातीठोकपणे नेहमीच सांगत असतात, मग बारामतीतील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी त्यांच्यावर आंदोलनाचे इशारे देण्याची सरास पाळी का यावी?
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिसे यांचा अपघाती मृत्यू झाला. कोकणात काही घडले की त्यांचे खापर राणे परिवाराच्या माथी मारायला उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे शिल्लक राहिलेले नेते तयारच असतात. पत्रकार वारिसे यांचा अपघात घडविणारा गुंड हा निलेश राणेंसोबत राहणारा. राणेंच्या चिथावणीमुळे पत्रकाराची हत्या झाली, असे बेलगाम आरोप उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी करून राणेंची बदनामी करण्याचा उद्योग सुरू केला. मग निलेश काय गप्प बसतात का? त्यांनी ट्वीट केले…, हाच आरोपी एक दीड महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरे गटाच्या आमदारासोबत कलेक्टर ऑफिसला होता की नाही? रिफायनरीच्या किती बैठकांना ही व्यक्ती होती? उद्धव ठाकरे गटाच्या आमदाराबरोबर मागच्या वर्षात कितीदा त्याची भेट झाली? राणेंवर टीका केली की, उद्धव ठाकरे खूश होतात, म्हणूनच विनायक राऊत अशी टीका करीत असतात. त्यांची खासदारकीची कामं संपली असं वाटतंय. आता किती वर्षे उद्धव ठाकरे यांची भांडी घासणार आहेत?
आदित्य ठाकरे यांची राज्यात शिवसंवाद यात्रा चालू आहे. मराठवाड्यात, औरंगाबाद जिल्ह्यात, वैजापूर तालुक्यात सभा झाली. सभा चालू असताना गोंधळ झाला, नंतर म्हणे ताफ्यावर दगडफेक झाली, अशी त्यांच्या चेल्यांनी आवई उठवली. आदित्य यांना सहानुभूती मिळविण्याचा त्यांचा खटाटोप होता. पण पोलिसांनी अशी कोणतीही दगडफेक झाली नाही, असे स्पष्ट केले.… निलेश राणे यांनी त्यांच्या भाषेत म्हटले – (विरोधी पक्षनेते) अंबादास दानवेंच्या जिल्ह्यात त्यांचा नेता दगड खातो, याची त्यांना लाज वाटायला हवी. खरं तर दानवेंनीच राजीनामा द्यायला हवा. बाळासाहेब ठाकरे बघत असतील की, आपला नातू दगडी खातोय, तर वरून ते तुमच्यावर चपला फेकतील. …
निलेश राणे यांच्या तडाख्यातून भास्कर जाधव व छगन भुजबळही सुटलेले नाहीत. भुजबळ म्हणाले, शाळेत सरस्वतीचा व शारदा मातेचा फोटो हवाच कशाला? ज्यांना तुम्ही पाहिले नाही, ज्यांनी तुम्हाला शिकवलेले नाही, मग त्यांची पूजा कशाला करायची? निलेश राणे यांनी म्हटले, मग नोटांवर फक्त गांधीजीच कशाला, सर्व महापुरुष पाहिजेत…. हिंदू धर्मात पारंपरिक श्रद्धेला महत्त्व असते, पण ते पवारसाहेबांच्या सोबत असणाऱ्यांना समजणार नाही.…
कोकणातील विकासकामांवर निलेश राणे यांचे बारीक लक्ष असते. विकासकामांना विलंब होतो, तेव्हा ते कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरतात. मुंबई-गोवा महामार्गाचे काम अपू्र्ण असतानाही, राजापूर तालुक्यातील हातिवले येथे टोलवसुली सुरू झाली, तेव्हा लोक संतप्त झाले, मोठे जनआंदोलन झाले. निलेश यांनी आंदोलनाचे नेतृत्व करून जोपर्यंत टोल स्थगित होत नाही, तोपर्यंत रस्त्यावरून हटणार नाही, असे जाहीर केले. त्यानंतर टोलवसुली स्थगित झाली. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर तर निलेश कडाडून बोलताना दिसतात. हिंदू म्हणून भगव्याची ताकद अवघ्या जगाला दाखवा, या त्यांच्या भाषणाने कोकणवासीय मंत्रमुग्ध झाले. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर-कसबा येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकासमोर त्यांनी शेकडो हिंदुप्रेमींना धर्मरक्षणाची शपथ दिली. धर्मवीर संभाजीराजेंच्या पुतळ्यासमोर नतमस्तक झाल्यावर त्यांनी व्यक्त केलेल्या विचारांनी उपस्थितांमध्ये देशभक्ती व धर्मभक्तीची भावना उचंबळून आली. चिपळूणमध्ये गोशाळेसाठी हभप भगवान कोकरे यांनी उपोषण केले, तेव्हा निलेश राणे तेथे धावून गेले. या लढाईत तुम्ही एकटे नाहीत, आम्ही तुमच्या सोबत आहोत, असे त्यांनी त्यांना सांगितले. साडेआठ महिन्यांपूर्वी महाआघाडीचे सरकार कोसळले, तेव्हापासून ठाकरेंसोबत असलेले काही नेते बेताल बोलत सुटलेत. त्यांचाही समाचार निलेश राणे त्यांच्या कडवट भाषेत घेतच असतात.
उद्धव ठाकरे गटाचे नाव आता शिल्लक सेना ठेवावे, असे त्यांनी गेल्या वर्षीच सुचवले होते. विधानसभेचा मार्ग वरळीतून जातो, अशी धमकी देणाऱ्यांना मुलाच्या मतदारसंघात तीन आमदार आणावे का लागतात, असा प्रश्न विचारून वरळीत आमदारक्या वाटल्या नसत्या, तर मुलगा निवडून आला नसता, अशाही कानपिचक्या निलेश यांनीच मातोश्रीला दिल्या. बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री होतो, मग आनंद दिघेंच्या घरात एकही नगरसेवक का नाही, या त्यांच्या प्रश्नाने उद्धव गटाच्या अनेकांना मिरच्या झोंबल्या. निलेश यांचे वक्तव्य, भाष्य आणि ट्वीट हे नेहमीच अचूक वेध घेणारे असते.
निलेश राणे यांचे दरवाजे कार्यकर्ते व सामान्य जनतेला नेहमीच खुले असतात. जनतेला सदैव उपलब्ध असलेला नेता अशी त्यांची ओळख आहे. लोकही त्यांचे प्रश्न, अडचणी मोकळेपणाने त्यांच्याकडे मांडतात. समोर बसलेल्या माणसाचे म्हणणे ते शांतपणे ऐकून घेतात, त्याच्यावर अन्याय झाला असेल, नियमात असूनही त्याचे काम होत नसेल तर त्यांच्या स्टाइलने संबंधितांची कानउघाडणी करून त्याचे काम तातडीने कसे होईल बघतात, जिथे प्रशासन किंवा पोलीस यंत्रणेला पत्र द्यायचे असेल, तिथे पत्र देतात, शिफारस करतात आणि कधी कधी ते स्वत: संबंधित अधिकाऱ्याला फोन करून समोरच्या माणसाचे काम करून देतात. समोर भेटलेल्या माणसाचे काम होईपर्यंत व त्याला न्याय मिळेपर्यंत त्याचा पाठपुरावा करायचा, ही त्यांच्या कामाची पद्धत आहे. म्हणूनच त्यांच्यावर कार्यकर्ते व सामान्य लोकांचा मोठा विश्वास आहे. त्यांना भेटणाऱ्या लोकांमध्ये औषधोपचाराची गरज असलेले व इस्पितळाचा खर्च न परवडणारे अनेक असतात. अशा वेळी त्यांची वैद्यकीय बिले कशी कमी होतील व त्यांना वेळच्या वेळी औषधोपचार कसा मिळेल, यावर निलेश यांचा कटाक्ष असतो. पैसे नाहीत म्हणून कुणीही औषधोपचारापासून वंचित राहता कामा नये, याची ते नेहमीच काळजी घेतात. विशेष म्हणजे कार्यकर्त्यांना संभाळणारा हा नेता आहे, त्याची व त्याच्या कुटुंबीयांची काळजी घेतात. आपल्या पाठीशी आपला नेता ठामपणे उभा आहे, हाच विश्वास त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण केला आहे.
निलेश राणे यांना ‘प्रहार’ परिवाराच्या वतीने लक्ष
लक्ष शुभेच्छा!…